दुपारची २ ची वेळ होती, ते पावसाळ्याचे दिस होते, दत्ता हा गावावरून कामानिमित्त तालुक्याला बसने जात होता, बस स्थानकावर पोहोचताच मुसळधार पावसाला सुरूवात झाली तसा दत्ता तिथंच बाकड्यावर बसावं म्हणून जागा शोधू लागला बाकड्यावर एका शाळकरी मुलाशेजारी दत्ता जागा करत बसला, पावसाची संततधार सुरूच होती म्हणून खूप सारे प्रवासी विद्यार्थी व महिला वर्ग मोठ्या संख्येने त्यांच्या त्यांच्या बस गाड्यांची वाट पाहत बस स्थानकातील बाकड्यांवर बसले होते काहीजण गाड्या लागल्या की तसेच पळत सुटायचे काही जण बस स्थानकाच्या आवारात उभे होते, पाणी सगळीकडेच वाहत होते, दत्ता देखील त्या ठिकाणी पाऊस उघडण्याची वाट पहात होता, तिथंच काही गडी माणसं तंबाखूचा बटवा काढून तंबाखूला चुना लावून मळत होते काही महिला मशेरी लावत होत्या काहीजण जांभया देऊन तसाच हात तोंडावर ठेवत होते लहाण मुलं रडत होते काहींच्या हातात बाजाराच्या पिशव्या तेल डबे तर काहीजण असेच मजेने फिरायला आलेले होते, कुत्र्यांची पिल्ले तिथेच आळीपिळी देऊन मायेच्या उबेने तिथेच कुडकुडत बसली होती, कुणी तरी येता जाता त्यांच्या अंगावर चालताना पाणी पडले की ती पिल्ले अंग चोरून कुशीत घुसायची.
गाया बकऱ्या तिथेच आवारात गवत खात होत्या, हे निरिक्षण पाहत बराच वेळ दत्ता त्या ठिकाणी उभा होता. अशातचं दत्ताचं लक्ष गर्दीत उभ्या असलेल्या ७५ ते ८० वर्षाच्या आज्जीकडे गेलं, आज्जीच्या हातात हिरव्या पोपटी रंगाच्या नक्षी नसलेल्या बांगड्या, हाताच्या सपाट भागावर गोंदलेली नक्षी, डाव्या उजव्या गालावर अन नाकाच्या डाव्या बाजूवर एक गोंदलेला टिपका, डाव्या हातात रंग गेलेला एक धागा, गळ्यात जाड अशी तुळशीची माळ, गुडघ्यापर्यंत वर खेचून बांधलेलं लुगडं, डोक्यावर घेतलेला पदर, पायात जुनी तुटलेली चप्पल, अंगात कसलाही त्राण नाही, थोडीशी वाकलेली, अंग व चेहरा पूर्ण सुरकतलेला, लुकलुकणारे बारीकसे डोळे, कुणालाही मायेचा पाझर फुटावा असं तिचं एकंदरीत रूपडं होतं, दत्ताला फार आपुलकी वाटली. शेजारी सगळी माणसं उभी होती कुणाला तरी विचारावं गाडी कोणती लागली.
बा ये बाळा कंची रं गाडी लागली?
म्हातारे नाही सांगता येणार जवळ उभा असलेला उत्तर देतो.
आज्जी गप व्हायची.
पण तिची नजर गाडी कधी येणार याकडेच होती यामुळे तिचे डोळे सुकून गेले होते.
शेजारी बाया होत्या.
बाई ये ताई अगं गाडी कंची गं लागली?
आज्जे मला नाय माहीती असं ती बाई बोलायची.
जवळच्या कंबरेला हात घालून मशेरीची डबी काढली अन् त्यातून हातावर मशेरी घेतली तोंडात घातली तशीच मशेरी जिभेने ओठावरून फिरवली. तसं तिचं लक्ष दत्ताकडं गेलं दत्ताकडं पाहताच तिनं त्याला विचारलं.
बाळा ह्या गाड्या कंच्या लागल्यात.
तसा दत्ता म्हणाला आज्जी आंबोली आणि अंजनावळे लागल्यात.
आज्जी मायेने बोलत होती, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या गाड्यांची वाट पाहत होता, आज्जी तशीच तिथं उभी होती निरागसपणे ती लोकांकडे पाहत होती, तिला कोणीतरी मदत करावी असं तिला वाटतं होतं, थोडा पाऊस थांबला तोच लोकांची पळापळ सुरू झाली, गच्च गाड्यांमध्ये लोकं एकमेकांना ढकलत पुढे सरकवत रेटत बसच्या दारातून चालत होते, दत्ता मात्र आज्जीला शोधत होता, गर्दीत कुठं कोण तिला मदत करणार नाही म्हणून दत्ता गाड्या शोधत होता, एका बस मधून आज्जीनं उभ्यानेच दत्ताला हात केला, गाडी कोणती होती हे सांगता येणार नाही दत्ता तसाच गाडीत शिरला गाडी गच्च भरलेली होती तेवढ्यात कंडक्टर आला चला पुढे मागचे सरका बरं पुढे...आज्जी तिथचं उभी होती दत्ताने एकाला सांगितलं आज्जीला जागा द्या ना.
तसा तो उत्तरतो...
इथं आम्हालाच जागा नाही आणि आज्जीला कुठून जागा देऊ वय झालय तर घरी बसायचं ना गाडीत कशाला गर्दीला यायचं.
तसा दत्ताला राग आला आणि तो म्हणाला तुम्हाला आई असेल ना तिला बोलाल का असं.
जागा नका देऊ पण आदर तर करा.
कंडक्टर:- म्हातारे चल पुढं.
आज्जी:- बा जागा कर रे मला.
कंडक्टर:- तुच विचार लोकांना अन् कर जागा.
तोपर्यंत दत्ता एकाला झापत होता कशीबशी आज्जीला एका बाबांपाशी जागा त्यानं करून दिली. आज्जीनं दत्ताच्या तोंडावरून मायेनं हात फिरवला किती बरं वाटलं त्याला एक चांगली मदत केल्यामुळे, तेवड्यात ड्रायव्हर आला, दत्ताला बाहेर निघायला जागाच नव्हती कसाबसा तो गाडीतून बाहेर आला लोकं त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होते.
आपणही या जुन्या जाणत्या लोकांना मदत करा तुम्हाला चांगले आशिर्वाद मिळतील.
हे आपले कर्तव्य आहे, खर्या अर्थानं ते पार पाडलेच पाहिजे, आज्जीला मदत केली पण अशा कितीतरी म्हातारी माणसं आपल्या आसपास मदतीसाठी आतूर असतात, हि ओढ म्हणजे आपलं अनामिक नातं असावं खरचं किती बरं वाटलं असं दत्ता बोलून तो तिथूनच आपल्या कामासाठी निघून गेला.
नाव:- सतिश संतोष शिंदे.
मौजे.बोतार्डे पो.खानगाव, ता.जुन्नर जि.पुणे ४१०५०२.
Post a Comment
0 Comments