Type Here to Get Search Results !

रासेयो मार्फत राजुरी मध्ये अनेमिया व थॅलसेमिया तपासणी शिबीराचे आयोजन, १०७ किशोरवयीन मुलींची मोफत तपासणी.



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्टीय सेवा योजना व समर्थ काॅलेज ऑफ इंजिनिअरींग अँड मॅनेजमेंट,समर्थ काॅलेज ऑफ काॅम्प्युटर सायन्स, समर्थ लॉ कॉलेज, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर राजुरी येथे संपन्न होत आहे.

समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या वतीने अनेमिया व थ्यालेसेमिया तपासणी शिबिर विद्या विकास मंदिर राजुरी या शाळेमध्ये नुकतेच आयोजित करण्यात आले.यामध्ये शाळेतील १०७ किशोरवयीन मुलींची मोफत तपासणी करण्यात आली.

अनेमिया व थॅलसेमिया या रोगावर जनजागृती करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या सहकार्याने केले जात आहे.

अनेमिया व थॅलेसीमिया बद्दल अधिक माहिती देताना डॉ.रमेश पाडेकर म्हणाले की,अ‍ॅनिमिया हा स्त्रियांमध्ये आढळणारा नेहमीचा आजार आहे. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष,खाण्यापिण्याची हेळसांड ही त्यामागची महत्त्वाची कारणं आहेत.अ‍ॅनिमियामध्ये प्रचंड अशक्तपणा जाणवतो.आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांना कामं करण्यासाठी प्रत्येक पेशीला पुरवला जाणारा ऑक्सिजन ज्या लाल रक्त पेशींमधून मिळतो त्या लाल रक्त पेशींमधले हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणं म्हणजे अ‍ॅनिमिया होय.यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.हिरव्या भाज्या हा त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे.नैसर्गिकरित्या काहीशा काळसर असलेल्या मनुका,अक्रोड,गूळ अशा पदार्थामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं.

थॅलेसीमियाचे दोन प्रकार आहेत.जर जन्मलेल्या मुलाच्या दोन्ही पालकांच्या जीन्समध्ये मायनर थॅलेसीमिया असेल तर मुलास मेजर थॅलेसीमिया होऊ शकतो कि जो अत्यंत घातक ठरू शकतो.परंतु पालकांपैकी एकालाच मायनर थॅलसीमिया असेल तर मुलांना काहीही धोका नसतो.दोन्ही पालकांना मायनर प्रमाणात आजार झाला असेल तर मुलास हा आजार होण्याची शक्यता २५ टक्के असते.आणि म्हणूनच हे महत्वाचे आहे की मुलगा आणि मुलगी या दोघांनीही लग्नापूर्वी त्यांच्या थॅलसीमिया चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.कोरडा चेहरा,सतत आजारपण,वजन न वाढणे यासारखी अनेक लक्षणे थॅलसीमियाग्रस्त मुलांमध्ये दिसून येतात.

यावर उपाय काय? तर लग्नाआधी महिला आणि पुरुषांच्या रक्ताची चाचणी घ्या.गर्भधारणेदरम्यान याची तपासणी करा.रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण ११-१२ ठेवण्याचा प्रयत्न करा.वेळेवर औषधे घेणे आणि पूर्ण उपचार करणे गरजेचे आहे.

शाळा,महाविद्यालयांमध्ये असतानाच विद्यार्थ्यांची अनेमिया व थॅलसेमीयाची चाचणी करणे गरजेचे असून इलाजापेक्षा संतुलित आहार व जीवनशैली महत्वाची असल्याचे युवा नेते वल्लभ शेळके म्हणाले.

यावेळी विद्या विकास मंदिर चे प्राचार्य जी के औटी,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे रमेश पाडेकर,यशवंत फापाळे,समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंग चे विद्यार्थी,डॉ.स्नेहल नानापुरे,डॉ.सौरभ कोकाटे,अजय वाळुंज,प्रवीण कणसे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,रासेयो समन्वयक प्रा.भूषण दिघे,कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश जाधव,प्रा.रुपेश कांबळे,प्रा.अश्विनी खटिंग,प्रा.कल्याणी शेलार,प्रा.सोमनाथ गाडेकर,डॉ.सचिन भालेकर आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments