प्रतिनिधी पिंपरी : जगद्गुरु संत तुकाराम महाराज्यांच्या पालखीचा गुरुवार (दि.19) रोजी पिंपरी चिंचवड शहरात मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी लाखो वारकऱ्याच्या साथीने पिंपरी मार्गे पुण्याच्या दिशेने पालखी मार्गस्थ झाली.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी शहरातून मार्गस्थ होताच वारीच्या वाटेवर स्वच्छता करण्यासाठी महापालिका सरसावली होती. यावेळी, सामाजिक बांधिलकी जपत गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे सदस्य सुद्धा सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानाची सुरुवात एका पर्यावरणवादी पथनाट्याद्वारे करण्यात आली. पालखी सोहळ्यात वाटप करण्यात येणारे खाद्यपदार्थ, केळी, पाण्याच्या बाटल्या व प्लास्टिक वस्तू रस्त्यावर टाकू नयेत, तसेच त्या कचऱ्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली. "स्वच्छता रोजचा सण असावा" "स्वच्छता हीच सेवा", "कचरा कचराकुंडीतच टाका", "स्वच्छता आपली जबाबदारी" अशा घोषणांनी आवाहन करण्यात आले. पालखी सोहळ्यानंतर मागे पडलेला कचरा गोळा करून बकेटमध्ये टाकण्यात आला व नंतर तो कचऱ्याच्या गाडीत भरला गेला. पिंपरी येथील आंबेडकर पुतळा चौक ते नाशिक फाटा मार्गावर सदर अभियान राबविण्यात आले.

Post a Comment
0 Comments