Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कथा -लेखक दिलीप कजगांवकर लिखित मिनी स्कर्ट कथा



आठ महिने सिंगापूरला राहून राज भारतात परतला. येताना त्याने दोन सुंदर मिनी स्कर्ट्स आणलेत, एक काळा नी दुसरा निळा.


हे दोन मिनी स्कर्ट्स कुणासाठी? नेहाने विचारले. निळा माझ्या राणीसाठी म्हणजे तुझ्यासाठी आणि काळा रीनासाठी, राज उत्तरला.


मिनी स्कर्ट्स ऐवजी मिडी आणायला हवी होतीस, नेहाने नाराजी व्यक्त केली. नेहा, अगं, रीनाला मिनी स्कर्ट आवडतो आणि तीला छानही दिसेल.


रीनाची आवड तुला कशी माहीत? नेहाचा प्रश्न मनातल्या मनात. राजचे रीना-प्रेम नेहाला फारसे रूचले नव्हते.


नाश्ता झाल्यावर नेहा जिमला गेली, येताना किराणा आणि भाज्या, फळे घेऊन आली.


दारावरची बेल वाजली. आलेत का जिजाजी? मॅाडेलिॅग क्षेत्रातील सुंदरी आणि मागच्याच महिन्यात राहायला आलेली नवी शेजारीण विचारत होती. रीना आज खुपच छान दिसत होती. रीनावर काळा मिनी स्कर्ट अतिशय खुलुन दिसत होता आणि अचानक नेहाची ट्यूब पेटली. मी जिमला गेले तेव्हा राजने दिलेला दिसतोय रीनाला मिनी स्कर्ट. दोघांनीही एवढ्या घनिष्ठ मैत्रीचा अजिबात थांगपत्ता लागू दिला नाही. 


रात्री निवांत येते जिजुंना भेटायला, म्हणत रीना अॅड शुटसाठी निघून गेली.


नेहा, रीनुला फोन करुयात का? चहा पीता पीता राजने विचारले. रीनाची एकदम रीनु? नेहा मनातल्या मनात संतापली. फोन करायची काहीच गरज नाही, रात्री येणार आहे रीनु तुला भेटायला, नेहाचा आवाज वाढला होता. 


रीनु येणार आहे म्हणतेस? कधी निघाली ती नासिकहून? राजने विचारले.


राज, तु माझी बहिण रीना बदल बोलतोस? 

हो अर्थातच. मग दुसरी कोणी रीना आहे का? राजने आश्चर्याने विचारले.


राज, मला वाटले, तु आपली नवीन शेजारीण, मॅाडेल रीना बद्दल बोलतोस. 


मॅाडेल, म्हणजे रीना खुप सुंदर आणि आकर्षक असणार, नक्कीच एखाद्या नटीसारखी असणार! तीला भेटायला आवडेल मला.


हो, हो, नेहा चिडून म्हणाली. 


नेहा, तुला मिनी स्कर्ट आवडत नाही मग देऊ या का तो मॅाडेल रीनाला?


नको, माझ्यासाठी आणलास ना? मग मीच वापरते, कशाला नाराज करायचे तुला?


मिनी स्कर्ट शेजारीण रीनाला न दिल्याने, की नेहाने न वापरण्याने राज नाराज होणार होता, हे चाणाक्ष वाचकांना समजले असणार यात शंका नाही.


-दिलीप कजगांवकर, पुणे

७७७००२५५९६

Post a Comment

0 Comments