कल्याण दि. ११ जानेवारी २०२५ रोजी १६० वर्षांची अवरत परंपरा जपणारे सार्वजनिक वाचनालय कल्याण यांनी कल्याण, डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पु भा. भावे व्याख्यानमाले अंतर्गत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमात *वाचन कौशल्य कार्यशाळा हा उपक्रम आयोजित केला होता.. त्यावेळी व्यासपीठावरून बोलतांना ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे, ओतूरकर यांनी "आताच्या नव तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलमुळे वाचन संस्कृती मधील गावाकडील नातेवाईक मंडळीना पत्र लिहिणारी मंडळी, पत्र वाचणारा शाळेतील शिक्षक, घरोघरी जावून जिव्हाळ्याचा निरोप घेवून येणारा पोस्टमन, आणि शाळेच्या कट्टयावर नातेवाईक मंडळींची पत्र वाचणारा शिक्षक आता कुठच दिसत नाही.
आता दिसतात फक्त रस्त्यात कानात ऐकण्यासाठी लावले रिंग, मोबाईल. आणि वेडेवाकडे हात वारे करीत जाणारी मंडळी. गल्ली बोळात कुठं तरी आडोशाला चोरून लपून मोबाईलवर हितगुज करणारी तरूणाई आणि घरात एकत्र असूनही एकमेकाशी न बोलणारे आई-बाप, नवरा-बायको, आई-मुलगी, भाऊ-बहिण आजी-आजोबा किंवा नातेवाईक एकत्रत बसून गप्पा मारताना कुठेच दिसत नाहीत. मग वाचनालयात किती मंडळी पुस्तकांचे वाचन करीत असतील हा प्रश्न निर्माण होत आहे.
अलिकडे कवी, लेखक, साहित्यिक मंडळी मोठ्या प्रमाणावर पुस्तक प्रकाशित करतांना दिसतात. पण सदर पुस्तके विकत घेवून ती वाचताना आताच्या लोक लोक संख्येच्या प्रमाणात तेवढी सुधारलेली दिसत नाही म्हणून या वाचन कार्यशाळेची योजनापुढे आली असावी .याला आपण सर्व मंडळी जबाबदार आहोत.
मोबाईल आवश्यक आहे पण त्याचाअति गैर वापर होत असल्याने अनेक गंभीर आजारांना आजची तरूणाई आणि इतर मंडळीना समोरे जावे लागते आहे.
खरं म्हणजे पाहणे, बोलणे. वाचणे आणि लिहिणे या चार गोष्टीवर वाचन संस्कृती टिकून आहे. पण आपण आणि आपली मुले अलीकडच्या काळात काय पाहतात, काय बोलतात, काय वाचतात आणि कोण काय लिहितो याकडे आपले कोणाचेच लक्ष नाही. असेच वातावरण सद्या तरी दिसते आहे.
पूर्वी कसं.. बालभारतीच्या पुस्तकात लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून मोठी मोठी रंगीत चित्र पुस्तकात असायची आणि ती चित्र पाहून मुले शिकायची. एकेक शब्द कसा वाचायचा ते शिक्षक मंडळी शिकवायची.
आई, कमल, गवत, घर.. अशी ती मोठी रंगीत चित्रे असायची
कमल घर बघ. जगन गवत आण... या सोबत कडेवर मुल घेतलेल्या बाईचं (महिलेच) मोठं आईच चित्र असायचं त्या चित्राच्या बाजुला ठळक अक्षरात *आई* हा शब्द लिहिलेला असायचा तसच घराच चित्र मोठं आणि सोबत *घर* शब्द ..
लहान मुलांना कडेवर मुल घेतलेली आई कळते. पण अक्षर वाचता येत नाही. घर ओळखता येते. पण *घर* हे अक्षर वाचता येत नाही. चित्र पाहू आई घर बघ, कमल घर बघ. हे सुरुवातीला तोंडपाठ केलेले असे...
आपल्याला वाटते मुल खुप छान वाचन करते आहे. पण हे सर्व तोंडपाठ असल्याने रोजच्या सरावाने ते बोलते. पण चित्र बंद करुन.. आता शब्द वाच म्हटले तर.... ते उतर देत नसे ...हळूहळू पुढे पुढे गुरुजी, आणि आणि शाळेतील बाईंनी अक्षर कसे वाचावे याचं सराव केल्याने मुलांना अक्षराची ओळख होते. आणि मुले स्वतःचं वाचन करू लागतात. असो.
