Type Here to Get Search Results !

कवी सुमेध सोनवणे लिखित काव्य रचना "दुर्मिळ"



थोडं पुढे चालत ये मित्रा...

खूप मागे राहिलास बघ!

पण आता बदललंय जग...


स्क्रोल आणि ट्रोल करण्यात देश आघाडीवर आहे म्हणे!

पण तू मागे राहून नक्की काय शोधायचा प्रयत्न करतोयस?


बालपण?

नको शोधू!

ते तर कधीच हरवलंय...


तारुण्य?

ते पण उतार वयाकडे कधीच सरकलंय...


आठवणी?

त्या हल्ली सोयीप्रमाणे काढल्या जातात...


मैत्री?

हा...ती सहीसलामत आहे बघ!


कारण....

माझ्या फ्रेंडलीस्ट मधून मी तुला अजून तरी काढलेला नाही...

आणि तुला डिस्टर्ब् नको म्हणून कधी आपुलकीचा एकही मेसेज धाडलेला नाही...


तरी तू न चुकता माझ्या बिनकामाच्या पोस्टवर कायम बदाम देत राहिलास...

अरे! बदाम वरून आठवलं, ते झाड अजून आहे का रे?

त्याला टांगलेला झोका आजही झुलतो का?

सरपंच गावाच्या विकासावर काही बोलतो का?

तिला शोधताना पायात मोडलेला काटा आजही सलतो का?


अरे चालता चालता सांग हवं तर...

बरं कुठं पर्यंत आलास?

ये बाबा! असा मागे नको ना राहत जाऊ...

जग किती पुढे गेलंय!

तुला वाटतं तसं आता अजिबात राहिलेलं नाही...

जो मागे पडला त्याच्याकडे पुन्हा कोणीच पाहिलेलं नाही...


तसंही...

काय ठेवलंय रे त्या खेड्यात?

लोक काढत नाही का तुला वेड्यात?

झाडं काय लावतोय!

शेती काय पिकवतोय!

आणि पोराबाळांना पण हेच शिकवतोय?


शेतकरी होऊन तुला पण लटकायचंय काय?

जसा मी लटकतो रोज ट्रेनच्या दाराला...

ना तुझ्याकडे वरुणराजा बरसण्याची खात्री...

ना माझ्याकडे घरी परतण्याची खात्री...

दोन भिन्न प्रवासाचे आपण यात्री...

तरी जपली ना रे मी मैत्री?


बरं कुठं पर्यंत पोचलास?

थोडा अजून पुढे आलास की, मी हाती घेतलेला झेंडा तुला फडकताना दिसेल...

रंग तुझ्या आवडीचा नसला तरी त्याच्याकडे बघतच तुला चालावं लागेल...

नाहीतर माझ्या पर्यंत पोचायला तुला फार उशीर होईल...


म्हणून लवकर ये मित्रा...

खरं सांगायचं तर मी पण आता थकलोय रे!

या रंगांचे भारे वाहून आणि धूर्तांना शरण जाऊन...


मलाही शिकव ना रे तुझ्यासारखा बंड करायला...

जसा तू कायम अन्यायाविरुद्ध करत आलास अगदी तसाचं...


माझं हे असं वागणं आणि बोलणं तुला विचित्र वाटत असेल ना?

पण खरंच सांगतोय मित्रा!

परिवर्तन करू पाहणाऱ्या माझ्या या दुर्मिळ विचारांचा तू आता साक्षीदार होणार आहेस...


सुमेध वंदना मधुकर सोनावणे 

9967162063

Post a Comment

0 Comments