पुणे मुंबई डेक्कन क्वीन पकडण्यासाठी राज पुणे स्टेशनवर पोहोचला. आज गाडी प्लॅटफॉर्म नंबर १ ऐवजी प्लॅटफॉर्म नंबर ५ वरून सुटेल या अनाउन्समेंटने प्रवाशांची धांदल उडाली.
राजचे लक्ष समोर २ मोठ्या बॅग्जसह उभ्या असलेल्या साधारणतः पन्नाशीच्या परंतु तरीही खुप आकर्षक स्त्री कडे गेले. तीने केलेल्या स्मित हास्याला दाद देत राजनेही स्माईल दिले. तशी ती पटकन पुढे आली आणि म्हणाली, ओळखलंत का जावईबापु? राजने स्मरण शक्तीला ताण दिला पण ऊत्तर सापडले नाही. २ वर्षांपूर्वीच राजचे नेहाशी लग्न झाले, नेहाच्या अनेक नातेवाईकांपैकीच कुणी तरी असणार असा विचार करत राज ऊत्तरला. हो, हो तुम्हाला कसे विसरणार?
माय मोस्ट ईम्प्रेसिव्ह सासुबाई!
कुठे निघालात? मुंबईला? राजने विचारले. हो ना, आता ५ नंबर प्लॅटफॉर्मवर जायचे आणि नेमकी आज हमाल मंडळी संपावर. कशा नेऊ या बॅग्ज?
तुम्ही काळजी करू नका, मी मदत करतो, जराशा नाराजीनेच राज म्हणाला. योगायोगाने दोघांचीही एकच बोगी होती. राजने सामान गाडीतच नव्हे तर अगदी सीट पर्यंत पोहोचविले. सासुबाई अगदी खुश झाल्या.
त्या नाही म्हणत असतानाही राजने चहा, नाश्ता मागविला. नेहाच्या माहेरच्या मंडळींची सेवा करून नेहाला खुश करण्याची कोणतीही संधी राज दवडत नव्हता.
सासुबाईंना घ्यायला कोणी तरी CST ला येणार होते. गाडी थांबताच राजने सामान गाडीतुन खाली उतरविले.
परंतु प्लॅटफॉर्मवर कुणीही आले नसल्याने राजची जबाबदारी वाढली. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे स्टेशन बाहेर त्यांना घ्यायला गाडी आली होती.
आजचा दिवस राजासाठी कष्टाचा होता. गाडीला पार्किंग न मिळाल्याने जवळ जवळ अर्धा किलो मीटर पायपीट करावी लागली राजला. शेवटी एकदाची गाडी सापडली. राजने सुस्कारा सोडला.
मॅडमला घेऊन ड्रायव्हर निघून गेला, राजला तिथेच सोडून.
राज थोडासा निराश झाला म्हणजे त्याला लिफ्ट दिली नाही म्हणून नव्हे तर सासुबाईॅना वाकून नमस्कार करायला विसरल्याने. चांगले केलेले सर्व विसरून, राजवर चिडचिड करायला नेहाला संधी मिळणार होती.
मुंबईतील कामे आटोपून राज रात्री घरी परतला. नेहाला त्याने सासुबाईंना केलेली मदत मोठ्या अभिमानाने सांगितली.
राज, किती वेंधळा रे? निदान नांव तरी विचारायचे. आता कशी मिरवणार मी माहेरच्या मंडळीत? नेहाने नाराजी व्यक्त केली.
स्वीटी, वेंधळा नाही मी, सासुबाईंबरोबर सेल्फी घेतलाय ना! त्या नाही म्हणत होत्या पण मीच आग्रहाने घेतला.
सेल्फी बघुन नेहा किंचाळली, या कोण?
मी कसे सांगणार नेहा, तुझ्या माहेरच्या ना त्या, तुलाच माहीत असणार.
राज, त्यांनी तुला चक्क “जावईबापु” बनविले.
म्हणजे? समजले नाही म्हणणाऱ्या राजला नेहा म्हणाली, त्या मॅडम माझ्या ना "नातेवाईक" ना "ओळखीच्या". त्यांनी "जावईबापु" बनवुन तुझ्या कडून चक्क फुकटात "हमाली" करून घेतली.
लोक "मामा" बनतात, तु "जावईबापु" बनलास. काय राज किती साधा भोळा रे तू?
या गोष्टीला १० वर्षें झालीत पण अजूनही हा किस्सा सर्वांना चघळून चघळून सांगत नेहा राजला चिडवत असते आणि राजही मिस्किलपणे म्हणतो, माझ्याशी लग्न करून, तुच तर बनवलेस मला जावईबापु!
-दिलीप कजगांवकर, पुणे
७७७००२५५९६

Post a Comment
0 Comments