वातानुकूलित सिटीबस, बस स्टॉप वर थांबली. मागच्या दरवाजातून राज, हा अतिशय रुबाबदार तरुण बसमध्ये चढला. साधारणतः सहा फूट उंच, गोरापान वर्ण, आकर्षक पोशाख आणि प्रभावी व्यक्तिमत्व.
नियमांना धाब्यावर बसवण्याचा हक्क असल्याच्या तोऱ्यात पुढच्या दरवाजातून दोन सुंदर तरुणी बसमध्ये चढल्या. एकीचा आकर्षक शोल्डर कट, गोरा वर्ण, मध्यम उंची, सडपातळ बांधा, डार्क निळा स्लीवलेस टी शर्ट, अॅश कलरची जीन्स, सुंदर गॅागल आणि ब्रॅंडेड शुज तर दुसरीचे लांब मोकळे केस, फॅशनेबल पंजाबी ड्रेस, गव्हाळ वर्ण, इम्पोर्टेड गॅागल आणि हाय हिल्स.
त्या सौंदर्यवतींना बघताच राजची विकेट पडली. योगायोगाने म्हणा किंवा प्रयत्न केल्यामुळे म्हणा, राजला त्यांच्या मागची सीट मिळाली. गप्पा मारण्यात दोघी मग्न होत्या. राज मन लावून आणि कान टवकारून त्यांचे बोलणे ऐकत होता. त्यांच्या बोलण्यातून राजला समजले की त्या साठे कॅालेजला शिकत होत्या. शोल्डर कटवाली "नेहा" नी लांब केसवाली "रीना", दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी.
गप्पांच्या नादात त्या तिकीट घ्यायला पुर्णपणे विसरल्याचे राजच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही.
बसमध्ये तिकीट चेकर चढल्याची जाणीवही दोघींना झाली नाही. मॅम तिकीट दाखवा, तिकीट चेकर जवळजवळ ओरडूनच म्हणाल्याने त्या गप्पांच्या दुनियेतून वास्तवात आल्यात. आपण तिकीट न काढल्याची जाणीव दोघींनाही झाली आणि त्यांची विकेट पडली.
सुशिक्षित आणि मोठ्या घरातल्या दिसतात परंतु विनातिकीट प्रवास करतात, साहेबांनी टकळी चालू केली. त्यांचा जमेल तेवढा पाणउतारा करण्याचा साहेबांचा इरादा होता. नेहा आणि रीना, विसरलात का? तुमची तिकीटे राजजवळ म्हणजे माझ्या जवळ आहे, पटकन उठून राजने साहेबांना तिकीटे दाखविली. आता मात्र साहेबांचीच विकेट पडली. नेहा आणि रीनासाठी हा सुखद धक्का होता. अतिशय कृतज्ञतेने दोघींनी राजचे आभार मानले.
साठे कॉलेजच्या बसस्टॉपवर नेहा आणि रीना उतरल्यात, त्यांच्या मागोमाग राज देखील उतरला. नेहाने सहज मागे वळून बघितले राज त्यांच्याच मागे येत होता. नेहाला ते खटकले. तीने ठरविले की राजला सांगायचे, मित्रा तू मदत केलीस, थॅंक्स परंतु आमचा पाठलाग करू नकोस.
नेहा राजकडे जायला निघाली तेवढ्यात राजने स्कुटीवरून येणाऱ्या एका मुलीकडे लिफ्ट मागितली आणि तो तिच्याबरोबर निघून गेला. आता मात्र नेहाचीच विकेट पडली.
दोघी कॉलेजमध्ये पोहोचल्या. क्लास चालू व्हायला थोडा वेळ होता म्हणून त्या बाहेर थांबल्या होत्या. तेवढ्यात नेहाचे लक्ष लांबवर उभ्या असलेल्या राजकडे गेले. आता मात्र नेहा मनोमनी संतापली.
आमचा पाठलाग अगदी कॉलेजपर्यंत. आय कॅनॅाट टॅालरेट धिस. दोघीही तरातरा राजजवळ पोहोचल्या. राज जवळ उभा असलेला कॉलेजचा शिपाई नेहाला म्हणाला, नेहा नॅम, यांना तुमच्या क्लासला यायचे आहे, प्लीज त्यांना घेऊन जा.
अगदी वर्गापर्यंत पाठलाग. धीस इज टू मच. नेहा राजला जाब विचारणार तेवढ्यात कॉलेजचा शिपाई म्हणाला, मॅम हे तुमचे मराठीचे नवीन प्रोफेसर राज मराठे. आता मात्र नेहा आणि रीना, दोघींचीही विकेट पडली.
क्लास सुरू करताना राजने त्याची ओळख करून दिली. राज गोल्ड मेडॅलिस्ट होता बी ए आणि एम ए चा, हे ऐकून परत एकदा नेहा आणि रीनाची विकेट पडली.
राजचा दमदार आवाज, शिकविण्याची पद्धत, आत्मविश्वास आणि वैचारिक प्रगल्भतेने सर्वांना संमोहित केले आणि पहिल्याच तासाला वर्गातील समस्त मुलींची विकेट पडली.
कॉलेज संपल्यावर नेहा आणि रीना बसने घरी यायला निघाल्यात, तेवढ्यात नेहाच्या बाबांचा फोन आला. नेहा तुझ्यासाठी एक खूप छान स्थळ शोधलेय. मुलगा प्राध्यापक असून आणि बी ए आणि एम ए ला गोल्ड मेडल मिळाले आहे.
बाबा, त्यांचे नांव राज मराठे आहे का? हो, पण नेहा तुला कसे कळले? तू ओळखतेस का त्यांना? असे विचारताना नेहाच्या बाबांची विकेट पडली.
राज सरांचे नांव ऐकून रीनाच्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नचिन्ह बघून, माझे बाबा राजच्या स्थळाचा विचार करताहेत, नेहाने स्पष्टीकरण दिले. रीनाचा पडलेला चेहरा स्पष्टपणे दर्शवित होता, रीनाची विकेट पडली होती.
घरी येताच आई-बाबांशी अगदी प्रेमाने आणि सलगीने बोलत नेहाने सांगितले, मला राजचे स्थळ पसंत आहे. आता मात्र आई आणि बाबा दोघांचीही विकेट पडली.
नेहाने सकाळपासूनचा सर्व वृत्तांत आई-बाबांना सांगितल्यामुळे सगळ्यांचे राज बद्दलचे मत खूप चांगले झाले. तेवढ्यात नेहाच्या बाबांचा फोन वाजला.
सर, तुमच्या मुलीचे प्रोफाईल मी "अनुरूप" मध्ये बघितले, मला प्रोफाईल आवडले आहे, मी तिच्याशी बोलू शकतो का? बाबांनी फोन नेहाकडे दिला.
राजवर फिदा असणाऱ्या नेहाला आता कुणाही विवाहेच्छुकाशी बोलायचे नव्हते. नाईलाजानेच तीने फोन घेतला. अॅाडीओ कॉल नको, व्हिडिओ कॉल करा नेहाने स्पष्टपणे सांगितले. व्हिडिओ कॉलवर एकमेकांना बघताच नेहाची आणि पलीकडून बोलणाऱ्या तरुणाचीही विकेट पडली. तो दुसरा तिसरा कुणी नव्हता तर प्रोफेसर राज मराठेच होता.
दिवसभर राजची विकेट काढण्याचा असफल प्रयत्न करणाऱ्या नेहाला प्रथमच राजची विकेट काढता आली होती. सर तुम्ही मला पसंत आहात असे सांगत नेहाने राजची पुन्हा एकदा विकेट काढली, अगदी क्लीन बोल्ड करत.
नेहा राज सरांशी लग्न करणार ही बातमी संपूर्ण कॅालेजमध्ये पसरली. “कॅालेज क्वीन” नेहावर जीव टाकणाऱ्या अनेक तरूणांची आणि "राजबिंड्या" राजवर फिदा असणाऱ्या सर्व तरूणींची विकेट एकाच वेळी पडली.
हे सर्व मुंबईत नव्हे तर पुण्यात घडले हे समजल्यावर समस्त पुणेकर युवकांची विकेट पडली.
वाचकांना ही कथा चक्क आवडली हे समजल्यावर माझीही विकेट पडली.
बघा तर खरं, तुमची विकेट शाबुत आहे की पडलीय?
-दिलीप कजगांवकर, पुणे
७७७००२५५९६

Post a Comment
0 Comments