प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
तीर्थक्षेत्र पारुंडे (ता. जुन्नर )येथील महिलांनी एकत्र येऊन वेद कस्तुरी कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी ८ मार्च रोजी महिला दिन अत्यंत उत्साहात व हसत खेळत साजरा केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.कल्याणी पुंडे होत्या. महिलांचे प्रेरणास्थान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. श्री ब्रह्मनाथ विद्यालयाच्या माजी शिक्षिका मंगल तांबे यांनी प्रास्ताविक करताना महिला दिनाचे महत्त्व सांगून सर्वांचे स्वागत केले. उपस्थित अनेक महिलांनी समाजातील महिलांचे स्थान व आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कल्याणी पुंडे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण कुटुंबाचा आधार व संस्कार आहोत. कुटुंबा ची जबाबदारी सांभाळत असताना धावपळीच्या युगात स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष देणे खूप आवश्यक झाले आहे. आजार सांभाळत बसू नका. वेळच्यावेळी संपूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्या. महिलांमध्ये हिमोग्लोबिन व कॅल्शियमचे प्रमाण खूपच कमी होत आहे. स्वतः सक्षम असाल तरच कुटुंबाची जबाबदारी पेलू शकाल. आपल्याला हे सोनेरी दिवस ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर अशा अनेक मातांमुळे आलेले आहेत. त्यांना आपण कधीही विसरू शकणार नाही. या कार्यक्रमात माजी सरपंच सविता जाधव, डॉ. कल्याणी पुंडे, मंगल तांबे, मंदाकिनी पवार, जरीना शेख, अर्चना पवार ,मीना जाधव अशा महिलांसह मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता जाधव तर आभार मंगल तांबे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

Post a Comment
0 Comments