१० वी चे उत्तम वर्ग शिक्षक असा लौकिक असणाऱ्या सदानंद माने सरांचा आज निवृत्तीचा दिवस. आजच्या या कार्यक्रमाला, सरांच्या पहिल्या बॅचच्या, म्हणजेच २० वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांना खास निमंत्रण देण्यात आले होते आणि याच बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी एका धनवंत विद्यार्थ्याने सरांसाठी एक लाख रुपयांची गुरुदक्षिणा पाठविली होती, स्वतःच्या नांवाचा उल्लेख न करता.
आपल्या भाषणात सरांनी दोन गोष्टींची खंत बोलून दाखविली. पहिली खंत म्हणजे, सरांच्या गेल्या २० वर्षांच्या कार्यकाळात त्यांना आलेले एकमेव अपयश म्हणजे त्यांच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी १० वी पास झाला नव्हता. तो विद्यार्थी हुशार होता परंतु त्याचे अभ्यासात लक्ष नव्हते. सरांनी वारंवार सांगूनही त्याने सरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. परिणाम व्हायचा तोच झाला. तो विद्यार्थी १० वी ची परीक्षा नापास झाला आणि सरांच्या लौकिकाला अपयशाचा कलंक लागला. दुसरी खंत म्हणजे, उद्यापासून सरांना शाळेत जायचं नव्हतं, विद्यार्थ्यांना शिकवायचं नव्हतं. थोडक्यात धावपळीच्या जीवनाला पूर्णविराम, सरांची ईच्छा नसतानाही.
कार्यक्रम संपल्यानंतर सरांच्या त्यांच्या माजी विद्यार्थ्यांबरोबरच्या गप्पा छानच रंगल्या. सर, मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी आर्किटेक्ट, मी बिल्डर, मी चार्टर्ड अकाउंटंट असे सांगणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हेच सांगितले की आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळेच. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाच्या पार्श्वभूमीवर सरांना त्या १० वी नापास झालेल्या विद्यार्थ्याची कीव आली. असो, मी तरी काय करणार म्हणत सरांनी स्वतःची समजूत काढली. विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा निरोप घेऊन सर आपल्या घरी चालत जायला निघालेत १ लाख रुपयांचे पाकीट घेऊन.
शांत आणि मोकळा रस्ता. सर त्यांच्या विचारांच्या तंद्रीत पूर्णपणे हरवले होते आणि अचानक एका उंच नी धिप्पाड तरूणाने सरांना थांबविले. तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, परंतु मला काही करू नका, सर कळवळीने म्हणालेत. तुम्ही या गाडीत जाऊन बसा, तरुणाने सांगितले. सर निमूटपणे बाजूला उभ्या असलेल्या गाडीत जाऊन बसले.
दुतर्फा दाट झाडी असलेल्या मोकळ्या रस्त्यावरून गाडी सुसाट धावत होती. अहो हा तर खूप शांत एरिया वाटतो सर घाबरत घाबरत म्हणालेत. म्हणूनच तर या एरियाची निवड केली, तो तरुण शांतपणे म्हणाला. त्याने कुणालातरी फोन केला आणि सांगितले मी १० मिनिटांत जागेवर पोहोचतोय, तुम्ही देखील तिथे या.
हा तरुण आपल्याला लुबाडण्यासाठी कोणत्यातरी शांत ठिकाणी नेत आहे आणि मदतीसाठी त्याने त्याच्या मित्रांना देखील बोलावले आहे, सरांची मनोमनी खात्री झाली.
गाडीने मुख्य रस्ता सोडून कच्चा रस्ता पकडला. गाडीचा वेग कमी झाला, शांतता वाढली, मधून मधून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज तेवढा येत होता. थोड्याच वेळात गाडी अचानक थांबली, एका प्रचंड मोठ्या विहिरीसमोर. सरांनी बाहेर बघितलं, ४ धष्टपुष्ट तरुण तेथे आधीच येऊन थांबले होते. सरांच्या छातीची धडधड वाढली. ज्या तरुणाने सरांना गाडीतून आणले त्याने सरांना बाहेर येण्याची खूण केली.
५ धष्टपुष्ट तरुणांच्या गराड्यात सदानंद माने सर मधोमध उभे होते. सर खूप घाबरले होते. तुम्हाला काय हवे ते घ्या, परंतु मला मारू नका. माझ्याजवळ एक लाख रुपये आहेत, माझ्या एका माजी विद्यार्थ्याने मला गुरुदक्षिणा म्हणून दिलेले. खरंतर हे एक लाख रुपये देऊन मी माझ्यावर असलेले बँकेचे कर्ज फेडणार होतो परंतु तुम्हा लुटारूंना गुरुदक्षिणा आणि त्याचे मूल्य काय समजणार, सर कळवळून म्हणालेत.
