Type Here to Get Search Results !

नारायणगावात "रोटरी गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024"ने शिक्षक सन्मानीत.



शिक्षक दिनानिमित्ताने रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष हेमंत महाजन यांनी दिली.       


                   

नारायणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक सन्मान सोहळ्यात शिक्षकांचा सन्मान जुन्नर तालुक्यातील युवा नेतृत्व कांदळी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमितशेठ बेनके व प्रेरणादायी वक्ते रतिलाल बाबेल यांच्या हस्ते करण्यात आला. 



यावेळी प्रास्ताविकात अध्यक्ष हेमंत महाजन यांनी शिक्षकी पेशा इतर पेशांना तयार करण्याचे काम करतो.तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पिढ्यांपिढ्यांचे भवितव्य घडते.रोटरीचा सेवाभाव,माणसे जोडण्याची कला आणि संधी यामुळे रोटरीचा लौकिक निरंतर वाढत असल्याचे सांगितले. 



शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रमुख वक्ते रतिलाल बाबेल यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.नवीन पिढीच्या गरजा आणि त्यांची साधने यांची शिक्षकांनी ओळख करून घेतली तर शिक्षक बदलत्या काळातही प्रभावी भूमिका बजावू शकतात.तसेच वाचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या दोन गोष्टी शिक्षकांना नेहमीच आवश्यक आहेत.जे शिक्षक या गोष्टी आत्मसात करतील ते अधिक प्रगती साधतील असे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अमितशेठ बेनके यांनी शिक्षकांना नियोजित कामाबरोबरच इतर अनेक कामे आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण येतो.परंतु तो सांभाळत विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक कसोशीने निभावतात आणि म्हणून ते आदर व सन्मानास पात्र ठरतात असे नमूद केले.

यावेळी सत्कारार्थींच्या वतीने अनुपमा पाटे यांनी मनोगत व्यक्त केले.शिक्षकांच्या कामाची दखल घेऊन रोटरीसारखी सेवाभावी संस्था शिक्षकांचा सन्मान करते हे गौरवास्पद असून रोटरीच्या कार्यामध्ये शक्य तेथे सहभागी होण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू असे त्यांनी सांगितले. 

शिक्षक सन्मान सोहळ्यात दिनेश मेहेर,मंदाकिनी शिंदे,सुषमा वाळिंबे,सीमा कुलकर्णी,अनुपमा पाटे,सुनिता पारखे,संजय वलटे,अभिजित कुंभार,वैशाली पुंडे,भारती इंगळे,अमृता बंगाळ, मोनाली हांडे,सुविधा धुमाळ,संध्या डेरे या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजन माजी अध्यक्ष मंगेश मेहेर यांनी केले.तर फर्स्ट लेडी सीमा महाजन,निर्मला मेहेर,धनश्री बेनके,डॉ.सीमा जाधव,छाया गायकवाड,रेखा ब्रह्मे व सर्व रोटेरिअन्स् यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन घोडेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments