ठाणे : दिनांक २३ मार्च २०२५ रोजी ठाणे महानगर पालिकेच्या मराठी शाळा क्रमांक १३ खोपट येथील शाळेच्या हाॅलमध्ये कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेतर्फे... मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी सदर कार्यक्रम आणि पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. संतोष राणे शारदा प्रकाशन, मा. ज्योती कपिले जे के मिडिया, मा.किशोर भोईर अस्मिता वाचनालय, डॉ. मनोज वैद्य , अध्यक्ष आणि, सूत्रधार व निवेदक श्री मोरेश्वर बागडे यांच्या अथक प्रयत्नातून मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील त्यासाठी आपले नागरिक म्हणून योगदान तसेच पत्रकार, साहित्यिक आणि साहित्य संस्था मिळून काय करता येईल याबद्दल परिसंवादाचे सूत्रधार श्री मोरेश्वर बागडे यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळींनी परखड विचार मांडले.
त्यावेळी कार्यक्रमाला हजर असलेले ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे ओतूरकर यांनी मराठी भाषेला हे दिवस कोणी आणले? असा प्रश्न प्रेक्षक म्हणून व्याख्याते व रसिक प्रेक्षक यांना विचारला. ते म्हणाले,एका बाजूला मराठी भाषा अभिजात केली म्हणून सर्व मराठी जनता मनापासून आनंद व्यक्त करीत असतानाच काल-परवाच महाराष्ट्र शासनाच्या मा.शिक्षण मंत्र्यांनी या वर्षापासून मराठी शाळा सीबीएससी बोर्डाला जोडल्या जातील असे विधान केले. यावरून पुन्हा एकदा मराठी विषयाची शालेय स्तरावर वाट लावण्याची योजना सुरू असल्याची शंका मला मराठी भाषा अभिमानी म्हणून येते. आज या ठिकाणी पत्रकार बंधू-भगिनींचा कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे सन्मान करण्यात आला त्याचे औचित्य साधून शासनाने सीबीएससी बोर्डाला सर्व शाळा जोडल्या जातील अशी घोषणा केली याबद्दल सर्वांनी पत्रकार म्हणून आवाज उठवावा असे श्री साबळे यांनी आवाहन केले.पत्रकार आणि मान्यवर पाहुण्याच्या समोर उद्याच्या मराठीची अवस्था जी होईल याला जबाबदार कोण?असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सीबीएससी बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा, आपली संस्कार, संस्कृती, परंपरा, साधू संतांची शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू यांचा इतिहास सदर सीबीएससी बोर्डाच्या शाळेतून शिकवला जाईल का? ही मनातली खंत आणि प्रश्न? राजेश साबळे,ओतूरकर यांनी उपस्थित केला.
आपण मराठी मंडळी स्वतःचं मराठी बोलत नाही. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणून आपली मुले माध्यमाच्या शाळेत शिकतात. अनेक नेते आपल्या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढून सरकारी मराठी शाळा बंद पडण्याची सोयीस्कर योजना आखली आज अनेक ठिकाणी सोसायटीमधून इंग्रजी मधून माहिती पत्रक पाठविले जाते. हे अनेक मंडळींना लिहिता वाचता येत नसल्याने कळत नाही. एका बाजूला मराठी भाषेला अभिजात दर्जा आम्ही दिला. लोकांनी शासनाचे मोठे कौतुक केले. आता मराठी शाळाच सीबीएससी बोर्डाला जोडल्या जातील. मग त्यावर आपण पत्रकार साहित्यिक आणि साहित्यिक संस्था काही आवाज उठवणार की नाही? आपलीच मराठी मायबोली आपल्याच दारात कटोरा घेऊन उभी आहे तिला कोण वाचविणार!
उलट मराठी भाषेसोबत महाराष्ट्रातील इतर बोली भाषेचाही सन्मान झाला पाहिजे पण इथे आपणच आपल्या मराठी मातृभाषाचा अडचणीत आणण्याचे काम जोमाने सुरू आहे तिथं इतर भाषांचा काय? अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे ओतुरकर यांनी खंत व्यक्त केली. यावेळ वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक प्रा. नागेश हुलवळे यांनीही त्यावेळी मराठी भाषा संवर्धनासाठी त्यांची संस्था काय कार्य करते याची माहिती दिली. त्यावेळी निवेदक मा. मोरेश्वर बागडे पाहुणे ज्योती कपिले मनोज वैद्य प्राध्यापक संतोष राणे, किशोर भोईर आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते.
अतिशय छान कार्यक्रम झाला. ॲड. मनोज वैद्य यांनी उभारलेल्या अनेक गृह घरकुल संकुलातील सोसायट्यांना साहित्यिकांची नावे दिली आणि प्रत्येक मजल्यावर त्या त्या साहित्यिकांचे साहित्य लोकांच्या माहिती साठी उपलब्ध करून दिले आहे ही एक लक्षणीय व अभिमानाची गोष्ट यानिमित्ताने मनाला भावली.
या प्रसंगी अनेक कार्यरत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला . सर्व सन्मानित पत्रकारांचे अभिनंदन!!
सुत्रधार व निवेदन मोरेश्वर बागडे यांनी टोकदार प्रश्न विचारत परिसंवादाचा दर्जा उंचावर नेला. संपूर्ण कार्यक्रम दर्जेदार झाला. उपस्थित श्रोते यांनी ही सहभाग घेत शंका समाधान करून घेतले.परिसंवादाची संवादाची सांगता कविवर्य सुरेश भट यांच्या,"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी " या गीताने झाली. सारा श्रोतुवृंद त्यामुळे भारावून गेला. असे कार्यक्रम वारंवार घेतल्यास मराठी भाषेची वृद्धी व अभिमान टिकून राहील आणि लोक जागृती नक्की होईल अशी आशा करूया.
*राजेश साबळे ओतूरकर*
ज्येष्ठ साहित्यिक नीलपुष्प ठाणे
मो. ९००४६७४२६३
Post a Comment
0 Comments