Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कथा -लेखक दिलीप कजगांवकर लिखित - रिटर्न गिफ्ट

 



जवळ जवळ दोन तास नेहा साड्या बघत होती परंतु आवडलेल्या साड्या तीच्या बजेटमध्ये बसत नव्हत्या आणि बजेटमध्ये बसणाऱ्या साड्या तीला आवडत नव्हत्या. वैतागून सेल्समन म्हणाला मॅम, एकतर तुम्ही तुमचे बजेट वाढवा नाहीतर सिलेक्शन क्रायटेरिया बदलवा. नेहाला दहा हजार रुपयांची एक साडी खुप आवडली होती परंतु तिचे बजेट फक्त आठ हजार रुपयांचे होते.  दादा, तुम्ही शेठजींना विचारून पहा ना काही डिस्काउंट मिळेल का? नेहाने विनवले.


त्याचवेळी दुकानात एकटाच आलेला एक रुबाबदार तरुण  सेल्समनला म्हणाला, मला साडी घ्यायची आहे, कोण दाखवेल? सर पाचच मिनिटे थांबा, या मॅमचे झाले की तुम्हाला साड्या दाखवतो, तुम्ही इथेच बसा.


आमच्याकडे कोणताही डिस्काउंट दिला जात नाही, शेठजींनी सांगितले. पण जर तुमचा आज वाढदिवस असेल तर  तुम्हाला १०% डिस्काउंट  किंवा तुमच्याकडे अे बी सी बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर आम्ही तुम्हाला २०% डिस्काउंट देऊ शकतो. 


माझा वाढदिवस पुढच्या रविवारी आहे आणि माझ्याकडे कोणतेही क्रेडिट कार्ड नाही, म्हणताना नेहा हिरमुसली.

मॅम माझ्याकडे अे बी सी बॅंकेचे क्रेडिट कार्ड आहे, तुम्ही ते वापरा. तुम्हाला २०% डिस्काउंट मिळेल, म्हणजेच साडी तुम्हाला हव्या असलेल्या किंमतीत मिळेल, तो तरुण म्हणाला.

खरंच? म्हणताना नेहा आनंदली. सर, मी तुमचे मनापासून आभार मानते म्हणणाऱ्या नेहाला त्या तरूणाने सांगितले, मॅम मला एक साडी घ्यायची आहे आणि मला साड्यांमधलं काहीच माहीत नाही. तुमचं सिलेक्शन ऊत्तम आहे. साडी सिलेक्ट करायला तुम्ही प्लीज मला मदत कराल का?

का नाही ? अवश्य करीन, नेहा म्हणाली. 


तुम्हाला साडी कोणासाठी घ्यायची आहे? नेहाने विचारले. 

रीनुसाठी आय मीन, रीनासाठी, तो तरुण म्हणाला. रीना ताई कशा आहेत? म्हणजे त्यांची उंची, रंग वगैरे? 

बिलकुल तुमच्या सारखीच उंची, रंग आणि झिरो फिगर. फरक एवढाच, तिचा शोल्डरकट नाही तर बॅाबकट आहे. 


सर, तुमचे बजेट किती? सेल्समनने विचारले. ७०-७५ हजार रुपये तो तरुण म्हणाला. सेल्समनने मोठ्या आदराने त्या तरूणाकडे बघितले आणि अतिशय आकर्षक साड्या दाखवायला सुरुवात केली. नेहा मन लावून आणि बारकाईने साड्या पहात होती. अनेक साड्यांपैकी दोन साड्या नेहाने बाजूला काढल्या. दोन्हीही साड्या खरोखरच खूप छान होत्या आणि विशेष म्हणजे त्या तरूणाने सांगितलेल्या बजेट मधीलच होत्या.


सर तुम्ही रीना ताईंना व्हिडिओ कॉल करून या दोन साड्या दाखवा आणि त्या पसंत करतील ती साडी घ्या. 

नाही, नाही, मला रीनुला सरप्राईज द्यायचे आहे, त्यामुळे व्हिडिओ कॉल करता येणार नाही. 


मॅम, मी दोन्हीही साड्या तुमच्या अंगावर कशा दिसतात ते दाखवतो. मग तुम्ही सिलेक्ट करा, सेल्समन म्हणाला. 

दोन्हीही साड्या नेहावर खूपच खुलून दिसत होत्या. सर रीना ताईंसाठी ही साडी घ्या, नेहा म्हणाली. दादा या दोन्ही साड्या पॅक करा, तो तरुण म्हणाला. 

