तेव्हा बाळू अन् मी आम्ही दोघेजण जागरण गोंधळाची गाणी म्हणायचो, मोठेबाबा देवाच्या तिथे खळ्याच्या वावरात बाभूळ होती त्या बाभळीखाली सकाळी घरी जेवण करून ११ ते १२ च्या दरम्यान बाळूकडं जायचो डोळ्यानं दिसत जरी नसलं तरी बाळू सावली व पावलांवरून माणसांची पारख करायचा हि बाळूची खासियत असायची.
मी घरी गेलो की बाळूचा नेहमीचा तो आवाज सदबा ये जेऊन निघू लगेच बाळू जेवला की मी त्याला माझ्या घरी न्यायचो घरीहून एक चटई, खंजिरी, तुणतुणं खांद्यावर टाकून बाळू माझ्या खांद्यावर हात ठेवून पाऊलवाटेने तडक माझ्या मागं चालायचा.
देवाच्या बाभळीपाशी गेलो की, रणरणत्या ऊन्हात आम्ही बाभळीखाली चटई टाकायचो बाळूला बसवायचं तसं मी वाद्य लावायचं काम करायचो तुणतुण खंजिरी तालासुरात लावून १२. ३० नंतर जागरणाच्या गणाने सुरूवात करून खंडोबाची गाणी म्हणायचो बाळूचा अन् माझा ठेका तालासुरात बसायचा सायंकाळच्या ६ वाजेपर्यंत बसायचो. बाभळीखालची सावली दुपारनंतर बाजूला सरली की आंब्याखाली येऊन बसायचो.
मे महिन्याच्या दिवसांत आंब्याच्या कैर्या तोडायचो आणि देवाच्या तिथल्या दगडावर नेऊन फोडायचो आणि खायचो.
मध्ये मध्ये मी घरी जाऊन शेंगा व गुळ पाणी आणायचो किती बरं वाटायचं त्या दिवसांत.
कधी कधी बाबाजी आला की, आमच्या हातातून खंजिरी घ्यायचा आणि पाच मिनिटाचा एक ठेका धरून जोरजोरानं वाजवायचा. वाड्यात आम्ही तिघं कधी कधी एकत्र बसायचो, कधी जर आम्ही जुन्नरला गेलो की, एक पोलीस टाईम्स पेपर आम्ही आणायचो आणि तेवढा पेपर आठवडाभर वाचायला बरं वाटायचं.
सुट्टीत बाबाजीचं आणि माझं नेहमीचं एकत्र असणं आणि बसणं बरं वाटायचं, क्रिकेट, गोट्या, कुठं विहिरीचं काम असलं की, तिथं जाऊन कुतूहलानं पाहत बसणं, आमचं एक वेगळचं साम्राज्य असायचं, कधी आम्ही टवाळ पोरांमध्ये बसलेलो नाही, कधी वाह्यात बसलेलो नाही कारण आमची बालपणची मैत्री खास होती.
बाळू सध्या हयात नाही, कधी कधी गाणी म्हणताना त्याचा आवाज आणि बाळूचा चेहरा बोलणं आठवतं.
......
मोठेबाबा देवाच्या तिथला परिसर सध्या जुन्या आठवणी त्या आठवणीतच राहिलेला आहे.
.......
लेखक:- सतिश शिंदे

Post a Comment
0 Comments