Type Here to Get Search Results !

संघर्षाच्या पाऊलखुणा - लेखक यश घोडे, फोफसंडीकर



सह्याद्रीच्या कडेकपारीत पिढ्यानपिढ्या आपले वाडवडील जगण्याचा संघर्ष करत आले. ही संघर्षाची परंपरा अजूनही काही ठिकाणी जिवंत आहे. शहरी लोकांना आज रस्ते, पूल, दळणवळणाच्या सर्व सोयीसुविधा सहज उपलब्ध आहेत, पण ग्रामीण व डोंगराळ भागात अजूनही माणसाला निसर्गाशी लढा देतच जगावं लागतं.

मी स्वतः बालपणी हा संघर्ष अनुभवलाय. त्या काळी रस्ते नव्हते, पुलं नव्हते, दळणवळणाच्या साधनांचा अभाव होता. ओढे-नाले पार करण्यासाठी दगडांचा थर रचून तयार केलेल्या पायवाटेवरूनच आम्हाला जायचं व्हायचं. ती पायवाट पार करताना कधी पाणी गुडघ्यापर्यंत तर कधी कंबरेपर्यंत असायचं. जिवावर बेतणारे प्रसंग अनुभवले की आजही अंगावर काटा येतो.


३० जुलै २००६ रोजी असाच एक प्रसंग घडला होता. ओढा पार करताना मी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलो. जीवावर बेतलेली ती वेळ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरली. माझं प्राण वाचलं ते एका गबऱ्या बाहळ्या .दगडामुळे आणि लव्हाळ्या व जांभळीच्या झाडामुळे. त्या क्षणी मला प्रकर्षाने जाणवलं की निसर्ग फक्त रौद्र नाही, तो आपल्या मदतीलाही धावून येतो. आपल्या संस्कृतीत पूर्वजांनी निसर्गाला दैवत मानलं, पूजलं ते याच कारणासाठी. येथील दैवत दऱ्या आई ' वरसुआई 'दुर्गआई 'राणूबाई ' घोरपडा आई, कळमजाई ' वाघोबा

इत्यादी 


अलीकडेच मला अकोले तालुक्यातील शिसवद गावी जाण्याचा प्रसंग आला. डोंगररांगांनी वेढलेला, हिरवाईने नटलेला परिसर – आणि त्यातून वाहणारी मुळा नदी. पावसाळ्यात या नदीचा प्रवाह खूपच प्रचंड होतो. फेसाळलेलं पाणी खडकांवर आदळून धावतं आणि पाहणाऱ्याची धडधड वाढवून टाकतं.


शिसवद परिसरात "सांडवा" म्हणून ओळखले जाणारे नैसर्गिक रांजणखळगे आहेत. या रौद्र प्रवाहात गावकरी पलीकडे जाण्यासाठी साधी लाकडी फळी टाकतात किंवा लांब उडी मारतात. कधी पाय घसरला तर थेट प्रवाहात ओढला जाण्याचा धोका असतो. तरीसुद्धा शेतमजुरीला जाणं, भातशेतीच्या आवणीला पोहोचणं, बाजारहाट करणं – या गरजा टाळता येत नाहीत.

या संघर्षात गावकऱ्यांची खरी ताकद दिसून येते – एकजूट.

एकटा माणूस अशा परिस्थितीत कधीही अडचणीत सापडतो, पण समूहाने एकमेकांना हात दिला, आधार दिला तर अशक्य वाटणारी वाटही सहज पार होते.


ही संस्कृती पिढ्यानपिढ्या जपली गेली आहे. शहरातील लोकांसाठी पूल आणि रस्ते ही गृहीत धरलेली सुविधा असते; पण डोंगर-दऱ्यातील सामान्य माणसासाठी नदी-ओढा पार करणे म्हणजे जिवावरचा प्रसंग. तरीही तो निसर्गाशी लढा देत जगतो – हेच त्याचं खरं धैर्य आहे.

हा फक्त नदी पार करण्याचा प्रसंग नाही. हा मानवाच्या जिद्दीचा, जगण्याच्या धडपडीचा आणि सामूहिकतेच्या संस्कृतीचा प्रतीकात्मक दाखला आहे. निसर्ग कितीही कठीण झाला तरी माणूस त्याला हरवतो – कधी धैर्याने, कधी बुद्धीने, तर कधी एकजुटीच्या बळावर.

शिसवद येथील "सांडवा" सारख्या नैसर्गिक रांजणखळग्यांना जर योग्य प्रकारे जतन केलं, तर ते पर्यटनाला चालना देऊ शकतील. हिरव्यागार डोंगररांगा, फेसाळत्या नद्या, शुभ्रधवल पाझरधबधबे – हा निसर्गसौंदर्याचा ठेवा जगापुढे यावा, यासाठी रौप्य किंवा पूल होण प्रत्येक स्थानिकाचं स्वप्न आहे.


माझ्या या अनुभवांनी मला शिकवलं 

"जगणं म्हणजे संघर्ष. पण एकट्याने नाही, तर सामूहिकतेने, निसर्गाचा मान राखत, पूर्वजांच्या संस्कृतीची शिदोरी घेऊन केलेला संघर्ष."

याच वास्तव अनुभवांवर आधारित माझी कादंबरी –

"संघर्षाच्या पाऊलखुणा"

लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

--------------------------

यश घोडे फोफसंडीकर

Post a Comment

0 Comments