Type Here to Get Search Results !

मुलांनी लिहिलेल्या "निसर्गाची शाळा" काव्यसंग्रहांचा करंजाळे येथे प्रकाशन समारंभ संपन्न



जुन्नर : करंजाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व जागतिक कला दिनाचे औचित्य साधून जि. प. प्राथ.शाळा करंजाळे व श्रावणधारा काव्य महोत्सव समिती,ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने, करंजाळे शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या "निसर्गाची शाळा" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ व चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पं. स. जुन्नरचे गटविकास अधिकारी विठ्ठलराव भोईर, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे व पांडुरंग भौरले तसेच श्रावणधारा समितीचे अध्यक्ष राजेश साबळे, आणि लेण्याद्री प्रकाशनाचे प्रकाशक रणजीत पवार यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

याप्रसंगी केंद्रप्रमुख साहेबराव मांडवे, बाळासाहेब भालेकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मुंढे, उपाध्यक्षा सैंद्रा शेळके तसेच त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. 

श्रावणधारा समितीचे प्रा. सुरेश डुंबरे, डॉ. खं. र. माळवे, डॉ. प्रवीण डुंबरे, संजय गवांदे आणि वर्ल्ड व्हिजन टाईम्सचे संपादक नागेश हुलावळे हेही याप्रसंगी उपस्थित होते. 

करंजाळे शाळेतील शिक्षक व लेखक उत्तम सदाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काव्यलेखन उपक्रम शाळेत राबविला गेला होता. शाळेतील मुलांनी या उपक्रमामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेत अनेक विषयांवर कविता लिहिल्या होत्या, त्याच कवितांचा संग्रह "निसर्गाची शाळा" मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

मुलांचा काव्यसंग्रह प्रकाशित करणारी करंजाळे शाळा जुन्नर तालुक्यातील पहिलीच शाळा ठरली आहे. हा काव्यसंग्रह लेण्याद्री प्रकाशनचे मालक व प्रकाशक रणजीत पवार यांनी स्वखर्चाने छापून मुलांच्या प्रतिभाशक्तीला नवे आकाश मिळवून दिले.

याप्रसंगी गटविकास अधिकारी विठ्ठलराव भोईर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले, तर तेही चांगल्या पद्धतीने काव्यलेखन करू शकतात. उत्तम सदाकाळ व शाळेतील सर्व शिक्षकांनी हे नवीन बालकवी घडविण्याचे काम केलेले आहे आणि हे कौतुकास्पद आहे.  

याप्रसंगी बालकवींना शुभेच्छा देण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पोपटराव राक्षे, सुभाष जगताप, बाळासाहेब लांघी, विकास राऊत, ताराचंद जगताप, सविता जंगम, पोपट भाऊ मुंढे, दिनकर जगताप, तुकाराम लांघी, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, करंजाळे शाळेचे आजी माजी विद्यार्थी, व समस्त ग्रामस्थ पूर्णवेळ उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मंडप स्पीकर व बैठक व्यवस्थेची सुविधा नंदकिशोर जगताप यांच्या सौजन्यातून उपलब्ध झाली होती. तसेच यावेळी जेष्ठ चित्रकार प्राध्यापक सुरेश डुंबरे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही पार पडला. विजेते स्पर्धक व बालकवींनी यावेळी आपली मनोगते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. 

अध्यक्षीय भाषणात राजेश साबळे यांनी विद्यार्थी, ग्रामस्थ व शिक्षक यांचे कौतुक करत काव्यलेखन करणाऱ्या बालकवींना पुढील साहित्यिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उत्तम सदाकाळ यांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन साहेबराव मांडवे यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके संयोजन व व्यवस्थापन सरला दिवटे व मुख्याध्यापक नामदेव मुठे यांनी केले तर नंदकुमार साबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments