Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कथा - लेखक दिलीप कजगांवकर लिखित गुरुदक्षिणा कथा



अॅाफीस संपल्यावर, राज बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभा होता. तेवढ्यात एक मुलगा आला आणि राजला विनवू लागला, साहेब एक फुगा घ्या ना, आज दिवसभरात एकही फुगा विकला गेला नाही, प्लीज घ्या ना एक फुगा. 


राजने त्याच्याकडे निरखून बघितले. साधारणतः १२-१३ वर्षांचा, सावळ्या वर्णाचा, अशक्त मुलगा. राजने खिशातून १०० रुपयांची नोट काढून त्या मुलाला दिली. साहेब माझ्याकडे सुटे नाहीत. तुम्ही असं करा, १ फुगा घ्या आणि उद्या पैसे द्या. मी तुम्हाला रोज या बस स्टॉपवर पाहतो. अरे मी तुला शंभर रुपये देतो राज म्हणाला. चालेल साहेब मग मी तुम्हाला १० ऐवजी १२ फुगे देतो, अगदी आनंदाने तो मुलगा म्हणाला. मित्रा फुगे घेऊन मी काय करणार? मी तुला शंभर रुपये बक्षीस म्हणून देतोय, राजने सांगितले. 

साहेब नको नको तुम्ही फुगे घेणार असाल तरच मी पैसे घेतो, निश्चयी स्वरात तो मुलगा म्हणाला. राजने त्याला समजावले तेव्हा कुठे त्याने ते १०० रुपये घेतले. 


मित्रा, काय नांव रे तुझे? राजने विचारले. शिवनाथ, पण साहेब सर्व मला शिवाच म्हणतात. राजचे आभार मानताना शिवाने उजवा हात वर केला, त्यावेळी खूप मोठी पॉझिटिव्ह एनर्जी मिळाल्याचा राजला भास झाला. 


राज घरी परतला आणि नेहाने गुड न्यूज दिली राज अरे माझा परवा जो इंटरव्यू झाला त्यात माझे सिलेक्शन झाले, असे आत्ताच कंपनीच्या एच आर ऑफिसरने मला फोन करून सांगितले.  रात्री राजचा एका ऑन साईट असाइनमेंट साठी इंटरव्यू होता, इंटरव्यू ठीक झाला. दुसऱ्या दिवशी राज ऑफिसमध्ये पोहोचला आणि काय आश्चर्य! राजच्या मॅनेजरने सांगितले, तुझे ऑन साईट असाइनमेंटसाठी सिलेक्शन झाले आहे. लागोपाठ मिळालेल्या दोन चांगल्या बातम्यांमागे शिवाकडून काल मिळालेल्या पॉझिटिव्ह एनर्जीचा हात आहे असे राजला मनापासून वाटले. 


दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिस सुटल्यावर राज बस स्टॉपवर उभा होता आणि तेवढ्यात शिवा समोरून आला. शिवा आज विचारले नाहीस तू मला फुगे घेण्याबद्दल? राजने विचारले. साहेब कालच तर तुम्ही मला १०० रुपये दिले आणि आज मी कसा विचारणार तुम्हाला? अतिशय नम्रपणे शिवा म्हणाला. राजने शिवाला १०००  रुपये बक्षीस दिले. नको नको साहेब, कालच तुम्ही मला १०० रुपये दिले, आता परत अजून बक्षीस नको, शिवा प्रामाणिकपणे म्हणाला. राजने खूप आग्रह केल्यामुळे शिवाने ते बक्षिस स्वीकारले आणि राजचे आभार मानताना त्याने उजवा हात वर केला. परत एकदा, खूप मोठी पॉझिटिव्ह एनर्जी मिळाल्याचा राजला भास झाला.


आठ दिवस ऑफिस कामासाठी राज बेंगलोरला गेला होता आणि काल रात्रीच तो बेंगलोरहून परतला. ऑफिस सुटल्यानंतर राज बस स्टॉप वर उभा होता. गेले आठ दिवस त्याला शिवा भेटला नव्हता, राजची नजर शिवाला शोधत होती तेवढ्यात कुणाचा तरी किंचाळण्याचा आवाज आला. मोपेडचा धक्का लागून एक आजीबाई रस्त्यावर पडल्यात. बघ्यांची गर्दी जमली परंतु कोणीही आजीबाईंना मदत करायला पुढे येत नव्हते. तेव्हढ्यात एक मुलगा पुढे आला, त्याने रिक्षा थांबवून आजीबाईंना रिक्षात टाकले. त्यांना तो म्हणत होता आजी, घाबरू नका मी तुम्हाला दवाखान्यात नेतो. राजला तो आवाज ओळखीचा वाटला. हो तो आवाज शिवाचाच होता. 


