Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कथा - लेखक दिलीप कजगांवकर लिखित मनाली कथा



धुळ्याच्या जे. आर. सीटी हायस्कूलमध्ये सातव्या इयत्तेत शिकत असताना, १९७२ साली टंकसाळे सरांनी सांगितलेली ही गोष्ट.


मनाली

भुसावळहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेच्या फर्स्टक्लास कोचमध्ये वीरेंद्र बसले होते. त्यांच्याखेरीज कोचमध्ये कोणीही नव्हते, संपूर्ण कोच रिकामा होता.


नाशिकरोडला, कोचमध्ये एका सुंदर तरुणीने प्रवेश केला. अंकल, मी मनाली. तिने शेकहँडसाठी हात पुढे केला. मी वीरेंद्र, हात पुढे न करताच पण मोठ्या आदराने वीरेंद्र म्हणाले. 


मनालीची आधुनिक राहणी, आधुनिक विचार आणि अतिशय मनमोकळा स्वभाव, कुणावरही चटकन छाप टाकणारा.


मनमोकळ्या आणि बोलक्या मनालीबरोबर वीरेंद्रच्या छान गप्पा रंगल्या. भुसावळला मोठा बंगला आहे, गाडी आहे आणि मुंबईला राहणाऱ्या एकुलत्या एक मुलाला घर घ्यायला 5 लाख रुपये देण्यासाठी मी मुंबईला जातोय वीरेंद्रने सांगितले. गाडीच्या वाढत्या वेगाबरोबर गप्पा अजूनच रंगल्या.


अंकल, आता गाडी कोठे थांबेल? पुढचे स्टेशन कीती वेळाने येईल?  मनालीने विचारले.


अजून २०-२५ मिनिटांनी इगतपुरी स्टेशन येईल, विरेंद्र ऊत्तरलेत.


गाडी मोठ्या दिमाखात मार्गक्रमण करीत होती आणि काचेतुन दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यात विरेंद्र पुर्णतः रमले होते. 


अचानक मनाली वीरेंद्रच्या शेजारी बसली, थोड्या वेळाने जवळ सरकली आणि त्या नंतर अगदी खेटून बसली. 


मनाली, मनाली काय करतेस तू? 


ईश्श, काही नाही, मनाली लडिवाळपणे म्हणाली. 


मनाली दूर हो, आणि नीट बस वीरेंद्र रागाने म्हणाले.


हो, बसते पण मला तुझ्या जवळचे पाच लाख रुपये दे, मनालीची भाषा बदलली होती.


मनाली मी तुला पैसे देऊ शकत नाही, वीरेंद्र मोठ्या निर्धाराने म्हणाले. एव्हाना गाडीचा वेग थोडा कमी झाला होता. थेरड्या, पैसे दिले नाहीस तर मी आरडाओरड करेन, मनालीचा हुकुमी एक्का. 


प्लीज असे काही करू नकोस कळवळीने वीरेंद्र म्हणाले. 


पैसे दे, मनाली ओरडली. 

नाही देऊ शकत, नाही देऊ शकत, वीरेंद्र पुनः पुनः सांगत होते. 


गाडी स्टेशनमध्ये शिरताना मनालीने स्वतःचे कपडे फाडले आणि मोठमोठ्याने ओरडु लागली वाचवा ... वाचवा...


रेल्वे पोलिसांनी वीरेंद्र आणि मनालीला पोलीस इन्स्पेक्टर साहेबांसमोर हजर केले. 


मनालीने तिची दर्दभरी कहाणी अतिशय रंगवून सांगितली. 


अरे, तू तर अगदी सभ्य दिसतोस आणि हे असे वागणे, इन्स्पेक्टर साहेब म्हणाले. 


इन्स्पेक्टर, माईंड युवर लॅंग्वेज, करड्या आवाजात वीरेंद्र म्हणाले. मी वीरेंद्र शर्मा, रिटायर्ड मेजर. 


मेजर साहेब, आश्चर्य वाटते तुमचे असले वागणे बघून. साहेब तुम्ही देशाचे रक्षक आणि तुमच्याकडून असे गलीच्छ वागणे? 


इन्स्पेक्टर साहेब, माझी एक विनंती आहे, प्लीज माझा ओव्हरकोट काढा. इन्स्पेक्टर साहेबांनी मेजर साहेबांचा कोट काढला. 


अनपेक्षित सत्य समोर आले. मेजर साहेबांच्या दोन्हीही हातांना पंजे नव्हते. इन्स्पेक्टर साहेब, १९७१ च्या लढाईचा हा प्रसाद. इन्स्पेक्टर साहेब आणि मनाली खजील झालेत. 


मनाली, आणि म्हणूनच मी तुला पुनः पुनः म्हणत होतो मी तुला पैसे देऊ शकत नाही. 


रडत रडत मनालीने माफी मागितली आणि मेजर साहेबांनी मोठ्या मनाने तीला माफ केले.


-दिलीप कजगांवकर, पुणे

७७७००२५५९६

Post a Comment

0 Comments