शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पाडण्यात आली व या पार्श्वभूमीवर 2024 ची लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणूकीत संविधान बचाव च्या प्रचाराने आघाडी घेतली व त्याचा फटका महायुतीला विशेष करून भाजपाला बसला. यामध्ये महायुतीचे 41 वरून 17 जागेवर स्थिरावली तर आघाडीला 31+1 जागा मिळाल्या. दलित मुस्लिमांचे एक तर्फी मतदान होऊन होऊन आघाडीला विशेष करून (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या 9 जागा निवडून आल्या. मुस्लिमांनी आघाडीला विशेष करून शिवसेनेला (उबाठा) भरभरून मते दिल्याने त्यांना हे यश प्राप्त झाले. असा प्रचार महायुती कडून सुरु झाला. या विजयावरून भाजपा कडून वोट जिहादच्या प्रचारामुळे बोंबाबोंब सुरु झाली. या वोट जिहादच्या प्रचारावर शरद पवार यांनी पुण्यामध्ये एक विशिष्ट भागातील विशिष्ट समाजाची मते पुर्वापार एकाच पक्षाला मिळतात व हे वर्षानुवर्ष होते. हे आम्ही पहिल्यापासून सहन करून स्विकारत आलो. मग या मतदानाला काय म्हणायच? असा असा प्रति प्रश्न शरद पवार यांनी केला. या दोन्ही बाजूच्या विधानावरून एक गठ्ठा मतदान कसे होते. हे ज्यांना राजकीय अनुभव आहे त्यांना समजते परंतु सर्व साधारण माणसाला यातले कळत नाही कारण तो साध्या दृष्टीकोनातून बघत असतो. त्याला त्या क्षेत्रातील तेथे धर्मानुसार किंवा जातीनुसार असणा-या मतदारांची टक्केवारी माहिती नसते. परंतु जमिनीवरचे वास्तव काय सांगते पाहण्यासारखे मजेशीर आहे.
वांद्रे पश्चिम हा मुस्लिम बहुसंख्यांक असलेला विभाग आहे. 1985 साली महापालिकेची निवडणूक झाली. त्यामध्ये शिवसेना, जनता पक्ष व काँग्रेस पक्ष यामध्ये लढत झाली. त्याकाळी एव्हीएम मशीन नव्हती व महापालिकेची मत मोजणी करावयाची सोपी व साधी पध्दत होती. तेव्हा प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान झाल्यावर मत पत्रिकांची जुळवा जुळव केली जावयाची. वापरलेल्या मतपत्रिका उरलेल्या पत्रिका यांचा हिशोब करून किती मतदान झाले आहे. याची माहिती मत मोजणी मतदान केंद्र अधिकारी, गोळा करून वरिष्ठ अधिकारी त्यांना देत व झाल्यावर मत पेटी बंद करून सिल करित असे. व त्यांना प्रशासनाकडून चहापाणी झाल्यावर त्याच केंद्रात त्या पक्षाचे प्रतिनिधी व कर्मचारी यांच्या समक्ष मत मोजणी होत असे. या मतमोजणी करिता व माझ्या बरोबर बापू देशपांडे होते. मतमोजणी झाल्यावर उमेदवार कोणत्या उमेदवाराला किती मतदान झाले व बाद मते किती याचा तपशील मतदान केंद्र अधिका-यांकडे व तेथून पुढे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे मतदान केंद्र निहाय जात असे. माहिती गोळा करून त्यांची गोळाबेरीज जुळल्यावर मुख्य निवडणूक केंद्र अधिकारी विजयी उमेदवारचे नाव घोषित करून यादी प्रसिध्द करित असे. रात्री 10 वाजेपर्यंत निकाल लागत असे.
या निवडणूकीत जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेच्या उमेदवारामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडूण आला होता
त्याकाळी वांद्रे पश्चिम व पुर्व विधानसभा क्षेत्रात पु.ग. खेर यांचे प्रस्थ होते. ते सतत मुस्लिम मतावर निवडून येत. त्यांचा नंतर अहमद झकोटिया निवडून येत. परंतु 1980 च्या महापालिकेटा प्रथमच पु.ग. खेरांचा (म्हणजेच काँग्रेसचा) उमेदवार प्रभाकर वैद्य यांचा महापालिकेत पराभव होऊन अख्तर जमाल कुरेशी यांचा विजय झाला. प्रथमच सर्व मुस्लिम मतदार अख्तर जमाल कुरेशी यांच्याकडे वळले. त्याकाळी मुस्लिम लीग (फॉर्म) आघाडीवर होती. त्यांचे पुढारी बनातवाला व झियाउद्दीन बुखारी यांचे वकृत्व प्रभावी होते. त्यांनी त्यांच्या वकृत्वाने मुस्लिम समाज ढळवून काढला होता. पूर्वी काँग्रेस, जनतापक्षाला पक्षातला मिळणा-या मतांचे ध्रुवी करण होऊन अपक्ष उमेदवार अख्तर जमाल कुरेशी यांचा विजय झाला. पुढे या पराभवाचा परिणाम होऊन पी.जी खेरांनी वांद्रयाच्या कतल खाना देवनार येथे नेला असे अजून ही जुन्या लोकांमध्ये मानले जाते.
