Type Here to Get Search Results !

आम्ही पाहिलेले कोकणातील प्रामाणिक व निस्वार्थ वृत्तीचे नाटेकर काका- शब्दांकन रतिलाल बाबेल



आजही माणुसकी जिवंत आहे. तीर्थाटन केल्याने मनुष्याला चातुर्य प्राप्त होते. मनुष्याच्या ज्ञानामध्ये भर पडते. आणि शरीराला ऊर्जा प्राप्त होते. मनाच्या शांततेसाठी व स्वच्छतेसाठी निसर्गाच्या सानिध्यात जाणे हे क्रमप्राप्त असते. म्हणून प्रत्येक जण सुट्टीमध्ये एक छोटी ट्रीप आयोजित करतो.

 भाऊबीज झाल्यानंतर छोटी ट्रीप आयोजित करण्याचे मनामध्ये होते. अजंठा वेरूळ लेणी, शेगाव असा दोन-तीन दिवसाचा छोटा रूट किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी व गुजरात दर्शन किंवा कोकण दर्शन असा प्लॅन असताना कोकण दर्शन करण्याचा प्लॅन नियोजित झाला.

 प्रवासाच्या पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता घरून निघून नाशिक फाटा पुणे मार्गे साताऱ्याला पोहोचलो. साताऱ्या मधील प्रसिद्ध उत्तर चिदंबर नटराज मंदिराचे दर्शन घेतले. दक्षिणात्य पद्धतीच्या अतिशय सुंदर कोरीव काम असणारे 108 शिल्पांचे मंदिर पाहिले. तेथूनच जवळ असणाऱ्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेतले. साताऱ्यामध्ये खूप काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत परंतु यापूर्वी भेट दिली असल्यामुळे चाफळ या ठिकाणी जाण्याचे निश्चित झाले. चाफळ या ठिकाणी समर्थ रामदासांनी स्थापित केलेल्या दास मारुतीचे दर्शन घेतले. चाफळ चे  श्रीराम मंदिर अतिशय देखणे आहे. साधारण  दुपारी तीन नंतर वेडी वाकडी वळणे घेत आमची गाडी निसर्ग रम्य परिसरातून व अतिशय सुंदर रस्ते असणाऱ्या परिसरातून राजापूरकडे मार्गस्थ झाली. नारळाची सुंदर झाडे,सुपारीच्या बागा पहात पहात, सुंदर कोकणाचे दर्शन मनामध्ये साठवत, काही आठवणी कॅमेरा मध्ये कॅप्चर करीत आम्ही मार्गस्थ होत होतो. हिवाळ्याचे दिवस असल्याने दिवस छोटा असल्याने, सायंकाळी पावणे सात वाजता आम्ही राजापूर मध्ये पोहोचलो. राजापूर मधील रस्ते खूप उतार व चढाचे तसेच छोटेअसल्याने व पहिल्यांदाच या रस्त्याने जात असल्याने थोडेसे सावकाश व विचारत विचारत श्री धूतपापेश्वर मंदिराच्या रोडला लागलो. खूप अंधार, विरळ वस्ती यामुळे मनामध्ये विचारांचे काहूर उठले. दर्शनाला आता जावे किंवा न जावे या संभ्रमात असताना टाटा ऑल्ट्रोचे सारथ्य करणारे श्री अशोक गोरडे व आम्ही उभयतांनी निर्णय घेऊन श्री धूतपापेश्वर मंदिरा जवळ पोहोचलो. मंदिर परिसर आणि मंदिर खूप सुंदर असून मंदिराच्या शेजारी खूप मोठा धबधबा पहायला मिळाला. अनेक दिवसापासून मंदिरांचे  लाकडी कोरीव काम चालू आहे. मंदिर सायंकाळी 9 वाजेपर्यंत उघडे असते, आम्ही निवांतपणे दर्शन घेतले. मंदिराचे पुजारी गुरव यांच्या धर्म पत्नीला येथे कोठे राहण्याची सोय होईल का असे विचारले. त्यांनी लगेच गजानन उपहारगृहाचे मालक दीपक नाटेकर(नवाथे ) यांना फोन लावला. त्यांच्याकडून शुद्ध शाकाहारी जेवणाची व होम स्टे राहण्याची व्यवस्था होईल असे सांगितले. गजानन उपहारगृहामध्ये आम्ही रात्रीचे भोजन घेतले.

