Type Here to Get Search Results !

लेखक दिलीप कजगांवकर लिखित कथा "नाते"



आबा फिरायला गेले असताना अचानक खाली कोसळणार तोच समोरून येणाऱ्या गृहस्थाने त्यांना धरले. आबा ओळखलंस का मला? मी वरद. अरे दोन-तीन महिन्यांपूर्वी तु असेच चक्कर येऊन पडत होतास तेव्हा मीच नाही का तुला सावरले आणि वृद्धाश्रमात सोडले. चल आजही सोडतो मी वृद्धाश्रमात. चक्कर येते तर असा एकटा फिरायला येत जाऊ नकोस, वरद म्हणाला. 


वरद, अरे आता मुलाकडे राहतो त्यामुळे चक्कर येणे बंद झाले, अरे आज केळीच्या सालीवरून पाय घसरला. 


वा छान! मुलाला सद्बुध्दी झाली, त्याने बापाला वृद्धाश्रमातून घरी आणले वरद म्हणाला. बरं आता कुठे राहतोस? कुठे सोडू मी तुला? 


घरी पोहोचताच आबांच्या नातीने विचारले, आजोबा हे कोण? रीनु बेटा, हे वरद आजोबा. राज आणि नेहाने वरद अंकलचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. वरदला राज आणि नेहाचा स्वभाव खूप आवडला. रीनु तर काय, खूपच गोड होती.


त्यानंतर आबा आणि वरद यांचे एकमेकांना भेटणे, बागेत फिरणे, गप्पागोष्टी करणे सुरू झाले. 

आबा पुढच्या महिन्यात मी नेपाळला जातोय, येतोस का तू?

वरद अरे मला खर्च झेपणार नाही. 

आबा अरे जेमतेम ४००००/- रुपये लागणार. मी विचारू का राजला?


नको नको, तू राजला विचारू नकोस. राज इतकं करतो माझं, वर एवढा खर्च का करावा त्याने?

आबा, अरे तू त्याच्यासाठी भरपूर खस्ता खाल्ल्या असतील. करू देना त्याला थोडंसं बापासाठी.

वरद, तो माझा मुलगा नाही.

आबा अरे काय म्हणतोस? तो तुझा मुलगा नाही तर काय नाते आहे तुमचे? 


ऐक तर मग, आबा सांगू लागले. 

साधारणतः तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट. मी समोरच्या बागेत फिरायला आलो होतो. एक छोटी मुलगी खेळता खेळता पडली. मी तिला डॉक्टरांकडे नेऊन ड्रेसिंग केले आणि तिला तिच्या घरी पोहोचविले. तिच्या आई-बाबांशी परिचय झाला. पहिल्या भेटीतच मने जोडली गेलीत. त्या छोटीचे नांव रीना आणि तिचे आई-बाबा राज आणि नेहा. रीनाच्या आग्रहास्तव मी शनिवार, रविवारी त्यांच्याकडे जाऊ लागलो. रीनाशी छान गट्टी जमली, मी तिला शिकवू लागलो. 


एका शनिवारी मी रीनाकडे जायला निघालो त्यावेळी वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी मला विचारले, वृद्धाश्रमाच्या फीचे २४०००/- रुपये कधी देणार? त्यांनी मला सुचविले, तुम्ही शिक्षक होता, ट्युशन घ्या म्हणजे फीच्या पैशांची व्यवस्था होईल. मी राज आणि नेहाला रीनाच्या ट्युशन विषयी विचारले, त्यांनी अगदी आनंदाने मान्य केले. ट्युशनची फी महिन्याला ८०००/- रुपये देऊ, त्यांनी सांगितले. मी राजला विनंती केली मला गरज आहे म्हणून प्लीज मला २४०००/- रुपये अॅडव्हान्स द्याल का? आणि दर महिन्याला ४०००/- रुपये तुम्ही कापून घ्या म्हणजे सहा महिन्यांत पैसे फेडले जातील. आबा, तुम्हाला काही अडचण आहे का? कुणाला पैसे द्यायचे आहेत का? राजने विचारले. वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांचे नांव आणि नंबर देऊन मी त्यांना पैसे ट्रान्सफर करायला सांगितले.


राजने दुसऱ्या दिवशी मॅनेजर साहेबांना फोन केला आणि त्याला नको ती माहिती मिळाली. वृद्धाश्रमाची फी दरमहा १००००/- रुपये आहे, माझे पेन्शन केवळ ६०००/- रुपये आहे, माझ्याकडे २४०००/- रुपये बाकी आहेत. मागच्या महिन्यात मला एलआयसी पॉलिसीचे दोन लाख रुपये मिळणार होते. मुलाने माझी सही घेतली, एलआयसीतून पैसे घेतले परंतु मिळालेले पैसे मला न देता स्वतःच्या घरी फर्निचर करण्यासाठी वापरले. 


राजने तात्काळ २४०००/- रूपये मॅनेजर साहेबांना ट्रान्सफर केलेत. रीनुची ट्युशन व्यवस्थित चालू झाली परंतु अचानक एके दिवशी नेहा मला म्हणाली, आम्हाला पुढच्या महिन्यापासून ट्युशन बंद करायची आहे. मी नेहाला विनवणी केली, निदान २४०००/- रुपये फेडेपर्यंत तरी ट्युशन चालू ठेवा. माझ्या शिकविण्यात काही चुकत असेल तर सांगा, मी माझ्या शिकविण्यात सुधारणा करीन. नेहा आणि राज दोघांनीही स्पष्ट नकार दिला. मी हात जोडून विनवणी केली, मला प्लीज थोडा वेळ द्या. मी काहीतरी करून तुमचे पैसे परत करीन पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. तुम्ही पैसे परत केले नाही तरी चालेल, नेहा म्हणाली. खिन्न मनाने मी वृद्धाश्रमात परतलो. 


