Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार फिरस्तीच्या वाटेवर सदर-निमित्त होतं यात्रेचं...

 


मंगळवार दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी हिवरे पठार गावची यात्रा होती, आम्हाला आठ दिवसांपासून आग्रह करणाऱ्या जना भाऊच्या आग्रहाला मान देण्यासाठी मी दिपक आणि आनंद दादा आम्ही साधारण सहा वाजताच्या दरम्यान बोतार्डे येथून निघालो, राळेगण गावातून सालोबाच्या रस्त्याच्या घाटमाथ्याला आमची गाडी लागली. 

वळणा वळणाच्या रस्त्याने आमची नजर प्रफुल्लित झाली. डोंगराच्या कुशीतील रस्ता किती छाण वाटत होता, रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी लागत होती, त्यात हरेक प्रकारच्या वनस्पती असतील त्या पाहून मन काही केल्या राहवेना आनंद दादांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात मी व्हिडिओ काढू लागलो, मला या नविन परिसराचा मोह आवरेना म्हणून आवाज वार्ताच्या फेरफटका रानमातीचा या प्रायोजित कार्यक्रमासाठी मी सहा ते सात व्हिडिओ आणि बऱ्यापैकी फोटो काढले. 

गाडीवर दिपक आणि आनंद दादांच्या मिष्किल बोलण्याने घाट कधी चढून गेलो हे कळलेही नाही. 

घाटातून जात असताना जनाभाऊचा दिपकला सारखाच फोन यायचा कुठपर्यंत आलेत म्हणून कारण, त्याला आम्ही सांगितलं होतं, आम्ही राळेगण गावातून निघालोय घाटात आलोय, घाटात गावच्या ग्रामदैवत मुक्ता देवीचं मंदिर आम्हाला जाताना दिसलं तिथं देवीच्या दर्शनासाठी व नैवेद्य व बकरं कापायला आलेले काही गावकरी दिसले. 

मंदिरापासून आता जवळचं गावची वेस लागली. सपाट भाग न्याहळत न्याहळत आम्ही जनाभाऊ उभा असलेल्या वेशीपाशी गेलो, जनाभाऊने हाताशी हात मिळवत आमचे मनभरून आभार मानले. 

जनाभाऊ अतिशय चांगला व भडंग स्वभावाचा, जे बोलायंच ते परखड व स्पष्ट बोलणारा जनाभाऊ ही त्याची खासियत आहे. आमची भेट झाल्याबरोबर आदराने त्याने आमचं स्वागत केलं. 

रस्त्यापासून थोड्या उंचीच्या डोंगरावर जनाभाऊचं घरं होतं, आता आम्ही दिपक आणि मी गाडीवरून उतरलो आनंद दादांनी त्या चढत्या रस्त्याने गाडी जनाभाऊच्या घरापर्यंत नेली व तिथं घरासमोर उभी केली. 

जनाभाऊच्या घरासमोरच्या बाजूच्या घराला कुड दिसले त्याचं छायाचित्र टिपलं चौफेर बाजूने पावसाळ्यात व उन्हाळ्यात भिंतीच्या संरक्षणासाठी केलेल्या कुडाची मांडणी किती छाण होती. 

किती छाण व रम्य परिसर, गावात अजूनही काही जुन्या पध्दतीची कौला मातीची घरं होती, आता बऱ्यापैकी घरं सुधारली आहेत, असं जना सांगत होता.  पावसाळ्यात इथं लईच भारी वाटतं म्हणून आम्हाला पावसाळ्यात पण या असं जना बोलला.  घरी जाताच जनाभाऊचे वडिलं आम्ही बाबांना नमस्कार करताचं बाबांनी हसून आमच्या हातात हात देत आमचं स्वागत केलं, माझी पत्रकारीतेची नजर मला गप्प बसून देईना घरांच्या आसपासचे बरेच फोटो काढले व्हिडिओ काढले, अंधार आता बऱ्यापैकी झाला होता, म्हणून मोबाईल आम्ही खिशात ठेवले, जनाभाऊने आम्हाला हात धुवायला पाणी दिले, आम्ही हात धुतले आणि घरात प्रवेश करताच एका कोपऱ्यात चुलीवर मटण शिजत होतं जवळजवळ ते शिजलं होतं, चुलीवर ते उमवण्यासाठी ठेवलं होतं घरात चुल असल्याने थोडा धूर होता, मला माझ्या जुन्या घरातील दिवस आठवले... जनाभाऊची आई दिसताचं आम्ही मावशींना नमस्कार केला. 

या बाबांनो 

या बसा 

अतिशय आदराने मावशीने आमचं हसून स्वागत केलं. 

त्या माऊलीचं खरचं मानावे तितके आभार थोडेच आहेत. 

ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसं किती माणुसकीने ओतप्रोत भरलेली असतात हे आज जाणवलं घरात गेल्याबरोबर जनाभाऊने आम्हाला जेवणासाठी बसायला चटई टाकली, त्यावर आम्ही तिघेजण बसलो बाबा घरात आले, 

म्हणाले की, 

जेवायला लाजायचं नाही.  

अगदी निवांत जेवायचं.

 घाई नाही करायची.

 असं छाण पैकी बोलताच आम्ही होकार दिला 

हो बाबा निवांत जेवतो अगदी घरच्यासारखं 

असं म्हणताचं मावशी चिकणच्या कालवणाचं पातेलं घेऊन आली. 

आम्हाला तिघांना वाढलं जनाभाऊ अजून थोडं चिकण घ्या म्हणून आग्रह करतच होतां..

चिकणचं कालवण आणि गव्हाच्या पिठाच्या चपात्या, मिठ कांदा आमच्या ताटात देत आम्ही निवांत जेवलो. 

मावशी आग्रह करतचं होत्या अजून घ्या म्हणून पण आम्ही जेवलो निवांत.

जेवण झाल्यावर गावच्या समस्या व काही सामाजिक प्रश्न विचारताचं जनाभाऊ उत्तर सांगायचा. 

पाणी अतिशय फ्रिजमधून घ्यावं इतक्या थंड व स्वच्छ पध्दतीचं होतं. उन्हाळ्यात असं पाणी प्यायला मिळावं किती छाण वाटलं. 

पण ते पाणी आणायला विहिरीवर जाऊन ओढून आणावं लागतं असं मावशी सांगत होत्या. 

इकडं पावसाळ्यात पाऊस भरपूर पडतो, वादळ होतं त्यामुळे आई वरसुबाईला विनवणी केल्यावर काही होणारा बाका प्रसंग ओढवत नाही. असं बाबा म्हणाले. 

आमची जेवणं झाल्यावर गावात फेरफटका मारण्यासाठी जनाभाऊ आम्हाला त्याच्या घरापासून उतारावरील गल्लीबोळातून चालू लागला आम्ही पण त्याच्या मागाहून चालत होतो, गावात भारूड होतं त्याच्या स्टेजची तयारी सुरू होती, जनाभाऊ हिवरे पठार गावाची माहिती देत होता. 

हि अंगणवाडी, हि ग्रामपंचायत, तिकडं ती वाडी, तिकडं ते जुनं गावठाण, तिकडं ते वरसुबाईचं मंदिर आहे. हे शेराचं झाडं, तिथं ती वस्ती अशा प्रकारे तो माहिती सांगत होता. 

गावातील वाड्या वस्त्या बऱ्यापैकी दूर दूर होत्या. गावठाणातील घरे बऱ्यापैकी दिसत होती, पण अंधार बऱ्यापैकी होता. बऱ्याच दूरवर कुठेतरी एखादा बल्ब किंवा दोन चार खांबावरती लाईटी दिसायच्या. 

हिवरे पठार गावातून बाकी मिन्हेर खोऱ्यातील पूर्ण गावे व दातखिळेवाडी काले, तांबे या पट्टयातील गावे रात्रीची मुंबईसारखी दिसत होती, जनभाऊ आम्हाला घराच्या समोरील एका टेकडीवर घेऊन गेला इतकी मनसोक्त हवा सुरू होती की, तिथं किती छाण झोप येईल असं आम्ही तिघेही बोलत होतो, आता आम्हाला वेळ व्हायला नको म्हणून आम्ही घरी जायला निघालो, जनाभाऊ, बाबा, मावशी यांचा निरोप घेऊन आम्ही जायला निघालो जनाभाऊ वेशीपर्यंत आम्हाला सोडवायला आला. 

मग आम्ही जनाभाऊला विचारून तिघेही हिवरे पठार गावातून सुखरूप घाटाने उतरलो अशी आमची यात्रेची सफर होती. 

लेखकः- प्रा. सतिश शिंदे.

Post a Comment

0 Comments