राजनेही रिक्षा घेतली आणि तो शिवाच्या रिक्षा मागोमाग हॉस्पिटलमधे पोहोचला. रिसेप्शनिस्टशी बोलून शिवाचा चेहरा चिंताग्रस्त झाल्याचे राजला जाणवले. शिवाने राजला बघितले आणि तो घाई घाईत राजजवळ येत म्हणाला, साहेब, आजींवर उपचार करण्यासाठी मला २०००  रुपये हवे आहेत

तुम्ही मला प्लीज देतात का? तुम्ही दिलेले १००० रुपये घरी आहेत आणि आई कडून १००० रुपये घेऊन मी २००० रुपये तुम्हाला उद्या परत करीन. साहेब माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्लीज मला २००० रुपये द्या. 


शिवा, या तुझ्या आजी आहेत का? राजने विचारले. नाही साहेब, शिवा उतरला. 

तुझ्या घराच्या जवळपास राहतात? 

नाही साहेब, शिवा उत्तरला. 

मग या आहेत तरी कोण? राजने विचारले. 

मला माहित नाही साहेब, शिवाने प्रामाणिकपणे कबुली दिली.

एका अनोळखी आजीबाईंसाठी शिवा राजकडे २००० रुपये मागत होता, राजचे डोळे पाणावले. राजने पटकन २००० रुपये काढून दिलेत. साहेब, उद्या संध्याकाळी बस स्टॉपवर मी तुम्हाला तुमचे २००० रुपये परत देईन शिवा म्हणाला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे राज बस स्टॉपवर आला परंतु शिवा कुठेही दिसत नव्हता. तेव्हढ्यात राजची बस आली. राज बसमध्ये चढणार, तितक्यात त्याने आवाज ऐकला, साहेब साहेब, आवाज शिवाचा होता. राजने बस सोडली. थॅंक्स साहेब म्हणत, शिवाने राजला २००० रुपये परत केलेत.


शिवा, चल आपण चहा पिऊ या. राजने शिवाला समोरच्या हॉटेलमध्ये नेले. 

राज - शिवा घरी कोण कोण असतं तुझ्या? 

शिवा - साहेब मी, माझा लहान भाऊ आणि आई-वडील. आई वडील मजुरी करतात, भाऊ शाळेत जातो.

राज - शिवा तू शिकतोस की नाही?

शिवा - साहेब दिवसभर मी काम करतो आणि रात्रीच्या शाळेत जातो. 

राज - शिवा आज दुपारी जेवण केव्हा केलंस तू? शिवा - साहेब दुपारी भूक लागतच नाही मला. 

राज - सकाळी घरून किती वाजता निघतोस तू? शिवा - साहेब सकाळी दहा वाजता. 

राज - नाश्ता केव्हा घेतोस? 

शिवा - सकाळी नऊ वाजता, एक पोळी चहा बरोबर.

राजला शिवाच्या हलाखीच्या परिस्थितीची जाणीव झाली. राजने दोघांसाठी चहा आणि नाश्त्याची ऑर्डर दिली. 


शिवा तू बस इथे, मी दोन मिनिटात आलो असे म्हणून राज जवळच्या एटीएम मध्ये गेला. त्याने एटीएम मधून १००००  रुपये काढलेत. शिवाने परत केलेले २००० रुपये आणि एटीएम मधून काढलेले १०००० रुपये  असे १२००० रुपये त्याने एका पाकीटात टाकलेत. पाकिटात राजने स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड देखील टाकले. चहा-नाश्ता झाल्यानंतर राजने शिवाला ते पाकिट दिले आणि सांगितले, शिवा यात तू मला आत्ताच परत केलेले २००० रुपये आणि तुला खास माझ्याकडून १०००० रुपये असे १२००० रुपये आहेत. साहेब खरंच मला हे पैसे नकोत, शिवा प्रामाणिकपणे म्हणाला. शिवा घे, नाही म्हणू नकोस,  म्हणत राजने आग्रहाने ते पाकीट शिवाकडे दिले. 


साहेब आणि आईने विचारले की पैसे कोणी दिले? का दिले? तर काय सांगू मी. शिवा, यात माझे व्हिजिटिंग कार्ड आहे त्याच्यावर माझे नांव पत्ता आणि फोन नंबर आहे आणि आईला सांग, राज दादाने मला हे गुरुदक्षिणा म्हणून दिले आहे. गुरूदक्षिणा आणि मला? का? कशासाठी? शिवाला काहीही समजले नाही, फक्त राजच्या आग्रहास्तव शिवाने ते पाकीट स्वीकारले. 


थँक्यू साहेब म्हणताना शिवाने त्याचा उजवा हात वर नेला आणि राजला परत एकदा प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी मिळाल्याचा भास झाला. शिवाचा निरोप घेऊन राज घरी परतला. राज, अरे पोलीस स्टेशन मधून फोन होता. पासपोर्टसाठी पोलीस व्हेरिफिकेशन करायला त्यांनी तुला पोलीस स्टेशनला बोलावले आहे, नेहाने सांगितले. 


राज पोलीस स्टेशनला जायला निघाला आणि तितक्यात फोन वाजला. नेहाने फोन घेतला. 

