वाशी नवी मुंबई( प्रतिनिधी) : अनंतराज गायकवाड
मुंबई | राज्यातील हॉटेल आणि परमिट बार व्यावसायिकासाठी एकच करप्रणाली असावी, सरकारने करप्रणालीत केलेली अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी अन्यथा सर्व हॉटेल्स- परमिट रूम मालक व मद्यग्राहक रस्त्यावर उतरून लोकशाही मागनि आंदोलन करतील, असा इशारा नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत सोमवारी नेरुळ येथे बोलताना अध्यक्ष दयानंद शेट्टी यांनी दिला.
यावेळी बोलताना अध्यक्ष दयानंद शेट्टी यांनी सांगितले की, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी महसूल वाढीसाठी किरकोळ विक्री व्यवसायावर अन्यायकारक धोरण राबविले आहे. सरकारच्या या धोरणाला बैठकीत विरोध करण्यात आला. यावेळी प्रसार माध्यमांसमोर नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद शेट्टी, उपाध्यक्ष जयप्रकाश शेट्टी, सरचिटणीस महेश शेट्टी, खजिनदार मोहन गौडा आदि मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील मद्य उद्योग आर्थिक संकटात आहे. हॉटेल व्यवसायला उद्योगाचा दर्जा आहे मात्र, हॉटेल उद्योगाला कोणतीही सवलत किंवा व्यवसाय सुलभतेत कोणतीही मदत दिली जात नाही. सर्व प्रकारच्या आर्थिक आव्हानांना तोंड देत हा उद्योग आजही तग धरून आहे. राज्यातील हॉटेल असोसिएशन किंवा मद्य उद्योगातील कोणत्याही घटकास विश्वासात न घेता करप्रणालीत वाढ करण्यात आली असून त्याचा थेट परिणाम ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिकांवर होत असल्याचे उपाध्यक्ष जयप्रकाश शेट्टी, सरचिटणीस महेश शेट्टी यांनी सांगितले.
यावेळी वार्षिक उत्पादन शुल्काचा सर्वाधिक परिणाम सर्व परमिट रूम धारकांवर असल्याने मूल्यवर्धित कर (व्हॅट) तात्काळ रद्द करावा, सर्वसाधारण जनगणनेनुसार वार्षिक उत्पादन शुल्क नूतनीकरण शुल्क समायोजित करावे, विक्रीच्या पहिल्या टप्प्यावर उत्पादन शुल्क किमान वाढीसह
हॉटेल उद्योगाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित हॉटेलचालक आणि परमिट रूम धारक संघटनांकडून सूचना आणि मार्गदर्शन घेण्यात यावे,
ग्राहकांना दारू देण्यासाठी हॉटेलचे सीमांकन आणि हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी परमिट देणे या नियम आणि अटी शिथिल कराव्यात असा ठराव सदर वैठकीत संमत करण्यात आला. सरकारच्या अन्यायकारक धोरणा विरोधात राज्यभरातून हॉटेल व्यवसायिक विरोध प्रदर्शन करीत आहेत. येत्या काळात सरकारने विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल, असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रविंद्र शेट्टी, झोनल उपाध्यक्ष डॉ. शिवा मुडीगेरे ( वाशी ) माजी अध्यक्ष शाम एन. शेट्टी आदिसह नवी मुंबई, पनवेल मधील हॉटेल - बार मालक उपस्थितीत होते.
Post a Comment
0 Comments