Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांच्या स्वरचित काव्य वाचनात दंग झाले साहित्यिक.



श्रावणधारा काव्य महोत्सव समिती ओतूरच्या सदस्यांनी करंजाळे, तालुका जुन्नर (पुणे) येथील जिल्हा परिषद शाळेला, 'साहित्यिक विद्यार्थी संवाद,' या उपक्रमांतर्गत भेट दिली. या उपक्रमासाठी शाळेचे आदर्श शिक्षक व सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. उत्तम सदाकाळ तसेच वर्ल्ड व्हिजन टाइम्स मुंबई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिक श्री. राजेश साबळे ओतूरकर यांनी भूषवले. या प्रसंगी श्रावणधारा काव्य महोत्सव समितीचे डॉ. खं. र. माळवे, साहित्यिक संजय गवांदे, डॉ. प्रविण डुंबरे, रणजीत पवार, आंतरराष्ट्रीय चित्रकार आणि माजी प्राचार्य सुरेश गेनभाऊ डुंबरे आणि वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबईचे संपादक प्रा. नागेश हुलवळे  हे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ , गुलाबपुष्प व उत्तम सदाकाळ यांचे "पाऊस" बालकवितासंग्रह हे पुस्तक देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 



शाळेतील बालकवी ज्ञानेश्वरी पोपट शेळके,  मयूर संभाजी पारधी, कुणाल विलास शेळके,  भारती मनोहर शेळकंदे, साक्षी विठ्ठल बगाड या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता ओघवत्या शैलीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यापूर्वी साहित्यिक दैनिक... 'वर्ल्ड व्हिजन टाइम्स मुंबईच्या' अंकामध्ये या विद्यार्थ्यांच्या कविता प्रकाशित करण्यात आल्या होत्या. या संवाद उपक्रमात प्रकाशित झालेल्या कवितांचा प्रत्यक्षदर्शी आस्वाद घेण्याचा योग सर्वांना आला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात असे स्पष्ट केले की, या कामी त्यांच्या शाळेचे शिक्षक उत्तम सदाकाळ यांचे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन मिळत असते. व करंजाळे येथील नैसर्गिक वातावरणाचा त्यांना कविता लिहिण्यासाठी उपयोग होतो. उपस्थित साहित्यिकांनी आपल्या मनोगतातून मुलांना साहित्या विषयी मार्गदर्शन केले, तसेच त्यांनी स्वतःच्या बालकवितांचे सादरीकरणही केले. श्रावणधारा काव्य महोत्सव समितीच्या वतीने बालकवींचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि काव्यसंग्रह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे पदवीधर शिक्षक व शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती श्री. साहेबराव मांडवे यांनी, सदर सत्कार विद्यार्थ्यांच्या भविष्यातील साहित्य निर्मिती आणि सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रा. सुरेश डुंबरे यांनी शाळेतील मुलांसाठी चित्रकला कार्यशाळा तसेच स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची घोषित केले. समितीचे प्रकाशक श्री. रणजीत पवार यांनी शाळेतील मुलांच्या कवितांचा प्रतिनिधिक काव्यसंग्रह विनामूल्य प्रकाशित करणार असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी शाळेचे सहशिक्षक श्री. नंदकुमार साबळे व सौ.सरला दिवटे  यांनी असे सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या संधी उपलब्ध होणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. डॉ. प्रविण डुंबरे यांनी अतिशय मनोरंजक बालकविता सादर करून विद्यार्थ्यांना खळखळून हसवले. 



शाळेच्या प्रवेशद्वारावरील रांगोळी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होती. विद्यार्थ्यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत वॉटर क्लॅपच्या विशिष्ट पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेत केले. श्री. उत्तम सदाकाळ सर यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. नामदेव मुठे यांनी केले असून श्री. साहेबराव मांडवे सर यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments