Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार फिरस्तीच्या वाटेवर सदर -तो काळ...



शाळा म्हटलं की, एक आदरयुक्त भिती वाटायची शिक्षकांचा धाक अन् शिकविण्याची व मारण्याची भिती यामुळे कधी कधी पोरं शाळा बुडवून घरी रहायची पण गुरूजी घरी न्यायला यायचेच गुरूजी घरी आलेत म्हटल्यावर छातीचा भाता जोरजोराने वर खाली व्हायचा गुरूजी आईबापाला बाजूला व्हायला सांगायचे अन् घरात सांधी कोपर्‍यांत पडलेलं फाटक्या हातपिशवीच दप्तर त्यात एक किंवा दोनच फाटकी पुस्तकं आणि एक खापराची पाटी आणि एक हातातही बसणार नाही एवढीशी पेन्शळ हे शोधून त्यांच्यासमोर धोपटून शाळेत ओढत न्यायचे आम्ही रडून भेकलून जायचो.

शाळेत गेलं की, इतर मुलं ती पण घाबरलेली पण कसं तरी तोंडावर स्मितहास्य करून आमचे सांत्वन करायचे.

सकाळी दहाची शाळा सुरू व्हायची दुपारी  १२ वाजता लघवीला सुटायची शाळेच्या समोरच्या बाजूला एक बांध असायचा पोरं ज्याने त्याने केलेल्या लघवीच्या पाटात लघवी करायचे नंतर शिवाशिवी, दवाखान्याच्या वरील छताच्या पाईपांना हाताने धरत पूर्ण छताला फेरा मारायचे असा पोरांचा दिनक्रम असा असायचा. 

शाळा भरली की गुरूजी आता काय शिकवणार याची मोठी भितीच वाटायची, त्यातल्या त्यात गणित म्हटलं की अंगावर काटाच उभा रहायचा मराठीचे शब्द वाचायचे, पोरं पोरं पुस्तकातील छायाचित्र पाहून एकमेकाला चित्रातील गुप्त गोष्टी वाक्य किंवा चित्र ओळखायला सांगायचे, खापराच्या पाटीवर थुंकून तसाच हाताने पाटी पुसून १ ते १० आकडे आणि एक कोपर्‍यात घर काढून त्यापर्यंत जाण्याचा खटाटोप अशाही प्रकारे पोरांचा खेळ चालायचा, गुरूजींनी शिकवलेल्या गोष्टी, धडे, पाढे हे पाठांतर करावे लागे, पण आमचे कधीच हे पाठांतर झालेच नाही, काही हुशार विद्यार्थी होते त्यांचा भाग निराळा पण आम्ही वेगळ्याच विश्वातील असल्याने कधी शाळेच्या बाबतीत मन तसं रमलंच नाही.

सायंकाळ झाली वंदे मातरम झालं की, आमचं दप्तर पिशवीचे दोन बंद दोन्ही खांद्यावर अडकवले की निघालो आम्ही घरी, पण एक आदरयुक्त भिती त्यावेळी या गुरूजी व शाळेच्या बाबतीत नेहमीच होती.

खरचं छाण दिवस होते ते...

मी चौथीपर्यंत गावातील शाळेतच होतो कधी कधी मुलामुलींची भांडणं पण लागायची पण ते तात्पुरते नंतर दुसर्‍या दिवशी अतिशय प्रेमाणे एकमेकांशी बोलायचे.

शारिरीक शिक्षण कवायत, झाडांना पाणी घालणे निगा राखणे, ज्येष्ठ व्यक्तींचा आदर राखणे हि संस्कारी मूल्ये खरचं शाळेच्या माध्यमातूनच रूजलीत, सकाळी शाळेत जायला उशिर झाला अन् मध्ये रस्त्यात प्रतिज्ञा ऐकू आली तर आम्ही त्याच जागी उभे रहायचो हि देशभक्ती शालेय जीवनात शिक्षकांनीच दिली.

-एक शालेय आठवण.

-सतिश शिंदे- लेखक-८६९८४२३३०९

Post a Comment

0 Comments