Type Here to Get Search Results !

लेखिका कल्पना म्हापूसकर लिखित लेख श्रावण



श्रावणात घननीळा बरसला.....

श्रावण आला ग बनी.......

अश्या विविध अलवार गाण्यांनी स्वरबद्ध झालेला श्रावण महिना म्हणजे सर्व मराठी महिन्यांचा राजाच जणू.

सूर्याची कोवळी सोनेरी किरण व चंदेरी पावसाच्या सरी. ऊन-सरींचा लपंडाव म्हणजेच श्रावण.

 "क्षणात येते सरसर शिरवे

 क्षणात फिरूनी ऊन पडे" बालकवींच्या काव्यातील हा श्रावण. आकाशी निरभ्र नभावर पसरलेला इंद्रधनुष्याचा कमनीय पट्टा म्हणजेच श्रावण. श्रावण म्हणजे हिरवळ. पाऊस सुरू झाला की सर्व रान हिरवाई सोबत विविध रंगीत रानफुलानी बहरून येतं. जिथपर्यंत आपली दृष्टी जाईल तिथपर्यंत सर्वच डोळ्याना दिपवून टाकणारे. डोळ्याची पारणे फोडायला लागणारे सृष्टीचे मनोहर सौंदर्य. डोंगरे दरीतून नागीणी सारखी सळसळणारी सरिता. कपारीतून तुषार उडवत वाहत येणारे झरे. हिरवळीवर बुट्टी सारखी उमलून येणारी विविध रंगी मनमोहक रानफुले. या श्रावणातला निसर्गाचा स्वर्ग अनुभव म्हणजे कोकण. अवघ्या पृथ्वीवरला स्वर्गच तो आणि त्यात श्रावण महिना म्हणजे अवर्णनीय निसर्ग सौंदर्य, उत्साहाचे झुळझुळ वारे निसर्गाचे मनमोहक रूप, मांगल्य-पावित्र्य, सणवार, उपास तापास, व्रतवैकल्ये, एक सोवळेपण.

   हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. एक पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात प्रामुख्याने सात्विक भोजनाचा विचार केला जातो केस-नखं कापणे निषिद्ध मानले जाते. 

   महिन्यातील दीप पूजन पासून श्रावण सणांना सुरवात होते. या दिवशी घरदार, ठेवणूकीतील भांडीकुंडी सर्व काही घासून पुसून स्वच्छ करून घेतात. ही श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारीच म्हणायला हरकत नाही.

श्रावण म्हणजे सणवार, गोड धोड जेवणे. श्रावणात महिन्याच्या पाचव्या दिवसापासून जी सणांना सुरवात होते ती नागपंचमी पासून ते थेट गोकुळाष्टमी पर्यंत सण काही संपतच नाहीत. त्यात दर श्रवणी शनिवार, सोमवार एकवेळ जेऊन उपास. जेवणही ठरलेलेच शनिवारी वालाची मोड काढून साली सोलून केलेली उसळ. फक्त जिरे व ओल्या खोबऱ्याचे वाटण. तसेच सोमवारी मुगाची उसळ. कधी सोबत लाल माठ लाल भोपळा घालून केलेला कारण श्रावणात कांदा लसुण व्यर्ज म्हणून . तर कधी अळूवडी. साधारणपणे संध्याकाळी हा एकवेळचे जेवण असलेला उपास सोडल्या जातो. हे उपवासाचे जेवण केळीच्या पानांवर वाढले जाते. नागपंचमीला अळूची पातळ भाजी व मोदक. श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी नरसय्या पूजला जातो. पुजलेल्या पिंपळाच्या झाडाखाली पडलेले पिंपळाचे पान घेऊन त्यावर सुपारी ठेऊन नरसय्या म्हणून पूजला जातो. भाजणी थालीपीठ नैवेद्य म्हणून दाखवतात. नवविवाहितांच्या मंगळागौर म्हणजे जागरणं. नवपरिणित मंडळींचा उत्सव जणू. मंगळागौरीची पूजा, आरती, नैवेद्य, महिलांचे पारंपरिक खेळ, उदा. झिम्मा, फुगडी, काट वट काना, मिरची का खुर्ची, श्रावण म्हणजे हास्य-मौज-मजा. वैभवशाली कुटुंबातील गाजावाजा.


कल्पना दिलीप म्हापूसकर

Post a Comment

0 Comments