Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कथा -लेखक दिलीप कजगांवकर लिखित भूताचा सहवास



गोष्ट तशी बरीच जुनी आहे, मी नववीत शिकत असतानाची. आमचं घर शहरापासून थोडसं दूर होतं. उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, शहरात जाऊन भाजी आणि फळं घेऊन येशील का? आईने विचारले. 


सायकल चालवायला मिळेल आणि मित्रांनाही भेटता येईल म्हणून मी आनंदाने म्हणालो, हो नक्की जाईन. संध्याकाळी मी शहरात गेलो, आईने सांगितलेल्या भाज्या आणि फळं विकत घेतली, त्यानंतर मी माझ्या मित्रांना भेटलो. छान गप्पागोष्टी, त्यानंतर जेवण झाले. मी घरी यायला निघालो तेवढ्यात एक मित्र म्हणाला, अरे जवळच्या चित्रपटगृहात एक छान पिक्चर लागला आहे, बघायचा का आपण? सगळ्यांचा एक मुखाने होकार आला आणि आम्ही तो भूताटकी, सस्पेन्स आणि थ्रिलर असलेला पिक्चर बघितला. 


पिक्चर संपला त्यावेळी रात्रीचे बारा वाजले होते. नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांना ओले चिंब करून वातावरणात कमालीचा गारवा आणला होता. दुतर्फा हिरव्यागार गर्द झाडीतून जाणाऱ्या, वळणा वळणाच्या आणि चढ उताराच्या त्या निर्मनुष्य रस्त्यावरून मी एकटाच घरी जायला निघालो. अमावस्येची रात्र, रस्त्यावर लाईट नव्हते, सर्वत्र काळोख नी भयाण शांतता. 


आत्ताच बघितलेल्या पिक्चर मधील गाणं नी संवाद गुणगुणत मी सायकल चालवत होतो. 

     पुढे आहे भूत 

     मागे आहे भूत 

     वरती आहे भूत 

     खाली आहे भूत 

     मी भूताला नाही

     अजिबात घाबरत

ए भूता, कुठे लपलास? घाबरलास ना मला? ये बाहेर ये, बघतोच तुझ्याकडे.


मागून कसलासा आवाज आला म्हणून मी मागे वळून बघितले आणि दचकलोच. दूरवर पांढरा शुभ्र शर्ट, पांढरी पॅन्ट आणि पांढरी टोपी घातलेली एक व्यक्ती, थोडीशी वाकून हळूहळू पुढे येताना मला दिसली.


मी सायकल चालवण्यावर लक्ष केंद्रित केले. मुळातच चढ असल्याने सायकलचा वेग थोडासा कमी झाला होता. पण आता तर खूप जोर लावला तरी सायकल फारशी पुढे जात नव्हती, नक्कीच कुणीतरी माझी सायकल मागे ओढत होते आणि आता तर सायकल अजिबातच पुढे जात नव्हती. थोड्या वेळापूर्वी दिसलेली ती व्यक्ती भूत तर नसेल? भूताला हात हवे तितके लांब करता येतात असे मी वाचले होते. मी घाबरून ओरडलो, कोण आहे? का माझी सायकल पकडलीस? कसलाही रिस्पॉन्स आला नाही. मी वळून बघितले, मागे कोणीही दिसत नव्हते. नक्कीच कोणती तरी अदृश्य शक्ती होती. मी घाबरतच सायकलवरून उतरलो आणि बघतो तर काय! सायकलची चाके चिखलात रूतली होती एवढेच नाही, तर मागचे चाक पंक्चरही झाले होते. 


मी निर्णय घेतला की सायकल रस्त्याच्या कडेला लॉक करुन ठेवायची आणि एखादे वाहन दिसल्यास लिफ्ट मागायची, नाही तर सरळ चालत चालत घरी जायचे. सायकल झाडाखाली लॉक करून मी घराच्या दिशेने चालायला लागलो.  


मागून येणारा तो आवाज आता स्पष्ट ऐकू येऊ लागला होता. मी मागे वळून बघितले, हो तो एक टेम्पो होता, बहुधा हेड लाईट खराब झाले असल्यामुळे सावकाश पुढे येणारा. 


