Type Here to Get Search Results !

लेख - सार्वजनीक गणेशोत्सवाची बदलत चाललेली परिभाषा

 


गणेशोत्सव म्हटला की चाकरमानी कोकणात जाणार म्हणजे जाणारच. त्यात काही तडजोड नाही. सर्व परिवार एकत्र येतो. छान सासू-सुनांमध्ये, जावा-जावांमध्ये संवाद साधला जातो. सर्व मुलं आपल्या दुरून आलेल्या चुलत भाऊ बहिणीसोबत मज्जा करतात, आपली खेळणी, काही गुपितं एकमेकांना सामायिक करतात आणि उत्सव आनंदात साजरा केला जातो. घरी जायची वेळ आली की एकमेकांच्या गळ्यात पडून रडणं सुद्धा होतं. असे हे उत्सव असतात एकमेकांना जोडणारे, दूर गेलेल्यांनाही एकत्र आणणारे. नातेसंबंध दृढ करणारे.

   अशाप्रकारे राष्ट्र, राज्य एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, एकमेकांमध्ये बंधूभावाची भावना निर्माण व्हावी. सुसंस्कृत भारत घडवतानाच माणसा माणसात एकजुट निर्माण करायची होती. उंबरठयाबाहेरची नाती सुद्धा बळकट व्हावीत हा विचार मनात ठेऊन लोकमान्य टिळकांनी १८९३ साली सार्वजनीक गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी आपल्या देशावर परकीय सत्तेचा अंमल होता. त्यामुळे पारतंत्र्यातून बाहेर पडण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे होते. या उत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतील, विचार विनिमय होतील, काही ठोस पावले उचलली जातील. ही एक प्रांजळ भावना ठेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाचा विडा उचलला गेला. 

   आता देश तर स्वतंत्र झाला. नुसताच स्वतंत्र नाही तर देशाने अमृतमहोत्सव साजरा केला. सगळाच आनंदी आनंद. देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब झाला शेवटी त्याचे काय हा प्रश्न उरतोच. ज्या उत्सवाचा उद्देश एकत्र येऊन मजबुत राष्ट्र निर्माण करायचे असा होता तोच देव आता बंदिस्त ठेऊन जनतेला दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लाऊन दाखवला जातोय. अधिकचे पैसे घेऊन एका क्षणात गाभाऱ्यापर्यंत जाऊ दिले जाते. हवा तेवढा वेळ दर्शनासाठी दिला जातो आणि ५-६ तास... काय अधिकच हो...!! रांगेत उभे राहून जेव्हा देव पहायची वेळ येते तेव्हा सरळसरळ हाताला ओढून सक्तीने पुढे ढकलले जाते. त्या देवाच्या पायावर डोके काय; तर साधा स्पर्श करून पायाही पडू दिले जात नाही. पाहिलं जात नाही आपण आपल्या माते सामान असलेल्या बाईसोबत हे कृत्य करतो आहोत. केवळ एका दर्शनाच्या क्षणासाठी एवढा वेळ पाय मोडत उभं राहणं आणि पुढे काय तर शून्य. काही मंडळांनी तर या उत्सवाला बीभत्स रूप दिले आहे. रात्रीच्या जागरणाच्या निमित्ताने मंडपात पत्यांचा डाव रंगतो, बाप्पाची मिरवणूक विक्षिप्त अंगविक्षेप करुन, नृत्य करुन, अश्लील द्विअर्थी गाणी वाजवून, बेंजो, लेझर लाईट, डीजे, प्रसंगी दारू पिऊन सुद्धा काढली जाते. हा एवढा भयंकर प्रकार कुठल्या संस्कृतीत मोडतोय !! एकत्र येण्यामागचा हा एवढा घृणास्पद विचार होता का सार्वजनिक गणेशोत्सवचा? लोकमान्यांना खरंच हे अपेक्षित होतं का? सामान्य जनतेकडून सक्तीने विशिष्ट आकडा निश्चित करुन वर्गणी गोळा करणे. देव आणि भाव यातील रेषाच आता अस्पष्ट झाली आहे. या प्रकाराला चाप लावणारी काही यंत्रणा आहे की नाही...? आणि पुढे हे असचं चालू राहीलं तर नव्या पिढीच्या ताटात काय वाढून ठेवले असणार हा विचारच अत्यंत चिंताजनक अ‍ाहे.


कल्पना मापूसकर

मीरारोड, ठाणे

90826 46494

Post a Comment

0 Comments