Type Here to Get Search Results !

लेखक दिलीप कजगांवकर लिखित कथा "वर्गणी"



राज, सगळ्यांकडून गणपतीची वर्गणी मिळाली फक्त घर नंबर ११५ कडून नाही. मी दोनदा गेलो, परंतु त्यांनी दरवाजाच उघडला नाही. दुसऱ्यांदा गेलो तेव्हा तर घरात लाईट चालू होते आणि त्यांच्या घरासमोरील झाड पडल्याचा खूप मोठा आवाज झाला तरीही त्यांनी दरवाजा उघडला नाही, बहुतेक वर्गणी द्यायची नसेल त्यांना, गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता सांगत होता.


मित्रा, ते बाहेर गेले असतील आणि घरातले लाईट चालू राहिले असतील. ठीक आहे, मी उद्या सकाळी जाऊन पाहतो, राज म्हणाला.


दुसऱ्या दिवशी सकाळीच राज तेथे पोहोचला. वर्गणी घेऊनच निघायचे, राजने मनोमनी ठरविले. राजने बेल वाजवताच दरवाजा उघडला आणि काय आश्चर्य! राजच्या कॉलेजमधील नेहाने दरवाजा उघडला.


राज, इतक्या सकाळी इकडे कसा काय? नेहाने आश्चर्याने विचारले. नेहा, अगं काल रात्री तुमच्या घरासमोर मोठे झाड पडले, खूप आवाज झाला. बेल वाजवली परंतु दरवाजा कोणीही उघडला नाही म्हणून काळजी वाटत होती आणि म्हणूनच अगदी सकाळी सकाळी आलो.


राज मी आपल्यासाठी चहा करते म्हणत नेहा आत गेली. चहा पिता पिता नेहाने जे सांगितले ते ऐकून राज स्तंभित झाला. 


दोन महिन्यांपूर्वी रात्री नेहाच्या आई-बाबांना एका कारने उडवले आणि दोघांच्या पायांना खूप मोठी दुखापत झाली, त्यामुळे त्यांना चालता देखील येत नाही. काल संध्याकाळी मी घरी नव्हते म्हणून दरवाजा उघडला नाही, नेहाने स्पष्टीकरण दिले.

राज, त्या माणुसकीहीन कार चालकाने गाडी देखील थांबवली नाही, सरळ निघून गेला. 

हे कुठे घडलं राजने विचारले? 

एस पी कॉलेजच्या समोर, साधारणतः रात्रीचे दहा- साडे दहा वाजले असावेत, नेहा म्हणाली.


राजला तो दिवस आठवला. आई, बाबा आणि तो एका पार्टीहून परतताना त्याच्या बाबांकडूनच तो अपघात झाला होता. बाबा ड्रिंक्स घेऊन गाडी चालवत होते, पोलिस केस झाल्यास खूप महागात पडेल, म्हणून ते मदत करायला थांबले नाहीत. त्या दिवशी राजने वडिलांना गाडी थांबवून, जखमींना रुग्णालयात नेण्याची विनवणी केली होती परंतु त्यांनी राजचे ऐकले नव्हते.


राज, अरे कुठे हरवलास? नेहाने विचारल्यावर राज वर्तमानात परतला.


दोघांच्याही डाव्या पायाचे ऑपरेशन करायला लागेल आणि त्याला चार लाख रुपये खर्च येईल असे डॉक्टरांनी सांगितले. एफ डी मोडून दोन लाख मिळतील आणि बाकीच्या दोन लाखांची व्यवस्था झाल्यावर ऑपरेशन करायचे, असे आम्ही ठरविले आहे, नेहा म्हणाली. 


मी काही मदत करू का? राजने विचारले. नको राज, कोणाचीही मदत घेतलेली आई-बाबांना आवडणार नाही, नेहाने स्पष्ट केले.


वर्गणी मागायला आला खरा पण ती न मागताच राज तेथून बाहेर पडला. हे सर्व आपल्यामुळेच झाले हे राजने मनोमनी मान्य केले होते.

एकदम राजच्या लक्षात आले की नेहाचा आवाज खूप छान असुन ती सुंदर गाते. कॉलेजमध्ये गायनाच्या स्पर्धेत ती नेहेमी प्रथम क्रमांक पटकावते. 

राजने गणपती उत्सवात गायनाची स्पर्धा ठेवून त्या स्पर्धेचे बक्षीस दहा हजार रुपये ठेवले. अर्थातच बक्षीस नेहाला मिळाले, तेवढीच तीला थोडीशी मदत! 


त्यानंतर राजने अशा अनेक स्पर्धा आयोजित केल्या बक्षीसाची रक्कम खूप मोठी ठेवून. प्रत्येक स्पर्धेत नेहाने बक्षीस पटकावले अर्थात तिच्या गोड गायनामुळे. नेहा राजला पाहत होती, कधी कधी श्रोत्यांमध्ये तर कधीकधी पुढे येऊन तीचे अभिनंदन करताना. आताशा नेहाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. आवश्यक तेवढा पैसा जमल्यावर नेहाने आई-वडिलांचे ऑपरेशन केले आणि सुदैवाने ते ऑपरेशन यशस्वी झाले. 


नेहाला समजले की गायनाच्या स्पर्धा आयोजित करण्यात राजचा मोठा हात होता आणि त्यानेच बक्षिसाची रक्कम बऱ्यापैकी मोठी ठेवली होती. थोडक्यात ऑपरेशनसाठी लागणारी रक्कम जमवण्यास राजने नेहाला मोलाची मदत केली होती. का केले असेल त्याने? काय असेल त्याच्या मनात? माझी सिंपथी मिळवायचा प्रयत्न करतोय का? नेहाला काहीच समजत नव्हते.


काहीही असले तरी, राजला भेटून त्याला थँक्स म्हणावे असे नेहाला मनापासून वाटले. कॉलेजच्या ऑफिसमधून राजचा नंबर मिळवायचा असे तीने ठरविले.


काय तो योगायोग! दुसऱ्या दिवशी सकाळीच राज नेहाच्या घरी हजर!


राज, मला तुला काहीतरी सांगायचे आहे, नेहा म्हणाली. नेहा मलाही तुला काहीतरी सांगायचेय, राज म्हणाला. 


राज तू मला अप्रत्यक्षपणे केलेल्या मदतीबद्दल मला समजले. त्यामुळेच माझ्या आई-बाबांच्या पायाचे ऑपरेशन होऊ शकले, मी तुझे मनापासून आभार मानते. आता तुला काय सांगायचे ते सांग, नेहा म्हणाली. 


नेहा, तुला कसे सांगावे ते मला समजत नाही. संकोचही वाटतो आणि धीरही होत नाही. सांगावे की नाही, तेच समजत नाही.

नक्कीच काहीतरी "लव यू" मॅटर असावे, नेहाने अंदाज बांधला. उगाच अडकायला नको म्हणून नेहा पटकन म्हणाली, अरे एक सांगायला विसरले. आमच्या सिंगिंग ग्रुप मधील एका मुलीने मला तिच्या भावासाठी विचारले आहे आणि पुढच्या आठवड्यात मला माझा निर्णय सांगायचा आहे. हे ऐकल्यावर राजचा चेहरा पडतो की काय? हे नेहाला पाहायचे होते परंतु त्याच क्षणी राजला शिंक आली आणि त्याने चेहरा रुमालाने झाकला. 


नेहा मागच्याच महिन्यात एका अपघातामुळे माझे आई-बाबा गेलेत. काल आई माझ्या स्वप्नात आली आणि तिने मला तुला सर्व सत्य सांगायला सांगितले.  

सत्य? कसले नी काय सत्य? आणि मला का सांगायचे? नेहाने विचारले.


नेहा, तुझ्या आई-बाबांना ज्या कारने उडवले ती कार माझे बाबा चालवित होते, दारूच्या नशेत. पोलीस केस होऊ नये म्हणून त्यांनी मदत केली नाही. मी ज्यावेळी प्रथम तुझ्या घरी आलो आणि तू तुझ्या आई-बाबांच्या अपघाताबद्दल बोललीस त्यावेळी मला समजले की हे सर्व माझ्या बाबांमुळे झाले होते आणि म्हणूनच तुला शक्य तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न केला. प्लीज तु मला माफ कर. राजचा प्रामाणिकपणा नेहाला आवडला. 


नेहा, मलाही एका मुलीने लग्नाबद्दल विचारले आहे, राज म्हणाला. 

राज, कोणी विचारले? नेहाने अधीरतेने विचारले. 

रीनाने, राज म्हणाला. कदाचित तू तीला ओळखत असशील. हो अर्थातच ओळखते मी तीला. ती दिसायला ठीक आहे पण खूप रागीट स्वभावाची आहे, नेहा म्हणाली. 


नेहा, आता तु जोडीदार निवडला आहेस आणि रीनाला तू ओळखतेस, त्यामुळे पुढच्या आठवड्यात मी रीनाला माझा होकार सांगेन, राज म्हणाला. 


राज, अरे माझे मी अजून काही ठरविले नाही, मला विचार करावा लागेल, नेहा म्हणाली. मी दोन-तीन दिवसांत रीनाची अजून माहिती काढून तुझ्याशी बोलते आणि त्यानंतरच तू तुझा निर्णय घे, अजिबात घाई करू नकोस, नेहा म्हणाली. 


दोन दिवसांनी राज नेहाकडे पेढे घेऊन आला. राज, अरे मी तुला सांगितले होते ना मी तुझ्याशी बोलल्याशिवाय तू रीनाला होकार देऊ नकोस आणि तू चक्क तिला होकार देऊन पेढे घेऊन आलास? कसली घाई झाली होती तुला? काय जादू केलीय तीने तुझ्यावर? आजूबाजूला कधी बघितले नाहीस का? तीच्यापेक्षा चांगली मुलगी दिसली नाही तुला? नेहाचा राग तीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.


नेहा, अगं मी रीनाला होकार नाही, नकार दिला.

मग हे पेढे कशासाठी? नेहाने विचारले. तुझे तोंड गोड करून तुझा गोड होकार मिळवण्यासाठी, राज म्हणाला. 


रीनाला दिलेल्या नकाराचा पेढा राजला भरवुन, त्याला घट्ट मिठी मारत, नेहाने तिचा गोड गोड "होकार" राजला दिला. त्या दिवशी वर्गणी मागायला आलो होतो, तेव्हा वर्गणी मिळाली नाही पण आज मात्र आयुष्याची पर्वणी मिळाली असे म्हणत राजने गणरायाचे मनापासून आभार मानले. गणपती बाप्पा मोरया म्हणणाऱ्या राजच्या आवाजात नेहाने तीचा मधाळ आवाज मिसळला. गणपती बाप्पा पावला होता दोघांना. 


-दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment

0 Comments