सर रीना ताईंसाठी ह्या दोन्ही साड्या सारख्याच होतील, नेहा म्हणाली. तुम्हाला दोन साड्या घ्यायच्या असतील तर आपण एक दुसरी साडी घेऊ, नेहा म्हणाली.

मॅम, एक साडी रीनुसाठी आणि दुसरी माझ्या खास मैत्रिणीसाठी, तो तरुण नि:संकोचपणे म्हणाला. 


सर थांबा, मी दोन्ही साड्या व्यवस्थित चेक करून घेते, नेहा म्हणाली. नेहाने पहिली साडी चेक केली आणि म्हणाली ही ठीक आहे. दुसरी साडी चेक करताना नेहा किंचाळली. साडीच्या बॉर्डर वरून वेगाने हात फिरवताना, साडीच्या प्राईस टॅगवर नीट न लावलेल्या पिनमुळे नेहाच्या नाजूक बोटाला मोठी दुखापत झाली आणि त्यातुन रक्त येऊ लागले. नेहाचे रक्त साड्यांच्या ढिगाऱ्यावर पडणार तेवढ्यात त्या तरुणाने नेहाचा हात हातात घेतला आणि त्यावर खिशातील पांढऱा स्वच्छ हातरुमाल दाबून धरला. 


पटकन संकोचून तो म्हणाला सॅारी मॅम, मी तुमची परवानगी न घेताच तुमचा हात हातात घेतला. 


अहो सर, बरं झालं तुम्ही त्यांचा हात हातात घेतला, नाही तर त्यांच्या हातातील रक्त साड्यांवर पडले असते आणि शेठजींनी मोठी नुकसान भरपाई मागितली असती. प्रत्येक साडी सत्तर-पंच्याहत्तर हजारांच्या घरातील आहे.


साड्या घेतल्यावर तो तरुण म्हणाला, मॅम मी तुम्हाला घरी सोडतो. संकोचूनच नेहा तयार झाली. आलिशान गाडी चालवताना तो तरुण म्हणाला मॅम आपण आधी क्लिनिक मध्ये जाऊया आणि ड्रेसिंग करून इंजेक्शन घेऊ या. 


नको सर, क्लिनिक मध्ये गेलेा तर २००-३०० रुपये खर्च होतील. आधीच बजेटपेक्षा थोडी महाग साडी घेतली आहे त्यामुळे मला आता खुप काटकसर करायला लागणार आहे.


काय करता तुम्ही? त्या तरुणाने उत्सुकतेने विचारले.

सर, मी एका छोट्या कंपनीत रिसेप्शनिस्ट आहे, महिन्याला २००००/-  रुपये पगार मिळतो. त्यातून घर भाडे, किराणा, अॅाफिसला जाण्या-येण्याचा आणि इतर खर्च जाऊन जेमतेम २०००-३००० रूपये शिल्लक रहातात. 

मी घरी जाऊन बोटावर हळद लावीन, तेवढेच पैसे वाचतील. काळजी करू नका मॅम, क्लिनिकला पैसे लागणार नाहीत. 


सर, पण माझ्यामुळे तुम्हाला घरी जायला उशीर होईल आणि रीनाताई चिडल्या तर? चिडायला रीना काही माझी बायको नाही, मावस बहीण आहे, सरांनी स्पष्टीकरण दिले. 

ज्या मैत्रिणीसाठी तुम्ही इतकी महाग साडी घेतली ती तुमची खुप जवळची मैत्रीण असणार? त्याही रीना ताईंसारख्याच सुंदर आहेत का? काय करतात त्या? इथेच असतात का? नेहाच्या प्रश्नांना कोणतेही ऊत्तर मिळाले नाही. 


आपण इतका वेळ बोलतोय परंतु आपल्याला एकमेकांचे नाव देखील माहित नाही, सर म्हणाले. 

मी राज. 

मी नेहा. 


सर तुम्ही काय करतात? नेहाने विचारले. तेव्हढ्यात गाडी खांबवत सर म्हणालेत क्लिनीक आलेच.

क्लिनीकवर बोर्ड होता,   

"डॅाक्टर राज M. D. जनरल प्रॅक्टीशनर".


राजने हळुवार पुणे ड्रेसिंग करून इंजेक्शन दिले. उद्या सकाळी परत ड्रेसिंग करु या, नो फी, राज म्हणाला. नेहा संकोचली.

राजने नेहाला घरी सोडले. साडी कपाटात ठेवताना नेहाच्या लक्षात आले की तिने साडीचे पैसे राजला दिलेच नव्हते. 


सकाळी नेहा क्लिनिकला लवकरच पोहोचली. पैसे देण्याच्या घाई बरोबरच कसली तरी ओढही होती. 


राजने ड्रेसिंग केले पण नाराजीनेच साडीचे पैसे घेतलेत. नेहा पुढच्या रविवारी संध्याकाळी मी एक छोटीशी पार्टी देणार आहे. तु जर फ्री असशील तर येशील का? माफ करा नेहा मॅम, मला "तू" नाही "तुम्ही" म्हणायचे होते.

सर, मला अहो जाहो आवडत नाही. तुम्ही मला "तू" च म्हणा आणि जरूर येईन मी, नेहा म्हणाली. 


संध्याकाळी अॅाफिस मधून येताना बस सिग्नलला थांबली असताना बाजूलाच राजची कार येऊन थांबली. बाय राज म्हणत एक खूप सुंदर तरुणी गाडीतून बाहेर पडताना नेहाने बघितले. नेहाच्या मनात आले, कदाचित ती राजची बहीण रीना असेल का? नाही नक्कीच नाही. रीनाचा बॅाब कट असल्याचे राजने सांगितले होते आणि हीचे केस तर लांब आहेत. राजची ती खास मैत्रीण तर नसेल ना? एक मात्र नक्की नेहाच्या मनात राजने विशेष स्थान निर्माण केले होते. 


नेहाच्या अॅाफिसच्या सहकाऱ्यांनी रविवारी संध्याकाळी एकत्र मुव्ही बघायचे ठरविले. अनवधानाने नेहाने येण्याचे मान्य केले. राज बरोबर जायचे की मुव्हीला जायचे? नेहाच्या मनात द्वंद्व सुरू झाले. मुव्हीला गेले नाही तर अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. राज बरोबर जायचे नसेल तर त्याला कळविणार तरी कसे? त्याचा नंबरही नव्हता नेहाकडे.

नेहाला ऊत्तर सापडले. अॅाफिसच्या सहकाऱ्यांना अर्धसत्य सांगायचे, डॅाक्टरांबरोबर जायचे ऐवजी डॅाक्टरांकडे जायचे सांगायचे.


रविवारी ठरल्यावेळी नेहा तयार होती. मागच्या आठवड्यात घेतलेल्या साडीवर नेहा खूपच सुंदर दिसत होती. राज अगदी वेळेवर आला. गाडीत बसल्यावर नेहाने मैत्रिणीला डॅाक्टरांबरोबर ऐवजी डॅाक्टरांकडे जाते सांगून स्वतःची सुटका करून घेतली. नेहाने सांगितलेल्या अर्धसत्यावर दोघेही खळखळून हसलेत.


कार मधील रेडिओ एक गाजलेले गीत ऐकवत होता, 

भेट तुझी ती काल परवाची

पाया बनली मम जीवनाची

भीड मुरडली उभ्या जगाची

दिशा गवसली मला ऊद्याची

राजने नेहाकडे पाहिले, ती कुठेतरी हरवली होती.


राजच्या आलिशान गाडीने लवकरच मध्यवस्ती सोडली आणि गाडी एका आलिशान फाइवस्टार हॉटेलपाशी येऊन थांबली.


राजने बुक केलेल्या प्रशस्त सुटमध्ये ते गेलेत. राजने दोघांसाठी कॉफी मागवली. कॉफी आणणाऱ्या मुलाच्या कानात राज काहीतरी कुजबुजला, हे नेहाच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही.


गप्पा मारता मारता कॉफी संपली. राज सर अजून कोणीच आले नाही, कोण कोण येणार आहेत पार्टीला? काय वेळ दिली आहे तुम्ही त्यांना? रीना ताई येणार आहे का? आणि तुमची ती खास मैत्रीण पण येणार आहे का? नेहाने विचारले. कोणीही येणार नाही फक्त आपण दोघेच, राज म्हणाला.


तेव्हढ्यात लाईट गेलेत. 

सर आपण बाहेर रिसेप्शन मध्ये जाऊन बसुया, नेहा म्हणाली. लाईट इतक्यात येतीलच, मोठ्या हॅाटेल्स मध्ये जनरेटर असतो, राज म्हणाला. 


