Type Here to Get Search Results !

लेखिका कल्पना म्हापूसकर लिखित लेख 'आषाढस्य प्रथम दिवसे''आषाढस्य प्रथम दिवसे'



कालिदासाच्या 'मेघदूत' या खंडकाव्यातील ही ओळ आषाढ महिन्यातील प्रतिपदा या दिवसाला महत्व देऊन गेली आहे. त्यांच्या 'मेघदूत' या खंडकाव्यात आषाढस्य प्रथम दिवसे, या ओळीचा उल्लेख वारंवार केला आहे म्हणून कालिदासाच्या 'मेघदूता'तील 'आषाढस्य प्रथम दिवसे'

ही ओळ या दिवसाला महत्व देऊन गेली. कालिदासाची नेमकी जन्मतिथी माहिती नाही; परंतु आषाढातील प्रथम दिवस 'कविकुलगुरू कालिदास दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कालिदासप्रेमी नागपूर जवळील रामटेक येथे असलेल्या कालिदासांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात. अंदाजे चौथ्या ते सहाव्या शतकातील या गोष्टी असाव्यात असा नुसता अंदाज बांधण्यात येत आहे. 

   मंदाक्रांता वृत्तात केलेल्या या रचनेत प्रत्येकी चार चरणांची १११ कडवी आहेत. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागांत हे काव्य विभागलेलं आहे. पत्नीविरहामुळे व्याकुळ झालेला यक्ष मेघाबरोबर स्वतःच्या विद्योत्तमा नामक पत्नीला संदेश पाठवतो, या कल्पनेवर मेघदूत काव्य रचना आधारित आहे, हे सर्वश्रुत आहे. अनेक साहित्यिकांना वेडावून टाकणारं हे संस्कृत भाषेतील खंडकाव्य आहे. अनेक भाषिकांनी याचे भाषांतर करून तत्कालीन रसिकना समजावे म्हणून आपल्या बोलीभाषेत नेऊन ठेवले आहे; तर नव्वदहून अधिक टीका या काव्यावर झाल्यात. उत्कट प्रेमाच्या भावनेशिवाय मनुष्य जीवन कसे व्यर्थ आहे; हे या काव्यात सांगितले आहे.

    मेघदूत काव्यातील नायक यक्ष हा अलका नगरवासिय असून; कुबेराचा एक सेवक होता. आपल्या पत्नीच्या सहवासात इतका रममाण झाला की त्याला आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीचे भानही राहिले नाही. 

कामात हलगर्जीपणा केला म्हणून यक्षाला, यक्षराज कुबेराने एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा ठोठावली. अलका नगरीहून फार दूर असलेला 'रामगिरी' पर्वत ठिकाणी त्याला धाडण्यात आले; तेही एक वर्षाच्या प्रदीर्घ काळासाठी. बरेच दिवस पत्‍नीपासून दूर राहता...राहता... वर्षाऋतू सुरू झाला. प्रेमी जीवनात बहर आणणारा हा आल्हाददाय ऋतू. यक्षाच्या प्रेम भावना एकदम उचंबळून आल्या. पाऊसपाण्याच्या या दिवसात विरहाच्या झळानी तो होरपळून निघाला. आपल्या विरहाच्या भावना सखी पत्नीपर्यंत पोहचवण्यासाठी त्याने काळ्याशार, पाण्याने ओथंबलेल्या काल्पनिक ढगाची निवड केली. यक्ष राहत असलेल्या रामगिरीपासून ते पत्नी राहत असलेल्या अलका नगरीपर्यंत जाणाऱ्या वाटेचे रसभरीत वर्णन कालिदासाने या काव्यात केले आहे. ढगाला पत्नीची खुशाली घेऊन परत माघारी ये; म्हणून विनवणी करत अलगद अलका नगरीच्या दिशेने सोडून दिले आहे. असे मेघदूत खंडकाव्याचे लेखन आहे.

    असे हे संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वांनाच प्रेरणादायी ठरले आहे. महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी संस्कृतातील अतिउच्च दर्जाचे साहित्य भारताला दिलेले आहे.

   या मेघदूतचे रंगभूमीवरही अवतरण झाले. 'आषाढस्य' प्रथम दिवसे म्हणून ९० मिनिटांची नृत्यनाटिका झाली. रेडिओवर सांगितिका झाल्या. तत्कालीन साहित्यिकांनी मेघदूत काव्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनेक मार्गाने यशस्वी प्रयत्न केला.


श्रीमती कल्पना दिलीप म्हापूसकर 

मीरारोड

वृत्त

Post a Comment

0 Comments