टेम्पो जसा जवळ आला तसा मी पटकन ओरडलो, ड्रायव्हर काका, मला लिफ्ट देतात का? माझी सायकल पंक्चर झाली आहे, प्लीज मला लिफ्ट द्या ना.


टेम्पो सरळ पुढे निघून गेला, पण थोडा पुढे गेल्यावर थांबला. कदाचित ड्रायव्हर काकांनी माझा आवाज उशीरा ऐकला असावा. मी पटकन पळत पुढे गेलो आणि दोन्ही बाजूंनी बंद पण मागून उघड्या असलेल्या त्या टेम्पोमध्ये उडी मारून चढलो.


घरी पटकन पोहोचणार या विचाराने मी आनंदलो. त्या भयाण अंधाराला आणि स्मशान शांततेला मी मनातून घाबरलो होतो. अगदी गरजेच्या वेळी मला लिफ्ट मिळाली होती. मी ड्रायव्हर काकांना म्हणालो, ड्रायव्हर काका, थँक्यू सो मच, तुम्ही माझ्यासाठी टेम्पो थांबविला. अहो, मी जरा घाबरलो होतो. ड्रायव्हर काकांचा काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हणून मी नीट बघितले आणि दचकलोच. सीटवर ड्रायव्हर काका नव्हते, टेम्पो मात्र पुढे जात होता. मी घाबरून डोळे मिटून घेतले. एक-दोन मिनिटांनी मी डोळे उघडले आणि पाहतो तर काय, ड्रायव्हिंग सीटवर ड्रायव्हर काका नव्हतेच परंतु ड्रायव्हिंग व्हिलवर एक हात स्पष्ट दिसत होता. कोणतीतरी अज्ञात शक्ती टेम्पो चालवत होती.


थोडा धीर एकवटून मी पुन्हा बघितले. थोड्यावेळापूर्वी मला दूरवर दिसली होती अगदी तशीच, पांढरा शुभ्र पोशाख आणि पांढरी टोपी घातलेली व्यक्ती आता टेम्पो चालवत होती. माझी घाबरगुंडी उडाली.


पुढच्या मिनिटाला ड्रायव्हिंग सीटवर कोणीही नव्हते, त्यानंतर ड्रायव्हिंग व्हिलवर फक्त एक हात, नंतर दोन्ही हात, त्यानंतर पांढऱ्या शुभ्र कपड्यांतले ड्रायव्हर काका सीटवर बसलेले. सगळंच विचित्र, भयानक, काळजात धडकी भरवणारं. मी स्वतःला चिमटा काढून नक्की केले की ते स्वप्न नव्हते.


भूताटकीचा तो प्रकार पाहून मी घाबरलो होतो, थरथरत होतो. त्या थंडगार वातावरणातही मला दरदरून घाम फुटला. भूताने माझे गाणे गुणगुणणे नी त्याच्या बद्दलची अरेरावीची भाषा ऐकली असावी. माझा आगाऊपणा मलाच नडला होता.


आईकडून मी ऐकले होते की भूत रामाला घाबरते म्हणून मी रामरक्षा म्हणायचा प्रयत्न केला. रोज संध्याकाळी धाड धाड रामरक्षा म्हणणाऱ्या मला रामरक्षा आठवत नव्हती. एवढेच काय, तोंडातून राम शब्दही बाहेर पडत नव्हता. मी थरथरत राम, राम नव्हे तर रमा, रमा म्हणत होतो.


थोड्या वेळाने टेम्पोचा वेग कमी झाल्याचे मला जाणवले. मी टेम्पोतून खाली उडी मारली आणि पळणार तोच कुणीतरी फाड फाड माझ्या कानाखाली वाजवले. मी जीव मुठीत घेऊन पळताना स्पष्टपणे ऐकले. अरे मूर्ख मुला, माझा टेम्पो बंद पडला म्हणून मी तो ढकलतोय आणि तू चक्क आरामात आत जाऊन बसलास आणि तेही माझ्या मुलीचे नांव घेतोस रमा रमा रमा. निर्लज्ज कुठला.

आजही तो प्रसंग आठवल्यावर माझे अंग शहारते. 


-दिलीप कजगांवकर, पुणे

७७७००२५५९६

Post a Comment

0 Comments