हे राजकारणाची आवड निर्माण झाल्यावर अनुभवलेले पहिले ध्रुवी करण कारण त्याकाळी काँग्रेसचा पराभव होणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट होती. त्यानंतर 1990-92 व लोकसभेची निवडणूकी मध्ये मतमोजणी प्रतिनिधी म्हणून गोरेगाव येथील NSC येथे मतमोजणी प्रतिनिधी या नात्याने उपस्थित होते. तेव्हा देखील मत मोजणी टेबलावर मतदार यादीच्या क्रमांनुसार मतमोजणी केंद्रामध्ये मतपेट्या येत व पडताळणी नंतर मतमोजणी सुरु होत असे. आमचा विभाग मुस्लिम बहुबल असल्याकारणाने आमची मत मोजणी केंद्रात फजिती होत असे. प्रभागातील पाच सहा मतदार यादी क्रमांक आम्हाला पाठ होती. जेव्हा त्या मत पेटया आमच्या टेबलावर येत तेव्हा शिवसेना भाजपा युतीला म्हणजेच दोन अंकी मतांचा आकडा देखील मिळत नसे. सुनिल दत्त यांना एक गठ्ठा मतदान होत असे. विधान सभेला देखील हेच चित्र असे. मतांचा होणारा पाऊस हे चित्र पाहुण पहिला वेळेस आम्ही आश्चर्य चकित झालो. पुढे पुढे ते अंगवळणी पडले होते. यावर उपाय व तोडगा म्हणजे उमेदवार किंवा पक्ष त्या विभागावर प्रचारावर व प्रसार साहित्यावर जास्त शक्ती व पैसे खर्च करित नसे. याच दरम्यान टी. एन. शेषन हे निवडणूक आयुक्त बनले व त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये ब-याच सुधारणा केल्या. त्यातील महत्वाची एक म्हणजे प्रत्येक टेबलावरील मत पेटयांची मतमोजणी अधिकारी व पक्षांचे प्रतिनीधी यांच्या कडून मतपेटीची तपासणी झाल्यावर त्या मत पेटयांचे सिल चेक करून मत पत्रिकांचे व 100 व 50 चे गठ्ठे करून त्या मतपेटीत
भरून ते मतपेटीतील गठ्ठे एका हौदात टाकत व त्या सर्वांना एकत्र व वर खाली करुन प्रत्येक टेबलांवर एक एक हजार मत पत्रिका मोजण्यासाठी देत व त्यानंतर मतमोजनी होत असे. त्यामुळे कुठल्या प्रभागातील मतदार यादीत कोणत्या उमेदवाराला किती मतदान झाले आहे हे समजण्याचे बंद झाले. परंतु ई व्ही एम मशिन मुळे पुन्हा पक्ष प्रतिनिधीना आपल्या उमेदवाराला कोणत्या मतदार यादीत किती मत मिळाली हे समजू लागले.
परंतु एक गोष्ट नमूद केली पाहिजे की 1990 च्या महापालिकेच्या निवडणूकीत प्रभाग क्रमांक 72 च्या भाजपाच्या उमेदवार या महाराष्ट्र नगरच्या मुस्लिम मतांवर निवडून आल्या. तसेच प्रभाग क्रमांक 73 काँग्रेसचा बिगर मुस्लिम उमेदवार यांना देखील मुस्लिमांनी एक गठ्ठा मतदान केले होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यानंतर 2014 व 2019 मध्ये देखील काही प्रमाणात मुस्लिम मते बिगर मुस्लिम उमेदवारांला मिळताना दिसून आले. तसे ही काँग्रेसचा मुस्लिम मतदानांचा जनादार कायम होता.
समाजवादी पक्ष निर्माण झाल्यावर मुस्लिम मतांचे विभाजन सुरु झाले त्यानंतर काही प्रमाणात ती मते इतर पक्षाकडे वळू लागली होती. पुर्वी शाखेपासून दोन हात लांब राहणारी मुस्लिम तरुण 10 वर्षापूर्वी पासून गटप्रमुख बनु लागली शाखेत भाजपाच्या कार्यालयात देखील जाऊ लागली. पुर्वीचे कार्यकर्ते स्वखर्चाने पक्षाचे कार्य करित होते. तसतसे प्रत्येक निवडणूकीत मोबदला मिळू लागला तसेतसे मुस्लिम कार्यकर्ते पक्षात दिसू लागले.
तेव्हा हा एक गठ्ठा मतदानाचा काँग्रेस पासून सुरु झालेला प्रवास पुन्हा काँग्रेस कडे वळू लागला असे वाटू लागले. अर्थात तो का वळू लागला हा राजकीय विषय आहे. त्याचप्रमाणे काही प्रभागात मराठी, गुजराती, उत्तर भारतीय अशी लोकवस्ती आहे. तेथे देखील थोड्या फार प्रमाणात एक गठ्ठा मतांचे प्रमाण दिसून येते. तेव्हा त्या त्या समाजाच्या मतांच्या संख्येनुसार काही प्रमाणात हे आढळून येते म्हणूनच तर उमेदवार निवडताना जात बघितली जाते हे आपण वर्तमान पत्रातून वाचत असतो.
नुकताच झालेल्या 15 व्या विधानसभेच्या निवडणीत वोट जिहाद वैगेरे काही न होता लाडक्या बहिणीची लाट आली. या लाटेत वोट जिहाद वाहून गेले असे म्हणावे लागेल. कारण कोणत्याही पक्षाने वोट जिहादचा एका शब्दाने देखील उच्चार केला नाही. शेवटी मतदारांची मानसिकता आताच्या भाषेत सांगावयाचे तर नेरेटिव्ह काय सेट होते ते शेवटच्या तीन चार महिन्यातील वातावरणावर बरचेसे अवलंबून असते.

Post a Comment
0 Comments