सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणी नमो: स्तुते ||
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात धार्मिकरित्या मंत्रौचाराने होत असते. देवदेवतांपेक्षा ही सर्वात प्रथम स्थान दिले जाते ते देवीला. जिच्यापोटी गर्भधारणेची शक्ती असते जी संपूर्ण सृष्टी निर्माण करते. या स्त्रित्वाचे , मातृत्वाचे स्थान महत्वपूर्ण मानले जाते. तितकेच काही बाबींत तुच्छ देखील मानले जाते. पूर्वी धर्मात देवीची पूजा होत असली तरी त्याचं स्त्रीला मासिक पाळीत त्या देविपासून दूर लोटले जाई. कुणीही व्यक्ती तिच्याजवळ जात नसे. तर तेच तिच्या पोटी मुलगी जन्माला आली तर ती मारली जाई. तिला शिक्षण घेणे तिचे मत मांडणे ह्या गोष्टी तर नव्हत्याच. ‘चूल आणि मूल’ हेच तिचे जीवन असे. बऱ्याचदा तिच्यावर शारीरिक, मानसिक शोषण होई. पण सहन करणे हा स्त्रीचा धर्मच बनला होता.
हळूहळू कालांतराने विकासाच्या दृष्टीने ज्ञानात भर पडली. जी स्त्री चूल आणि मूल पर्यंत सीमित होती. ती आज अंतराळावर जाऊ लागली. ‘मुलगा मुलगी समान’ संकल्पना शिक्षणात आली. तरीदेखील तिच्यावर काही अंशतः तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन संकुचीतच दिसून येतो. ती शारीरिक रित्या कमकुवत हा निसर्गतः नियम म्हणून लेखले जाते. याला कठोर उत्तर म्हणून बऱ्याच स्त्रिया आज आर्मी, पोलीस मध्ये स्वतःच कर्तुत्व सिद्ध करताना दिसतात. आज महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले जाते. परंतु तरीदेखील बलात्कार, हिंसाचार या गोष्टीस वेळेत न्याय मिळत नाही. याला अपवाद कदाचित वेळीच शासन नियम म्हणता येतील. प्रत्येक वेळी स्त्रीच बरोबर असे म्हणणे नाही. परंतु सर्व शहानिशा वेळीच करून योग्य निर्णय मिळणे खूप गरजेचे असते. जर शासनव्यवस्था कडक असली तर बलात्कार सारख्या घटनेत मेणबत्या पेटवण्याऐवजी जागीच ठार केले तर एक ही गुन्हा पुन्हा घडणार नाही. यासाठी दोष फक्त शासन यंत्रणा नाही तर जाणीव जागृतीचा आहे. प्रत्येक पुरुष तिच्याकडे सन्मानाने आपले कुणीतरी आई , ताई म्हणून पाहू लागला तर तो नक्कीच तिच्यावर अन्याय होताना बघणार नाही. रस्त्यावर बलात्कार करताना तिचा व्हिडिओ काढण्याऐवजी गुन्हेगारास पोलिसांच्या ताब्यात देईल. अन् पोलीस ही निर्णय लवकर घेतील. अन् कायद्यात जेव्हा कडक फाशीची शिक्षा बलात्कारास असेल तेव्हा कुठे हे प्रकार थोडे का होईना थांबतील.
आज एखाद्या चिमुरडीकडे बलात्काराच्या दृष्टीने जर आपण पाहत असू तर या इतके दुर्दैव नाही. म्हणून बदलायला हव्या त्या स्त्रियांकडे पाहणाऱ्या नजरा.
लेखिका - सौ. शितल सतिश शिंदे

Post a Comment
0 Comments