नेहा चल आपण आत जाऊया, तीचा हात घट्ट पकडत राज म्हणाला. 

आत कुठे? घाबरलेल्या नेहाने विचारले.

तुझ्यासाठी छान सजवलेल्या बेडरूममध्ये, राज म्हणाला. 

नको नको, नेहा ओरडून म्हणाली. 

नेहा विरोध करत होती तरीही राजने जवळ जवळ ओढतच तीला बेडरूममध्ये नेले. नेहा खुप घाबरली होती, थरथरत होती, तीच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. सगळे काही अनपेक्षित होते, राजवर नको तेवढा विश्वास टाकून, अॅाफिसातील मैत्रीणीला अर्धसत्य सांगून ती राज बरोबर आली होती. 


तेवढ्यात लाईट आलेत. बेडरुम खरोखरच खूप छान सजवली होती. प्रशस्त वातानुकूलित रुम, भिंतींवर मोहक गुलाबी रंग, छानसा ड्रेसिंग टेबल, मंद प्रकाश देणारे रंगीबेरंगी दिवे, हलकेसे संगीत, पांढरा स्वच्छ सोफा, किंग साईज बेड, गुबगुबीत उशा नी जाडजूड ब्लॅंकेट. सर खूप व्यवस्थित प्लॅन करून फसवलेत मला. वाटलं नव्हतं तुम्ही इतके नीच असाल म्हणून, नेहा ओरडून म्हणाली. नेहाच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत राजने पडद्यामागून काचेचा टीपॅाय ओढला. 


टीपॅायवर होता "हॅपी बर्थडे नेहा" असे लिहिलेला छानसा केक. इतकी कल्पकता आणि प्लॅनिंग! नेहा अवाक झाली. राज बद्दल करून घेतलेल्या गैरसमजातून त्याला "नीच" म्हटल्यामुळे नेहा मनोमनी शरमली. सर, प्लीज माफ करा मला, नेहा ओशाळून म्हणाली. नेहाचे पाणावलेले डोळे राजने रूमालाने पुसलेत.

सर रागावलात?

छे छे, मुळीच नाही. पुढे मागे लग्न करणार, तेव्हा असे खोचक बोलणे ऐकायची सवय करावीच लागणार.

सर, तुमच्या त्या खास मैत्रीणीला भेटण्याची उत्सुकता आहे मला. कधी भेटवाल?

लवकरच, राज म्हणाला.

नेहाच्या खांद्यांवर थोपटत राज म्हणाला, कम ऑन नेहा, आता केक कापूया का?


नेहाने केक कापला. प्रथम राजने नेहाला आणि नंतर नेहाने राजला केक भरवला. 


राजने दिलेला गिफ्ट बॅाक्स उघडून नेहा ओरडली. सर काही तरी चूक झाली. ही तुमच्या खास मैत्रीणी साठी घेतलेली साडी तुम्ही मला देताय.

खरंय नेहा, ती मैत्रिण आता मैत्रिण राहिली नाही. तीला कोणीतरी मागणी घालणार आहे.


पण सर, तीचेही तुमच्यावर प्रेम असेल ना? 

नेहा तेच तर माहीत नाही मला. 

सर, बी क्विक, विचारा तीला. वेळ वाया घालवू नका, नंतर आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल.


राजने नेहाचा हात हातात घेत विचारले, देशील का "हा हात" मला कायमचा? होशील का माझी? 

आणि हो, तुच ती माझी खास मैत्रीण, पहिल्या भेटीतच आवडलेली. तुझ्या पसंतीची ही साडी मी तुझ्यासाठीच घेतली. काय सुंदर दिसत होतीस तू या साडीत! हा बघ याच साडीतील तुझा फोटो, तुला न विचारता काढलेला.


नेहा नि:शब्द होती पण तीच्या आनंदाश्रुंनी दिलेले ऊत्तर, हेच राजला मिळालेले “रिटर्न गिफ्ट" होते.


राज गुणगुणत होता -

भेट तुझी ती काल परवाची

पाया बनली मम जीवनाची

भीड मुरडली उभ्या जगाची

दिशा गवसली मला ऊद्याची


राज अरे, दिशा ऊद्याची नाही तर ऊभ्या आयुष्याची गवसली. प्रथमच सरांना, "अरे राज" संबोधत नेहाने रिटर्न गिफ्टची गोडी अजूनच वाढविली होती.


-दिलीप कजगांवकर, पुणे

७७७००२५५९६

Post a Comment

0 Comments