नेहाने उगीचच उकरून काढलेल्या भांडणामुळे राज दुपारी जेवला देखील नाही, त्याने स्वतःला एका रूममध्ये बंदिस्त करून घेतले. नेहाने राजला दुपारी जेवायला बोलावले नाही एवढेच काय चहा प्यायला देखील बोलावले नाही.
संध्याकाळी अचानक घरामध्ये कांदा भजीचा घमघमाट दरवळला. राज तुझ्या आवडीची कांदा भजी केली आहे. भुकेल्या राजला मोह आवरता आला नाही. गरमागरम चविष्ट भजी आणि त्यासोबत चहाचा मग, राज खुश झाला.
राज नेहेमी तू माझ्या आधी उठतोस, ऊद्या मात्र मी आधी उठून तूला चहा बनवून देईन. राणी साहेब भलत्याच प्रसन्न झाल्या होत्या राजवर.
राज, बटर टोस्ट आणि चहा तयार आहे. ऊठ पटकन, राजला जागे करत नेहा म्हणाली. नाईलाजानेच राज उठला. नेहा, तू पण घे ना म्हणणाऱ्या राजला नेहा म्हणाली, पहले आप.
चहा बरोबर टोस्ट खाऊन तृप्त झालेला राज पुन्हा एकदा निद्रेच्या आधीन होण्यास उत्सुक असताना नेहा म्हणाली, राज अरे माझा वरद दादा आज येतो आहे, जळगावहून. काल अचानक ठरले त्याचे. पहाटे ३.३० वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस पोहोचते पुणे स्टेशनला. दादा कॅबने येणार होता पण मीच सांगितले, अरे कशाला पैसे वाया घालवतोस? राज येईल त्याची नवी कोरी इलेक्ट्रीक कार घेऊन, १० रूपयांपेक्षा कमी खर्च येतो या कारला.
अच्छा म्हणजे संध्याकाळी वरदचा फोन आला म्हणून काल कांदा भजी, चहा आणि आज इतक्या मध्यरात्री बटर टोस्ट, चहा. नाईलाजपे क्या ईलाज? ३ वाजताच राज निघाला स्टेशनला जायला.
१५ मिनिटांत राज स्टेशनला पोहोचला. त्यावेळी अनाऊन्समेंट होत होती - नागपूहून येणारी महाराष्ट्र एक्सप्रेस सुमारे अडीच तास ऊशिराने धावत असून पुण्याला सकाळी सहा वाजता पोहोचण्याची शक्यता आहे.
नेहा, गाडी अडीच तास लेट आहे, मी परत येतोय. निद्राधीन नेहाने राजने चौथ्यांदा केलेला फोन उचलला होता. नो, नो राज, येऊ नकोस. गाडी लेट असल्याचे मला माहित आहे पण गाडीने टाईम मेक अप केला तर? नेहा, तर मग दादा रिक्षाने येईल. अरे, तो आपल्यासाठी किती सामान आणणार आहे याची कल्पना तरी आहे का तूला? आणि एक महत्त्वाचे सांगायला विसरलेच. काल गाडी पकडण्याच्या घाईत वरद तिकीट काढायला विसरला. थोडे पैसे देऊन ट्रेन मधील टी सी ला मॅनेज केलं त्याने पण स्टेशन मधून बाहेर पडताना तिकीट चेकरने आडवले तर? पुण्याचे स्टेशन मास्तर तुझ्या ओळखीचे आहेत ना. वापर त्यांची ओळख नाहीतर तूच भर दंड. दादाचे गुगल पे पुण्याला आल्यावर बंद होते माहीत आहे ना तुला? बंद होते की तुझा दादा बंद करतो? ओठांवर आलेला प्रश्न राजने कसाबसा थोपवला. मी इथेच थांबतो नी दादाला घेऊनच येतो, वैतागलेला राज म्हणाला.
