तो कवी आहे...
आजही त्याच्या हातात खडू होता...
भिंतीवर काही तरी खरबडत आणि बडबडत
त्याचं लिहिणं सुरूच होतं...
ओळी वाढत होत्या गर्दी प्रमाणे...
त्याने आजही प्रश्न केले त्याच जोमाने...
देशाची प्रगती का झाली नाही?
महागाई अजून का गेली नाही?
भ्रष्टाचार इथला कधी बंद होणार?
बेरोजगारी गुन्हेगारी कधी मंद होणार?
प्रश्नांच्या मागे प्रश्न येत राहिले...
ते मस्तवाल सत्ताधाऱ्यांना आव्हान
देत राहिले...
हळू हळू गर्दी पांगूण गेली...
"रोजचं मढं त्याला कोण रडं"
असंच काहीसं सांगून गेली...
एक सुज्ञ नागरिक मात्र जागीच उभा होता...
बहुदा ही घटना त्याच्या मनाला भिडली होती...
हा प्रश्न विचारणारा आहे तरी कोण?
हे जाणून घ्यायची उत्सुकता वाढली होती...
त्याने हात पुढे केला आणि म्हटला
मला सुद्धा ही निर्भीडता हवी आहे...
इतक्यात कोणी तरी कुजबूजलं
नका नादी लागू त्याच्या!
तो कवी आहे...
सुमेध वंदना मधुकर सोनावणे
9967162063
Post a Comment
0 Comments