Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार फिरस्तीच्या वाटेवर सदर -जोगतीन...

 


खरपुडी ता.खेड जि.पुणे आज चैत्र पोर्णिमेनिमित्तानं मी गेलो होतो, खरपुडी येथील खंडेराया म्हणजे प्रति जेजुरी येथे महाराष्ट्रातून असंख्य भाविक भक्त या ठिकाणी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ये-जा करत असतात.

मी साधारण दुपारच्या दरम्यान गेलो होतो, मंचरवरून राजगुरूनगरला बसने प्रवास केला तिथून खरपुडीला जीप जातात त्या जीपने खरपुडी बु. येथे उतरलो आणि गावातून उजव्या हाताने चालत चालत नदीच्या केटीवरून खंडोबा मंदिराकडे गेलो.

घाटातून प्रवेश केला अन् पायर्‍या चढत असतानाच सहा ते सात स्त्रिया हातात छोटी टोपली टोपलीत एक लाल रंगाचा कपडा त्यावर एक देवीचा फोटो आणि कवडीची माळ होती, प्रत्येक बाया आपल्या डोक्याच्या केसांना मोठ मोठे जाड झालेले केस गळ्यात कवडीच्या माळा कपाळभर कुंकवाचा मळवट लेऊन त्या स्त्रिया येणाऱ्या व जाणार्‍या प्रत्येकाला थांबवून कुंकू लावत व देवीसाठी काहीतरी दानधर्म करा देवी चांगलं करेल असं म्हणत होत्या.

मी पायर्‍या चढलो तेवढ्यात एक स्त्री आली आणि माझ्या कपाळावर कुंकू लावला तसा मी पुढे जात असताना तिने मला टोपलीत पैसे टाकण्याचा आग्रह केला मी खिशातून सुट्टे पैसे काढले आणि टोपलीत टाकले, टोपली पहिलीच पैशाने मजबूत भरलेली होती, साधारणपणे दिवसभर थांबून त्या स्त्रिया पाचशे ते हजार रू कमाई करत असतील.

देवाच्या पायर्‍यांपाशी सहा ते सात स्त्रिया व देवाच्या मंदिरापाशी सात ते आठजणी होत्या.

मी हा सर्व प्रकार पाहत होतो, काही जणी जबरदस्तीने लोकांना अंगारा लावायच्या व लोकांकडे पैसे मागायच्या हा सगळा प्रकार मी पाहून काहीजणींना सांगितलं तुम्ही लोकांना जबरदस्ती करू नका, जे देतील ते घ्या उगाच लोकांना लुबाडू नका.

साधारणपणे हा प्रकार काही लोकं खरपुडी येथीला खंडोबा देवस्थानी गेले असतील तर तुमच्या लक्षात येईलच, मला वाटतं हा जो प्रकार या ठिकाणी होतो यावर लोकांनी काळजी घ्यावी व स्थानिक प्रशासन यांनी लक्ष घालून हा प्रकार थांबवा, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या श्रध्देने येतात परंतु येथे असे प्रकार होणार असतील तर ते थांबवावेत.

देवीच्या जोगतीनी अशा प्रकारे असतात हे मला आज समजलं, अशा प्रकारे दमदाट्या करून लोकांकडून पैसे उकळू नका. लोकं श्रध्देने जे देतील ते तुम्ही घ्याच पण असं करू नका.

भोळे भाबडे भाविक या तिर्थस्थानी येत जात असतात.

मी सूज्ञ नागरिक म्हणून हे सर्व सांगत आहे. आपणही दक्ष व्हा.

एवढीच माफक अपेक्षा.

लेखक- सतिश शिंदे.

Post a Comment

0 Comments