 राहण्यासाठी श्री दीपक नाटेकर काका यांच्या घरी पोहोचलो. आमची कोणतीही विचारपूस न करता, आधार कार्ड मोबाईल नंबर यांची चौकशी न करता थ्री रूम बीएचके घरामध्ये राहण्याची व्यवस्था केली.

 नाटेकर काका सकाळी पाच वाजता उठून हॉटेलमध्ये तयारी करण्यासाठी निघून गेले. सकाळी साडेसहा वाजता आम्हीही सर्व आवरून गजानन उपहारगृहामध्ये पोहोचलो. धुके पसरलेले होते. त्यात वाफाळलेला गरम गरम चहा मिळाला. नाश्ता तयार नसल्याने  त्यांचे बिल किती झाले हे विचारले. सध्या सुट्टीच्या दिवसात कोकणामध्ये खूप गर्दी असते. हॉटेल वाल्यांना जर विचारले तर  ते एक रात्री मुक्कामाचे अडीच ते तीन हजार रुपये घेतात. श्री. दीपक नाटेकर काकांनी फक्त जेवणाचे आमच्याकडून पैसे घेतले. प्रत्येक माणसाला दोन मने असतात, आमचे एक मन  विचार करीत होते की काकांना रात्री मुक्कामाचे व जेवणाचे दीड हजार रुपये द्यावेत. पण काकांनी आमच्याकडून फक्त जेवणाचे तीनशे रुपये घेतले. तुम्ही मला मुलासारखे आहात आणि मुलाकडून का कुणी राहण्याचे पैसे घेतात?.


 या स्वार्थी दुनियेत, दुसऱ्यांना लुबाडणारे बरेच असतात, पण स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवून, काहीजण स्वतःच्या कष्टाचा मोबदला सुद्धा घेत नाहीत. आजही ग्रामीण भागात माणुसकी जिवंत आहे व अशी माणसे आहेत म्हणून संस्कार टिकून आहेत. काकांच्या दातृत्वाला सलाम. सद्गुरु प्रत्येक अडचणीच्या वेळी धावून येतात, मदत करतात, फक्त सद्गुरूंवर श्रद्धा हवी, तरच त्याची प्रचिती जागोजागी मिळते.

 जर रस्ता अनोळखी आहे, उशीर झाला आहे अंधार आहे म्हणून सायंकाळी श्री धुत पापेश्वर मंदिराला गेलो नसतो, पुजाऱ्यांच्या धर्म पत्नीला विचारले नसते तर इतर ठिकाणी पैसे देऊनही सात्विक भोजन व काकांच्या प्रेमाला मुकलो असतो. श्री सद्गुरूच असे सगळे योग जुळवून आणतात, याची प्रचिती पुन्हा अनुभवली.

 श्री दीपक नाटेकर काकांनी दुसऱ्या दिवशी आम्ही काय पाहावे हे समजावून सांगितले  व परत या भागात आला तर याच ठिकाणी या असे आवर्जून सांगितले. त्यांनाही आमच्याकडे येण्याची विनंती करून राजापूर गंगा तीर्थाकडे रवाना झालो.

 स्वर्ग सुख असणाऱ्या कोकणाचा, सुंदर मंदिरे आणि सुंदर बीच यांचा आनंद घेऊन  सुमारे 1500 km चा प्रवास करून आल्यानंतर सुद्धा श्री. नाटेकर काका डोळ्यासमोरून जात नाहीत. श्री. नाटेकर काका यांचा कोणता आदर्श घ्यावा याचाही विचार करीत  आहे.

Post a Comment

0 Comments