बोटातील सोन्याची अंगठी, घड्याळ आणि एक लाख रुपयांचे पाकीट त्या तरुणाला देण्यासाठी सरांनी थरथरत हात पुढे केला. तो तरुण पुढे आला आणि त्यानंतर काय झाले ते सरांना समजले नाही. सरांचे भान हरपले. त्या तरुणाचे हात होते सरांच्या पायांवर आणि सरांचे हात त्याच्या डोक्यावर. तो तरुण म्हणत होता सर, मी तुमचा विद्यार्थी, एकमेव विद्यार्थी १० वी नापास झालेला. सर, मी तुमच्याकडून अभ्यास शिकलो नाही परंतु प्रामाणिकपणा, सचोटीने वागणे कुणालाही न फसवणे आणि सतत कष्ट करत राहणे या गोष्टी मी तुमच्याकडून शिकलो आणि त्याच्या जोरावरच मी भरपूर प्रगती केली. हा मोकळा प्लॉट आणि यामागील वनराई हे सर्व माझे आहे.
तुमच्या निरोप समारंभाला मी आलो होतो. माझ्यामुळे आलेल्या अपयशाची खंत तुम्हाला अजूनही जाणवते आणि शिकविण्याची तुमची भूक अजूनही संपलेली नाही हे मला जाणवले आणि म्हणूनच मी ठरविले की या मोकळ्या जागेवर एक शाळा काढायची आणि या शाळेचे मुख्याध्यापक तुम्ही असणार, कधीही निवृत्त न होणारे. एक अशी आदर्श शाळा की ज्या शाळेतील एकही विद्यार्थी १० वी नापास होणार नाही आणि तुमच्या यशाला अपयशाचे गालबोट कधीच लागणार नाही.
सर, हे माझे ४ जिवलग मित्र आपल्याला शाळेच्या उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करतील.
मित्रहो, हे माझे आदरणीय गुरुवर्य, सदानंद माने सर. आज मी जो काही आहे ते केवळ या सरांमुळेच. चारही मित्रांनी सरांना वाकून नमस्कार केला.
महेश झोपे नांवाप्रमाणेच वर्गात झोपणारा, सरांचे अजिबात न ऐकणारा, नेहेमी गुंडगिरीची भाषा करणारा महेश, आता पूर्णपणे बदलला होता. सरांनी महेशला जवळ घेतले. ते धष्टपुष्ट तरुण अजूनही सरांच्या जवळपास होते, कुत्र्यांचे भुंकणे देखील चालूच होते, परंतु त्यातील भय मात्र संपले होते. सरांच्या डोळ्यात अश्रू होते मात्र ते भयाचे नव्हे तर आनंदाचे.
महेशच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या एका मित्राने सरांना घरी सोडले. अतिशय आदबशीर आणि विनम्र वागणे. इतक्या चांगल्या तरुणांना मी गुंड समजलो, सर मनातल्या मनात शरमले. गप्पांच्या ओघात सरांना समजले की, ममता ही महेशची एकुलती एक मुलगी आणि तिने खूप शिकावे ही महेशची तीव्र इच्छा.
मोठ्या खुषीत सर घरी परतले. त्यांनी सावित्रीबाईंना सर्व वृत्तांत सांगितला आणि ते एक लाख रुपयांचे पाकीट सावित्रीबाईंना दिले. सावित्रीबाईंनी पाकीट उघडलं आणि त्या ओरडल्या, सदा यात एक लाख रुपयेच नाहीत.... सावित्री कसं शक्य आहे ते? सदानंद आश्चर्याने म्हणालेत. सदा, अरे मला पुर्ण बोलू दे. अरे यात एक लाख रुपयेच नाहीत तर त्याचबरोबर एक लेटरहेड देखील आहे, एका खूप मोठ्या माणसाचे. जे आहेत, ममता बँकेचे चेअरमन, ममता सहकारी संस्थेचे संस्थापक, ममता रिटेलचे संचालक आणि ममता फार्मचे मालक.
त्यावर लिहिले आहे सर, तुमचा एकमेव विद्यार्थी, १० वी नापास झालेला आणि या अपयशाचे सल मनात कायम असलेला, १० वी नापास म्हणून अनेकांकडून अपमानित झालेला तुमचा विद्यार्थी, महेश झोपे.
सरांचे डोळे पाणावलेत. सरांच्या पटकन लक्षात आलं की आपण ममता बँकेतून घेतलेले एक लाख रुपयांचे कर्ज आपल्याला परत फेडता यावेत म्हणूनच महेशने गुरुदक्षिणेच्या रूपात आपल्याला एक लाख रुपये दिलेत. २० वर्षे मनात असलेली अपयशाची भावना क्षणात नाहीशी झाली. निवृत्तीनंतर आता काय करायचे हा प्रश्न देखील मिटला होता. आता सरांना एक शाळा काढायची होती, एक आदर्श शाळा, अगदी महेशच्या मनात होती तशी.
काम तसे सोपे नव्हते, परंतु सदानंद माने सरांसाठी ते अवघडही नव्हते.
-दिलीप कजगांवकर, पुणे
Post a Comment
0 Comments