Type Here to Get Search Results !

पहिला पाऊस



जेष्ठ महिन्यातला लाही...लाही...करणारा उकाडा. त्यावर उतारा ठरते पावसाची पहिलीवहिली लाजत मुरडत येणारी नवीनवरी सर. पशू, पक्षी, धरती, झाडे आणि प्रामुख्याने वर्षभराचा तहानलेला चातक पक्षी. साराच निसर्ग आसुसलेला ओलाव्यासाठी. सरीसोबत आलेली कायेला शांत करणारी शीतल हवा म्हणजे कसलाच साइड इफेक्ट न होणारं नैसर्गिक एअर कंडीशन.

   लहानगी मुलं, पहिल्या पावसात खेळायला आणि भिजायला खूप उत्सुक असतात. मोठ्यांनाही मोह आवरत नाही. यथेच्छ पहिली सर अंगावर घेण्यासाठी अंगणात मित्रांसोबत गोळा होतात. मस्त धिंगाणा घालतात. हा पाऊस गुणकारी सुद्धा; म्हणतात अंगावर आलेलं घामोळं नष्ट करतं आणि सर्दी, पडसं वै. काही होत नाही.

   निसर्गाचं रूप बदलायला या पहिल्या पावसापासूनच सुरवात होते. उत्साह, आनंद, गारवा साऱ्याच गोड भावना एकवटून येतात. बीज अंकुरण्याची प्रक्रिया सुरु होते. हा सृष्टी सृजन काळ होय. ग्रीष्माच्या उन्हात तापलेली धरा पावसाच्या शिडकाव्याने गार गार हवा आणि मातीचा सुगंध सोडते. हा गंध पहिल्या पावसाच्या सरीतच अनुभवायला मिळतो. धुळीने माखलेले डांबरी रस्ते, छप्पर, वृक्ष एकदम स्वच्छ होऊन मूळ रंगात येतात. 

   हाताची वाटी करून छपरावरून पडणारी सरींची धार झेलणारी मुलं पाहिली की वाटतं किती मनाला उत्साहित, प्रफुल्लित करतो हा पाऊस. कागदाची शुभ्र होडी करून दारासमोरील ओहोळात सोडली की ती कुठे आणि किती लांब जाते हे पाहण्यात सुद्धा गंमत असते. 'येरे येरे पावसा तुला देतो पैसा । पैसा झाला खोटा । पाऊस आला मोठा ।'

हे बडबड गीत आम्ही लहानपणी म्हणत असू; पण आज ग्लोबलायझेशनच्या आणि कॉन्व्हेन्ट स्कूलच्या युगात हे गाणे आणि क्षण कुठेतरी हरवून गेले आहे.

    अश्या या पावसाळी धुंद कुंद वातावरणात प्रकर्षाने आठवण होते ती कुरकुरीत कांदा खेकडा भजी आणि सोबत गरमागरम चहाची; तो सुद्धा खिडकीत बसून पावसाळी वातावरणाची चव घेत प्यायची मजा काही औरच. 

   नैसर्गिक वातावरणात बदल घडवून आणण्याची क्षमता या पहिल्या पावसात असते. सारे कसे स्वच्छ, निरभ्र, नितळ. निसर्गसृष्टी हिरवा रंग लेऊन ताजीतवानी होते. शेतकरी बांधव शेतीची स्वप्न रंगवू लागतो. डोंगर, दऱ्या, वनराई हिरवीगार होते. रंगीबेरंगी रानफुले आकार घेऊ लागतात. हा काळ स्वप्नवत; जिवाला वेड लावणारा असतो. प्रेमी मनाला मंत्रमुग्ध करणारा असतो. रानावनात तर मोर सुद्धा आपला चिंतामणी पिसारा फुलवून आनंदाने नाचू लागतात.

   प्रेमाचं आणि पावसाचं घट्ट नातं. दाटून आलं की व्यक्त व्हावंसं वाटतं. भरून आलं की कोसळावसं वाटतं. रिमझिम पडला की प्रेम बहरत आणि कोसळू लागला तर विरह जाणवतो.

या काळात जुन्यापुराण्या प्रेमाच्या भावना उफाळून येतात. पाऊस काय नि आठवणी काय दोघेही थांब म्हणून थांबत नाहीत. नैसर्गिक बदल आणि माणसाचं मन समांतर चालत असतात. या अनुषंगाने मनातील घालमेल नैसर्गिक बदलावर अवलंबून असते. दाहकता कमी झाली की उत्साह, आनंद, ओढ, गोड स्वप्न, हुरहूर, काहूर आपोआप वाढत जातात. भूतकाळात कधीतरी जगलेल्या प्रेमाच्या आठवणी जग्या होतात. डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात. हसू लागतात आणि कडेलोट झाला की डोळ्यातून कोसळू लागतात. असा हा पहिला पाऊस. लोभस, गोजिरवाणा. एका छत्रीतून अनेक प्रेमप्रकरणं उदयास आणणारा. अगदी हवाहवासा.


श्रीमती कल्पना दिलीप मापूसकर

मीरा रोड 

90826 46494

Post a Comment

0 Comments