पहिला पाऊस...
लहान असताना पाऊस चिडवायचा...
शाळेत जाताना रस्ता आडवायचा...
नेमकी छत्री आणि रेनकोट नसतानाच भिजवायचा...
हरवत चाललेलं बालपण पुन्हा रुजवायचा...
म्हणूनच तो हवा हवासा वाटायचा...
त्याच्या येण्याची आतुरता असायची...
निरागस स्वप्न डबक्यातल्या होडीत बसायची...
ना दूरचा प्रवास होता, ना कुठे पोचायची घाई...
खेळता खेळता सांज झाली तरी
सांभाळून घ्यायची आई...
तरुण झाल्यावर पाऊस खूणवू लागला...
त्याच्या येण्याने प्रेमाचा ओलावा जाणवू लागला...
सरी अंगावर कोसळताच त्याचे दवबिंदू व्हायचे...
हातात गुंतलेले हात सूर्यास्त पाहायचे...
परतीच्या वाटेवर निघताना पाऊस पुन्हा माघारी यायचा...
एकमेकांच्या सोबतीला काही काळ अजून द्यायचा...
मग पुन्हा हातात हात...
अन् सरायची रात...
उतार वयात पावसाचा आधार वाटतो...
त्याच्या येण्याने आठवांचा कंठ दाटतो...
असं नाही की, तो फक्त आभाळातूनच सांडतो...
अबोल अव्यक्त भावना तो बऱ्याचदा डोळ्यांतूनही मांडतो...
सुमेध वंदना मधुकर सोनावणे
9967162063
Post a Comment
0 Comments