अपर्णा कर्णिक उद्योग जगतातील एक अतिशय ख्यातनाम नांव. रुबाबदार, प्रभावी व्यक्तिमत्व, कुशाग्र बुद्धी, जिद्दी आणि कष्टाळू प्रवृत्ती यामुळे यशाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान. यश वाढलं, समृद्धी वाढली आणि सहाजिकच उद्दामपणा आणि गर्व देखील वाढला, परीणामी माणुसकी कमी झाली.
आज त्यांच्या बंगल्याजवळ नवीनच बांधण्यात आलेल्या "सुरज" बंगल्याकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्याला कारणही तसंच होतं, त्या बंगल्याला भरपूर लाइटिंग केलं होतं. "सुरज" नांव वाचुन त्यांना पटकन आठवले, पंधरा-सोळा वर्षांपूर्वी पुण्यात असताना त्यांना एक मोठा मानसिक धक्का बसला, नैराश्य आले, वैफल्य आले आणि अशा या नाजूक अवस्थेत मॅडमला मानसिक आधार, धैर्य आणि कधी कधी आर्थिक मदतही करणाऱ्या तरुणाचे नांव देखील सुरजच होते.
त्यानंतर मॅडम मुंबईला आल्यात, लहानसा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू त्याचे खूप मोठ्या साम्राज्यात रूपांतर केले. सुरज हे नांव मॅडमच्या स्मृतीपटलावरून जवळ जवळ पुसले गेले होते.
साधारणतः ६ महिन्यांपूर्वी मॅडमला फोन आला.
गुड मॉर्निंग अपर्णा, मी सुरज बोलतोय. मला तुला भेटायचंय.
हा नक्कीच काहीतरी मदत मागणार, मॅडम जुने उपकार विसरल्यात.
त्यांनी सूरजला सांगितले, मी खूप बिझी आहे, मला अजिबात वेळ नाही त्यामुळे यापुढे फोन करायचा नाही, समजलं? उद्दामपणाने मैत्रीवर मात केली होती.
मागील आठ-दहा महिन्यांपासून मॅडमच्या आईंना बरं नव्हतं. दोन तीन लहान ऑपरेशन्स आणि मागच्या आठवड्यात एक खूप मोठे ऑपरेशन झाले. "बी निगेटिव्ह" या ब्लड ग्रुपचे शॅार्टेज. रसिका म्हणजे मॅडमच्या सेक्रेटरीने तिच्या नेटवर्कमधून "काका" नांवाच्या व्यक्तीला गाठले. काका, काकु आणि त्यांचे दोन भाऊ, सगळ्यांचा एकच ब्लड ग्रुप, बी निगेटिव्ह. सगळे रक्त देण्यासाठी तयार, एकदा नव्हे तर गरज पडल्यास दोनदा सुद्धा.
रसिकाची ऑफरच तशी फक्कड होती. एकदा रक्त दिल्यानंतर पंचवीस हजार रुपये देईन. काकांच्या फॅमिली ने ६ बॉटल्स रक्त दिले.
रसिका - काका हा घ्या दीड लाख रुपयांचा चेक
काका - पैसे नकोत मला
रसिका - कमी वाटतात का? ठीक आहे, मी दोन लाख रुपये देते. पण एक अट आहे, गरज पडली तर तुम्हाला अजून रक्त द्यावं लागेल.
काका - मला पैसे नकोत पण एक विनंती आहे. हे पाकीट तुम्ही अपर्णा मॅडमना द्या.
रसिकाने दिलेले पाकीट मॅडमने उघडले. मॅडमच्या पब्लिश झालेल्या काही कथा, कविता, लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया. मॅडम भारावल्यात. शेवटच्या पेजवरची कविता, १५ वर्षांपूर्वी, सुरजने मॅडम साठी लिहिलेली.
माझे जीवन ही एक नौका आहे
तू त्याची नाविका आहेस
तुफान वादळालाही
न डगमगणारी
पैलतीर खूप दूर आहे
वादळ खूप क्रूर आहे
देशील ना साथ मला
सुखरूप पोहोचण्यासाठी?
मॅडमनी अर्ध्यावर साथ सोडली. ना कधी चौकशी केली, ना उपकाराची जाणीव ठेवली. सर्व काही विसरून, स्वतः मात्र गरूडझेप घेतली.
शेवटच्या दोन ओळी-
हा अनमोल साठा देण्यासाठीच मला तुला भेटायचे होते. मी माझ्या पूर्वीच्या जागेवरच आहे पण तू मात्र खूप पुढे निघून गेलीस.
मॅडम, माफ करा, अनवधानाने एकेरी ऊल्लेख केला. आणि हो, आज स्वातंत्र्यदिन म्हणजे तुमचा वाढदिवस. जीवेत शरद: शतम!
अपर्णाने आसवांना मनसोक्त वाट करून दिली. रात्र होऊनही, अपर्णाचा सुरज मात्र मावळला नव्हता.
-दिलीप कजगांवकर, पुणे
Post a Comment
0 Comments