Type Here to Get Search Results !

लेखक दिलीप कजगांवकर लिखित कथा "मैत्री"



राज आणि नेहा हे एक अतिशय श्रीमंत कुटुंब. पुण्यात छानश्या बंगल्यात वास्तव्य. बड्या साहेबांचा मुलगा म्हणून त्यांच्या १० वर्षांच्या एकुलत्या एक मुलाला सर्वजण छोटे साहेब म्हणत.


राजच्या बंगल्याच्या बाजूला एका बिल्डिंगचे काम सुरू होते आणि तेथील वॉचमनचा मुलगा वरद, हा जवळजवळ छोट्या साहेबांच्याच वयाचा. दोघांची मैत्री नेहाला अजिबात पसंत नव्हती म्हणून नेहा घरी नसतानाच ते दोघे एकत्र खेळत.


त्या दिवशी छोट्या साहेबांनी फराळासाठी म्हणून त्यांच्या मित्रांना घरी बोलावले होते. वरदही स्वच्छ धुतलेले कपडे घालून त्यांच्यात सामील झाला होता. नेहा क्लबमध्ये गेली होती आणि तिच्या घरी काम करणाऱ्या मावशी मुलांना आग्रहाने फराळ वाढत होत्या. मुलंही फराळाचा आस्वाद घेण्यात मग्न होती. 


क्लबमध्ये झालेल्या वादामुळे, नेहा घरी परतली ती थोडी घुश्शातच. वरदला घरात बघून तिच्या रागाचा पारा अजुनच चढला. फराळ करण्यात मग्न असलेल्या वरदच्या हातातील प्लेट नेहाने ओढली आणि त्याला घराबाहेर ढकलले. वरदच्या हातात छोट्या साहेबांनी दिलेले चॉकलेट होते, ते देखील नेहाने वरदच्या हातातून हिसकावून घेतले. बाईसाहेब, हे चॉकलेट तरी राहू द्या ना मला, प्लीज, प्लीज. वरद हात जोडून विनवणी करत असताना नेहाने हिसकावलेले ते चॉकलेट, जमिनीवर पडले आणि नेहाने ते सरळ कचऱ्याच्या डब्यात भिरकावले. 


वरदचा हिरमुसलेला चेहरा आणि त्याच्या डोळ्यातील आर्त भाव छोट्या साहेबांच्या मनात कायमचे घर करून राहिलेत. त्यांना आईचे वागणे अजिबात आवडले नव्हते.


बिल्डिंगचे काम संपले, वरदच्या वडिलांची रवानगी दुसऱ्या साइटवर झाली. कालचक्र अव्याहतपणे चालूच होते. 


रक्तबंबाळ अवस्थेतील एका छोट्या मुलाला घेऊन एक तरुण घाईघाईने डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये शिरला. डॉक्टरांनी पटकन जखमा बघितल्यात आणि उपचार केलेत. पुढच्या आठवड्यात दाखवायला घेऊन या, डॉक्टरांनी सांगितले.


रिसेप्शनिस्टने आठ हजार रुपयांचे बिल त्या तरुणाला दिले. माझ्याकडे फक्त दोन हजार रुपये आहेत, त्या तरुणाने प्रामाणिकपणे सांगितले. आधी पैसे द्या आणि नंतर मुलाला घेऊन जा रिसेप्शनिस्टने कठोर शब्दांत सांगितले. 


वाढलेला आवाज ऐकून डॅाक्टर बाहेर आलेत. तुम्ही असे करा उरलेले सहा हजार रुपये उद्या द्या, डॉक्टर म्हणालेत. 


साहेब मी दर महिन्याला एक हजार रुपया प्रमाणे तुमचे पैसे आणून देईल परंतु मला जाऊ द्या, मला याला त्याच्या घरी पोहोचवायचे आहे. त्याच्या घरचे त्याची वाट पहात असतील.


डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून त्या तरुणाने सांगितले की हा माझा मुलगा नाही. मी रस्त्याने येत असताना एका स्कूटरने धडक दिल्यामुळे हा रस्त्यावर पडला होता. 


बघणारे अनेक होते पण कोणी पुढे येत नव्हते म्हणून मी याला पटकन उचलून आपल्या क्लिनिकमध्ये आणले. मला प्लीज जाऊ द्या मी तुमचे पैसे नक्की देईन, त्या तरुणाने हात जोडून विनवणी केली.


सिस्टर त्यांना जाऊ द्या आणि हो, त्यांच्याकडून घेतलेले दोन हजार रुपये त्यांना परत करा, डॉक्टरांनी सांगितले. धन्यवाद डॉक्टर साहेब, अतिशय कृतज्ञतेने म्हणत तो तरुण जायला निघाला. 


त्या तरुणाच्या आवाजातील आणि डोळ्यातील आर्ततेने डॉक्टरांचे मन हळहळले. डॉक्टरांनी निरखून बघितले, त्यांचा अंदाज चुकला नव्हता. तो तरुण वरदच होता. अनेक वर्षांपूर्वी स्वतःसाठी हात जोडून चॉकलेट मागणारा आणि आज दुसऱ्या कुणाच्या मुलासाठी हात जोडून विनंती करणारा. 


परीस्थिती गरिबीची पण वृत्ती मात्र देवाची.


वरद, मी छोटा साहेब म्हणत डॉक्टरांनी त्याला मिठीत घेतले. 


गरीबी आणि श्रीमंतीतील दरी अजूनही तशीच होती पण आज छोट्या साहेबांना थोपवायला त्यांची आई जवळ नव्हती. 


दोन मित्रांची ती भेट पाहताना रिसेप्शनिस्टला अश्रू आवरता आले नाहीत.


दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment

0 Comments