राज, डेक्कनवरील मिठाईच्या दुकानातून या गोष्टी आणायच्या आहेत, लांबलचक लिस्ट राजच्या हातात सोपवत नेहा म्हणाली. वरदचेही फिरणे होईल म्हणत २ वर्षांच्या वरदला राजने बरोबर घेतले.
दुकानात शिरताना सिक्युरिटी गार्डने राजला आणि वरदलाही टोकन दिले. टोकन घेऊन वरद जाम खुश झाला, अगदी घट्ट पकडून ठेवले त्याने टोकन. लिस्टप्रमाणे सगळे पदार्थ घेऊन राज कॅशियरकडे जाणार तोच नेहाचा फोन आला. गुलाबजाम पाव किलो नाही अर्धा किलो आण, माझा दादा येणार आहे म्हणून. नेहा, अगं दादाला डायबेटिस आहे, त्याला गोड चालत नाही ना? कधी कधी खाल्लं तर चालतं रे, नेहा म्हणाली. बाकरवडी १ किलो नको, पाव किलो आण, तुझ्या आईंना चावायला त्रास होतो ना.
पुन्हा २ मिनिटांत फोन, माझ्या आईसाठी १/२ किलो कलाकंद आण, खुप आवडतं तीला. उद्या दादा बरोबर पाठवेन. म्हणजे दादाचा लांबलचक मुक्कामाचा प्लॅन नव्हता तर, राज सुखावला.
कॅशियरने राजचे टोकन स्कॅन केले, त्याने मागितलेले २००० रूपये देऊन राज निघाला. अहो सर, आवाज ऐकून राज थांबला. कॅशियरने वरदच्या हातातील टोकन मागितले. नाराजीनेच वरदने ते दिले. राज दोन पावले पुढे गेला आणि पुन्हा, अहो सर म्हणत कॅशियरने राजला बोलावले. सर या टोकनवर २०० रूपयांची खरेदी आहे. प्लीज २०० रूपये द्या.
कॅशियर साहेब, हे टोकन वरदकडे होते, तो काय आणि कसे खरेदी करणार? सर, त्याने पाव किलो आंबा बर्फी खरेदी केलीय. साहेब या पिशव्या पहा, आंबा बर्फी नाहीये त्यात. सर, मग त्याने खाल्ली असेल. अहो पाव किलो बर्फी, इतका लहान मुलगा कसा संपवेल? सर, आमची आंबा बर्फी लहान मुलांना खुप आवडते, संपवली असेल त्याने. अहो काय बोलतात, मी दुकानात फक्त ५ मिनीटे होतो. बर्फीच्या बॅाक्सची चिकट पट्टी तो कसा काढेल?
सर, अगदी शक्य आहे, त्याची वाढलेली नखं पहा.
अहो पण ५ मिनिटांत पाव किलो बर्फी कशी संपवणार, इतका लहान मुलगा?
सर, त्याने खिशात ठेवली असेल.
अहो, २ वर्षांच्या वरदचे चिमुकले खिसे, काय मावणार त्यात? सर, मला खिसे चेक करू द्या, कॅशियरचा आग्रही स्वर. इतक्या लहान मुलाचे खिसे तपासणार? धिस इज डिसगस्टींग, वैतागून राजने २०० रूपये टेकवलेत.
समोरच्या बोर्डवर लिहिले होते "व्हिजीट अगेन".
राजने संकल्प केला, या दुकानात परत यायचे नाही.
तेवढ्यात आवाज आला, अहो सर. आवाज कॅशियरचा नव्हता पण अगदी गोड आवाज. राजने मागे वळून पाहिले नी तो थबकला. एक अतिशय देखणी तरूणी राजला थांबवत होती. सर, मी रीना. मला माफ करा, आय अॅम एक्स्ट्रीमली सॅारी. हे २०० रूपये घ्या. २०० रूपये कशाबद्दल? न राहवून राजने विचारले.
सर, माझे टोकन स्कॅन केल्यवर कॅशियर साहेब म्हणाले, तुम्ही जाऊ शकता, नथिॅग टु पे. कसे शक्य आहे? मी पाव किलो आंबा बर्फी घेतली आहे, मी म्हणाले. मॅम, मी आंबा बर्फीचे पैसे तर त्या सरांकडुन घेतले, कॅशियर साहेब म्हणालेत. झालेला गोंधळ मला समजला. दुकानात तुमच्या मुलाचे पडलेले टोकन द्यायला मी वाकले नी माझेही टोकन पडले. मी नकळत माझे टोकन त्याला दिले आणि म्हणूनच हा गोंधळ उडाला.
बाबा, ही ॲांटी कोण? वरदने विचारले.
मी तुझ्या बाबाची फ्रेंड, रीना म्हणाली. राजचा नंबर घेऊन मिस रीनाने मिस कॉल दिला. मनस्ताप झाला पण इतकी गोड मैत्रिण मिळाली, धन्यवाद कॅशियर साहेब म्हणत राजने २ मिनीटांपुर्वी केलेला संकल्प सोडला. दुकान खुप लकी आहे, हरकत नाही पुनः पुनः यायला, असे म्हणत त्याने रीनाचा नंबर सेव्ह केला, चुकुन वेगळ्याच नांवाने.
किती रे उशीर, म्हणत नेहाने राजचे स्वागत केले. राज फ्रेश होऊन आला. राज, तुझ्या बॅासचा मेसेज आलेला दिसतोय, काय हे ॲाफिसचे लोक, सुटीच्या दिवशीही त्रास देतात, नेहा म्हणाली. राजने मेसेज बघितला. लोकेशन पाठविले आहे, डेक्कन वरील मिठाईच्या दुकानाच्या अगदी समोर, कधी येतोस?
आतुन नेहाचा वैतागलेला स्वर, किती वेंधळा रे तू? गुलाबजाम १ किलो सांगितले नी तु १/२ किलोच आणलेस, अरे दादाला आवडतात ना, त्याचे पोट भरायला हवे ना? मी लगेच आणतो म्हणत राज क्षणात निघालाही, एकटाच, वरदला न घेता आणि नेहावर न चिडता. कारण बॅासने बोलावले होते ना, आंबा बर्फी खायला. रीनाचा नंबर सेव्ह करताना दाखविलेली दुरदृष्टी राजला उपयोगी पडली होती.
शेवटी काय? आंबा बर्फीची कमाल! भरमसाठ गोड खरेदी वर अनपेक्षितपणे "फ्री" मिळाली होती, गोड गोड मैत्री!
- दिलीप कजगांवकर, पुणे
७७७००२५५९६
Post a Comment
0 Comments