पलीकडून एक स्त्री विचारत होती, राज साहेब आहेत का? हो आहेत, पण ते घाईत आहेत, पोलीस स्टेशनला जायचेय त्यांना, नेहा म्हणाली. बाईसाहेब, प्लीज प्लीज त्यांना पोलीस स्टेशनला जाऊ देऊ नका, मी विनवणी करते तुम्हाला, पलीकडून आवाज आला. 

नेहाने फोन राजला दिला. 


कोण बोलताय आपण? राजने विचारले.

साहेब माझ्या शिवाकडे मला एक पाकीट मिळालं त्यामध्ये १२००० रुपये आहेत. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करू नका. मी तुम्हाला तुमच्या पत्त्यावर शिवाने चोरलेले पाकीट आणून देते, परंतु प्लीज साहेब पोलीस स्टेशनला तक्रार करू नका. माझ्या लेकरावर दया करा साहेब.


शिवाच्या आई, अहो, ते पाकीट शिवाने चोरलेलं नाही. मी ते त्याला स्वतःहून बक्षीस म्हणून दिले आहे असे म्हणत राजने गेल्या काही दिवसांतील सर्व वृत्तांत त्या माऊलीला सांगितला. राजला त्या माऊलीचे हुंदके स्पष्ट ऐकू येत होते. नक्कीच शिवाच्या आईच्या डोळ्यांत अश्रू असणार, आनंदाश्रु, राज कल्पना करू शकत होता.


ऑन साईट असाइनमेंट, कामाचा ताण, वेगवेगळ्या ठिकाणी होणारे पोस्टिंग प्रमोशन वगैरे वगैरे मध्ये २५ वर्षे निघून गेलीत. कालच नेहा तीच्या धाकट्या बहिणीकडे दुबईला गेली. 


सकाळी उठल्यावर राजने चहा केला आणि मॉर्निंग वॉकसाठी तो घराबाहेर पडला. घरापासून पुढच्याच चौकात एका भरधाव येणाऱ्या दुचाकीने राजला धडक दिली आणि तो जोरात खाली पडून बेशुद्ध झाला. 


साहेब तुम्हाला तर बरं वाटतं ना? काही त्रास तर होत नाही ना? सिस्टर आपुलकीने विचारत होती. सिस्टर मला काय झाले आहे? मी इकडे हॉस्पिटलमध्ये कसा आलो ? कुणी आणलं मला? राज सिस्टरला विचारत होता. राज हॉस्पिटलमध्ये कसा आला, त्त्याच्यावर काय ट्रीटमेंट झाली, वगैरे सर्व डिटेल्स सिस्टरने राजला सांगितले. साहेब त्या देवमाणसाने तुम्हाला अगदी वेळेत हॉस्पिटलमध्ये आणले आणि तुमच्या ऑपरेशनचा दोन लाख रुपयांचा खर्च देखील केला, त्याच्यामुळेच तुमचा जीव वाचला. 


सिस्टर येऊ का मी आत? असे म्हणत एका प्रसन्न चेहऱ्याच्या तरुणाने प्रवेश केला. 

राज साहेब हाच तो देव माणूस, ज्याने तुम्हाला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणून तुमचा प्राण वाचवला. राजने हात जोडून त्या तरुणाला नमस्कार केला आणि म्हणाला साहेब आपण माझ्यासाठी जे काही केलं ते या सिस्टरने मला सांगितले. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि मला बरे वाटल्यावर तुमचे २ लाख रुपये मी परत करीन, राज म्हणाला. 


अहो साहेब, यात मी विशेष काय केलं? आणि दोन लाख रुपये परत करण्याचे तुम्ही म्हणतात साहेब, अहो गुरुदक्षिणा का कोणी परत घेतं?

कसली गुरुदक्षिणा? आणि कोणाला? राजने संभ्रमाने विचारले. साहेब तुम्ही मला ओळखले नसेल. मी शिवा, तोच तो, फुगे विकणारा शिवा. 


राज क्षणात भूतकाळात शिरला. साहेब आज एकही फुगा विकला गेला नाही. एक फुगा घ्या ना प्लीज, अशी विनवणी करणारा शिवा. साहेब या आजींवर उपचार करण्यासाठी मला २००० रुपये द्या ना, मी तुम्हाला उद्या तुमचे पैसे परत करीन म्हणणारा शिवा. साहेब माझ्या मुलाने चोरलेले पैसे मी तुम्हाला परत आणून देते परंतु तुम्ही पोलिसांत तक्रार करू नका, माझ्या लेकरावर दया करा म्हणणारी ती माऊली, आणि आज तोच शिवा म्हणत होता, साहेब गुरूदक्षिणा का कोणी परत घेतं? मी शिवा, तोच तो, फुगे विकणारा शिवा. 


शिवा मी तुझे मनापासून आभार मानतो, अनेक वर्षांपूर्वीची ओळख तू विसरला नाहीस आणि मला अनमोल मदत केलीस. राज आणि शिवा दोघांनाही अश्रू अनावर झाले होते आणि ते पाहून सिस्टरचेही डोळे पाणावलेत.


-दिलीप कजगांवकर, पुणे

७७७००२५५९६

Post a Comment

0 Comments