पुढच्या शनिवारी मला धक्काच बसला. मला वृद्धाश्रमातून काढण्यात आले होते. कुठे जायचे? काय करायचे? काहीच समजत नव्हते. जवळ एक रुपयाही नव्हता. नेहा आणि राजला फोन केला पण त्या दोघांनीही फोन उचलला नाही. समोरच कोणताही मार्ग दिसत नव्हता. परमेश्वराचा धावा सुरू केला.


वरद, परमेश्वर खरोखरच आहे रे. बघ ना, चमत्कार झाला. रीनुचे गोड बोल कानावर पडले "आजोबा चला आपल्या घरी", तो भास नव्हता तर चमत्कार होता. अनपेक्षितपणे राज, नेहा आणि रीना आलेत. आजपासून तुम्ही “आबा नाही”, “आमचे प्रिय बाबा”, राज आणि नेहा एक सुरात म्हणालेत. 


हे गोड कट कारस्थान राज आणि नेहाने मॅनेजर साहेबांशी संगनमत करुन रचले होते. मॅनेजर साहेबांनी आमचा फोटो काढला. मध्यभागी मी, एका बाजूला राज, दुसऱ्या बाजूला नेहा आणि माझ्या पुढे रीना.


वृद्धाश्रमाला राम राम करून मी माझ्या नव्या घरी आलो. काय तो सुखद धक्का! दरवाजावरील नेम प्लेटवर माझेही नांव झळकत होते. राज आणि नेहाने आमचा तो फोटो डीपी वर ठेवला होता.


आबा, थोड्यावेळापूर्वी मी तुझ्या मुलाविषयी ऐकले. 

वरद, ऐक ती कर्म कहाणी.


मी शाळेत शिक्षकाची नोकरी करत होतो. एका लहानशा फ्लॅटमध्ये मी आणि माझा मुलगा आनंदाने राहायचो. मुलाला अमेरिकेत शिकायला जायचे होते म्हणून मी लवकर रिटायरमेंट घेऊन मिळालेले सर्व पैसे मुलाला दिलेत. मुलगा शिक्षण घेऊन परत आल्यावर त्याचे मोठ्या थाटामाटात लग्न करून दिले, होता नव्हता तो सर्व पैसा संपला. 


बाबा एवढ्या लहान फ्लॅटमध्ये राहण्यापेक्षा आपण हा फ्लॅट विकून मोठा फ्लॅट घेऊ मुलाने सुचविले. आम्ही मुलाने घेतलेल्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो.


नवीन फ्लॅट मधील पहिलाच दिवस होता. पांढऱ्याशुभ्र सोफ्यावर मी बसलो होतो. बाबा तुम्ही डोक्याला तेल लावले आहे, त्यामुळे सोफा खराब होईल, तुम्ही सोफ्यावर बसू नका, सुनबाईने सांगितले. मी नॅानव्हेज जेवण बाहेरून मागविले आहे. आज तेच खा. कधी अंडीही न खाणारा मी, म्हणालो अजिबात भूक नाही मला. मुलगा समोरच बसला होता परंतु त्याच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. 


टीव्ही खराब होईल तुम्ही चालू करू नका, फ्रीज हळू उघडा, एसी लावायचा नाही, गिझर जास्त वापरू नका, मोठ्याने बोलू नका. चालताना पायांचा आवाज करू नका असे मला रोज ऐकावे लागे.


परवडत नाही म्हणून झाडूपोसा करणाऱ्या बाईला सुनबाईने कामावरून काढले आणि ते काम माझ्या गळ्यात टाकले. लवकरच मी घरगडी बनलो. सुनबाईला मी घरात नको होतो आणि त्यासाठी तिने माझा अनेक प्रकारे छळ केला. पोटच्या मुलाने कधीही माझी बाजू घेतली नाही. 


पण एक मात्र खरं, माझ्या मुलाने मुलाचं नातं जपलं. त्याने मला वृद्धाश्रमात टाकले नाही. मी स्वेच्छेने वृध्दाश्रमात दाखल झालो, नरक यातना आणि पदोपदी होणारा अपमान टाळण्यासाठी.


माफ कर मित्रा मला यातील काहीच माहित नसल्यामुळे मी तुला नेपाळच्या ट्रीपसाठी आग्रह करत होतो, संकोचून वरद म्हणाला.


गप्पा मारण्यात बराच वेळ गेल्यामुळे आबांना घरी पोहोचायला उशीर झाला. राज वाटच पहात होता. घरात शिरताच राजने आबांना मोठा धक्का दिला. बाबा पुढच्या महिन्यात आपल्याला नेपाळला जायचे आहे असे सांगून. 

राज बेटा, तुम्ही जा, मला नका नेऊ. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत रे. 

बाबा, माझे पैसे हे तुमचे पैसे आणि 

तुमचे सुख ते माझे सुख.


काही वर्षांपूर्वी मुलाला परदेशात शिकायला जाताना आणि नवीन फ्लॅट घेताना आबाही म्हणाले होते. 

बेटा, माझे पैसे हे तुझे पैसे आणि 

तुझे सुख ते माझे सुख.


दोन्हीही वेळी नाते वडील-मुलाचेच होते. फरक एवढाच होता की राज बरोबरचे नाते "रक्ताचे" नव्हते तर "प्रेमाचे" होते. 


दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment

0 Comments