६.१० ला गाडी आली. सुटबुटातील वरद नक्कीच प्रभावी दिसत होता. राजकडे दोन मोठी पोती देऊन आणि स्वतःकडे दोन लहानशा पिशव्या घेऊन वरद एक्झिट गेट कडे चालू लागला. अवजड पोती नेतानेता राजची दमछाक होत होती. त्यातच एस्कलेटर बंद असल्याने राज खूप थकला होता. राजच्या सोसायटी जवळील बंगल्यात राहणारी रीना राजकडे वळून वळून पाहत होतो पण अंगावर नाइट ड्रेस नी दोन्ही हातात अवजड पोतं पकडलेल्या राजने रीनाला ओळख दाखवली नाही.
गेट वरील तिकीट चेकर बघून वरदचा वेग मंदावला. राजच्या पुढे चालणारा वरद आता राजच्या मागून चालू लागला. कुली समजून चेकरने राजला जाऊ दिले. साहेब तिकीट? चेकरने विचारले. माझ्या ड्रायव्हरकडे आहे असे वरद म्हणाला नी त्याच क्षणी राजने मागे वळून पाहिले. जा साहेब, चेकर आदराने वरदला म्हणाला.
वरद, मला आधी कुली बनवलेस नी नंतर ड्रायव्हर? काय हे? जिजाजी, नाही तर मोठा दंड भरावा लागला असता तुम्हाला, अहो तोच तर मी वाचवला. राजला भरपूर शारीरिक त्रास आणि मनस्ताप झाला होता पण भरपूर सामान सासरहून फुकटात मिळाल्याचा आनंदही झाला होता.
दुसऱ्या दिवशी नाश्ता झाल्यावर वरद म्हणाला, जिजू, मी आणलेल्या सामानाचे २५२००/- रूपये झालेत, कुलीचे २०००/- रूपये आणि तुमच्या मनात येईल तेवढे बक्षीस अॅड करून मला गुगल पे करा. वरद, अरे पण पुण्याला तुझे गुगल पे चालत नाही ना? जिजू, पैसे पे करायला चालत नाही पण रिसिव्ह करायला चालतं ना.
राजने ३१०००/- रूपये वरदला ट्रान्स्फर केलेत. मला वाटलं तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी रक्कम ट्रान्स्फर कराल, निदान ५१०००/- रूपये तरी.
वरद, मला अवजड पोती उचललायला लावलीस नी तिकीट चेकरला सांगितले की मी तुझा ड्रायव्हर आहे, तेव्हा कुठे गेली होती रे माझी प्रतिष्ठा?
पुढच्या आठवड्यात नेहा आणि राज एका मॅालमध्ये गेले तेव्हा राजने नेहाला दाखविले, वरदने आणलेल्या वस्तू मॅालमधये फक्त १८०००/- रूपयांना मिळत होत्या. राज, अरे पण मॅालमधील या वस्तूंना गावाकडच्या मातीचा सुगंध का असणार? आता दर महिन्याला वरदच आपल्याला लागतं ते सगळं सामान आणि ते पण अतिशय ऊत्तम दर्जाचे आणून देणार.
मला बाई भूक लागली, चल काही तरी खाऊ या, नेहा म्हणाली. नेहाच्या प्रतिष्ठेला शोभतील असे महागडे पदार्थ सेल्फ सर्व्हिस असल्याने राजने स्वतः सर्व्ह केलेत आणि तो स्वतः मात्र "स्वस्त पण मस्त" वडा-पावचा आस्वाद घेत होता त्यावेळी एक सुंदर तरुणी राजच्या समीप येत तीच्या आईला सांगत होती; आई हे माझे गुरू, राज सर. यांच्या मार्गदर्शनामुळेच मी सी ए झाले.
नेहाने डोळे विस्फारले ते राजच्या वाढलेल्या प्रतिष्ठेमुळे नाही तर एक सुंदर तरुणी त्याच्या अगदी जवळ आल्यामुळे.
-दिलीप कजगांवकर, पुणे
Post a Comment
0 Comments