Type Here to Get Search Results !

लेखिका कल्पना म्हापूसकर लिखित लेख "माय मरो मावशी जगो".



महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीने महाराष्ट्र पेटून उठला आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी तसेच औद्योगीक, व्यावसायिक शहर आहे. मुंबईत अनेक राज्यातून व्यासायिक दृष्टिकोनातून लोंढेच्या लोंढे येतात व इथेच स्थाईक होतात. आज इतर भाषिकांना मुंबई शहराची गरज आहे; पण मराठी भाषा शिकायची गरज मात्र वाटत नाही. त्यांच्या संवाद सुविधेसाठी इथल्या स्थानिक जनतेने हिंदी शिकायचे का ? मुंबईची गरज जर त्यांना आहे तर मराठी भाषेचा अवलंब देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यवसायासाठी आलेल्या वर्गाने करावा. स्थानिक कोवळ्या जीवावर सक्ती कश्यासाठी ? हिंदी भाषेची सक्ती हा मुद्दा इतरांची पाठराखण करणे असेल तर हा माय मराठीचा अपमान आहे.

जगात सर्वत्र कामकाज इंग्रजी भाषेतून होत असल्याने ती सर्वांनाच येणं अत्यंत गरजेचं आहे. SSC नंतर सर्वच विषय इंग्रजीतून शिकवले जातात. ते शिकणे जड जाऊ नये म्हणून सुरवातीपासून इंग्रजी आवश्यक आहे. तसं हिंदी भाषेचं कौतुक म्हणजे इतर राज्यातील लोंढ्याचं लालूनचालून, पाठराखण करणे एवढ्यापुरताच मर्यादित आहे. महाराष्ट्र हे असं राष्ट्र आहे की तिच्या अनेक शहरातच नव्हे तर खेडेगावापर्यंत उत्तरभारतीय पोहोचले आहेत व राजरोसपणे छोटामोठा व्यवसाय करत आहेत. शहरात दक्षिण भारतीय तर इतर लोक आपल्या व्यवसायच जाळं टाकून आहेत.

वास्तविक पाहता आज महाराष्ट्रात नगरसेवक, आमदार, खासदार हे इतर प्रांतिय आहेत. राजरोसपणे शहरावर दरदिवशी लोंढ्याच्या रुपात अतिक्रमण होत असतं. रेल्वे, पाणी, घरे कितीही सुविधा पुरवल्या तरी अपुऱ्याच पडत आहेत. 'अंगापेक्षा बोंगा मोठा' अशी शहराची अवस्था झालीय. इथे येतात झोपड्या करून राहतात. कालांतराने निवडणुकीच्या तोंडावर याच अनधिकृत झोपड्या सरकारकडून अधिकृत घोषित केल्या जातात आणि त्यावर टॉवर उभे राहतात. गेले ना अलगद फ्लॅटमध्ये !!त्यांच्या मताचा टक्का राखण्यासाठी हिंदी भाषा सक्ती आपल्यावर होतेय. स्थानिक माय मराठी डावलून हिंदी मावशीचा उदो..उदो.. होत आहे. हे सरकारचे धोरण सर्वश्रुत आहे.


कल्पना दिलीप म्हापूसकर 

मीरारोड

Post a Comment

0 Comments