Type Here to Get Search Results !

कुमशेत शाळेत बाल वारकऱ्यांचा पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.



कुमशेत | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे दप्तरविना शाळा – आनंददायी शनिवार उपक्रम आणि आषाढी एकादशी निमित्ताने आयोजित करण्यात आलेला बाल वारकऱ्यांचा पालखी दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात आणि पावसाच्या रिमझिम सरींमध्ये उत्साहात पार पडला.



या सोहळ्याची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून झाली. पालखी दिंडी सोहळा कुमशेत शाळा ते गावातील हनुमान मंदिर पर्यंत पायी नेण्यात आला. शाळा आणि अंगणवाडीतील लहानग्या बाल वारकऱ्यांनी रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी होऊन वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. मुलींनी आकर्षक नववारी साड्या, तर मुलांनी धोतर, उपरणे, फेटे अशा पारंपरिक पोशाखांनी सजून पालखी सोहळ्यात भाग घेतला. डोक्यावर तुळशीचे रोप ठेवून टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘पुंडलीक वरदा हरिविठ्ठल’, ‘ज्ञानेश्वरी माऊली तुकाराम’ अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले.



पालखी सोहळ्याच्या मार्गावर विद्यार्थी झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा अशा घोषणांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत होते. मंदिर परिसरात पोहोचल्यावर विविध उपक्रमांची रेलचेल होती. विद्यार्थ्यांनी रिंगण घालून संतांच्या अभंगांचे गोड गायन केले. चौथीतील विद्यार्थ्यांनी इतिहास विषयातील संतांच्या कार्यावर आधारित पथनाट्य सादर करून संतांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवली. संतांच्या वेशभूषेत साकारलेली ही पथनाट्य सादरीकरण उपस्थितांची मने जिंकून गेले.




कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी फुगडी व इतर पारंपरिक खेळांमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंद गगनात मावेनासा झाला होता. या वेळी मुख्याध्यापक यशवंत घोडे सर, शिक्षक श्याम लोलापोड सर, अंगणवाडी सेविका अमृता डोके, मदतनीस हर्षदा डोके, वैशाली डोके, पीडीसी बँकेचे निवृत्त अधिकारी सुभाष डोके, शा. व्य. माजी अध्यक्ष असलम इनामदार, शा. व्य. स. स. गणेश डोके, धीरज डोके, सिंधुबाई डोके, वाणी, तसेच ग्रामस्थ व पालक सहभागी झाले होते .शा.व्य.स.माजी अध्यक्ष विठ्ठल डोके यांनी बाल वारकऱ्यांना प्रसाद वाटप केला.

या उपक्रमामुळे विद्याशार्थ्यांना पंढरपूरच्या वारीचा प्रत्यक्ष अनुभव लाभला. पालकांनीही शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि अशा उपक्रमांनी मुलांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडत असल्याचे अभिप्रेत केले.

Post a Comment

0 Comments