हे सर्व पूर्वी होतं आताही तीच पद्धत सुरु आहे पण लहान वयात मुलांच्या हातात मोबाईल आल्याने खुप गुंता होत चालला आहे.
पूर्वी रंगी बेरंगी खेळणी मुलांना खेळायला दिली जात होती आता मुल रडते. ऐकत नाही. पण मोबाईल हाती दिला की, गोड हसते. आणि इथेच त्याचे आणि आपले हसू होते. हे आपल्याला अजून उमगले नाही.
एका बाजुला आमची माय मराठी अमृताशी पैजा जिंकते म्हणायचं आणि दुसरीकडे गल्लीबोळात इंग्रजी शाळा सुरु करुन इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे. असं म्हणून आपल्याच मराठी मुलांना इंग्रजी शाळेत पाठवायचं आणि मराठी शाळेत मुले कमी झाली म्हणून आपणच बोंब मारायची.
इंग्रजी शिकणे काळाची गरज असली तरी आपण आपल्या माय मराठीला फक्त मराठी भाषा भाषादिन, मराठी भाषा पंधरवडा १ मे महाराष्ट्र दिन याच दिवशी मराठी वाचवा, मराठी बोला.. असं बोलायचं. हे कितपत योग्य आहे.
मला एक गोष्ट आठवते की, आपल्याकडं इतकी साधू संत मंडळी होवून गेली त्यांनी खुप ग्रंथ, गाथा, पुराणांमधून अभंग, ओव्या, गवळण, भारुड यावर विपुल लेखन केले आहे. आजही खुप लिहिले जात आहे. पण त्यावेळी जसं आपल्याच काही मंडळींनी तुकोबाची गाथा इंद्रायणी नदीत बुडविली तसं आज मोबाईलमुळे होते की, काय? असा भास होत आहे.
आज कल्याण वाचनालयातील मा. भिकू बारस्कर सरांनी महाराष्ट्र सरकारचा हा उपक्रम होती घेवून वाचन संस्कृती जपण्याचे काम सुरु केले. याबद्दल मा. भिकू बारस्कर सर आणि त्यांच्या सर्व सहकारी मंडळींना मनापासून धन्यवाद..
महाराष्ट्र राज्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. याला सर्व लहान मोठया मंडळींनी साथ द्यावी. आणि वाचाल तर वाचाल ही म्हण सार्थ करण्याची हीच वेळ आहे.
यावेळी कविता, पत्र वाचन कसे करावे. त्यातली चढ-उतार याबद्दलची खुप छान माहिती मुलांना दिली.
त्यांनतर लेखन, दिग्दर्शक श्री अजय पाटील लिखित *बिऱ्हाड* हे लहान मुलांचे सुंदर बालनाट्य सादर करण्यात आले. त्यातही श्री. अजय सरांनी खुप छान संदेश दिला आहे. गरीबी काय आणि कशी असते, मुलांचे शिक्षण, गावगुंड, सरकरी शाळेतील शिक्षण प्रसार यावर खुप सुंदर प्रकाश झोत टाकला आहे. एकंदरीत खुप सुंदर बालनाट्य आहे. सर्व राज्यभर या बाल नाट्याचे प्रयोग व्हायला हवेत. जेणे करुन माणसाला परिस्थिती, संस्कार, संस्कृती, परंपरा यात शिक्षण किती महत्वाचे आहे. ते कळेल असे खाजगीत बोलतांना राजेश साबळे, ओतूरकर उपस्थितीत मंडळीना सांगत होते.
यावेळी वाचनालयाचे सरचिटणीस मा. भिकू बारस्कर सर, नाट्य कलावंत मा. शिवाजीराव शिंदे, मा. अजय पाटील लेखक दिग्दर्शक नेपथ्य जिल्हा परिषद शाळा राहनाळ भिवंडी तसेच या कार्यक्रमासाठी कॅ. रवींद्र माधव ओके हायस्कूल कल्याण (प.) आणि शशांक हायस्कूल कल्याण (प .) येथील विद्यार्थी, शिक्षक /शिक्षिका आवर्जून उपस्थिती होते. आणि कल्याण वाचनालयातील सर्व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते अतिशय नियोजनबध्द सुंदर उपक्रम आज संपन्न झाला.
Post a Comment
0 Comments