राज हा एक हुशार, तडफदार आणि प्रामाणिक पोलिस इन्स्पेक्टर. नागपूरच्या एका उच्चभ्रु सोसायटीत वास्तव्य. राजची बहिण नागपूरच्या शासकीय शाळेत शिक्षिका तर मेहुणे कारागृहात जेलर.
सहा महिन्यांपूर्वी जेलर साहेबांच्या एका चुकीमुळे गुंड वरद जेलमधून पळण्यात यशस्वी झाला. जेलर साहेबांना तात्पुरते सस्पेंड करण्यात आले. पुढच्या ३० दिवसात वरद सापडला नाही तर कायमचे सस्पेन्शन. वरद पुण्यात असल्याची खात्रीशीर बातमी राजला मिळाली. राज पुण्यात दाखल झाला.
नेहा राजची सौभाग्यवती. नेहाने सांगितलेल्या मठात राज संध्याकाळी आला. अतिशय प्रसन्न आणि भक्तीमय वातावरण.
"बेटी, बाबा महाराजांच्या फोटोला मनापासून नमस्कार करून काय हवे ते माग. महाराज कृपाळु आहेत, नवसाला पावतात". एक सुशिक्षित आणि सुंदर स्त्री तीच्या मुलीला सांगत होती. बाबा महाराजांना सांग, परीक्षेत यश मिळु द्या. एक आई मुलाला सांगत होती.
ताई, कुठे आहे बाबा महाराजांचा फोटो? राजने विचारले. पुढे उजवीकडे वळल्यावर भिंतीवरचा चौथा फोटो. फोटो समोरील भली मोठी रांग महाराजांच्या दिव्य शक्तीची साक्ष देत होती.
राजने मोठ्या भक्तिभावाने फोटो समोर हात जोडले. जाडजूड हारामुळे महाराजांचा चेहरा बराच झाकला गेला होता.
महाराज, मी एका महत्त्वाच्या केसवर काम करतो आहे. काही तरी क्ल्यु मिळवून द्या म्हणत राजने मनापासून प्रार्थना केली आणि काय आश्चर्य! राजला त्याच रात्री खुप उपयुक्त माहिती मिळाली. मोठ्या भक्तिभावाने राज दुसऱ्या दिवशी परत बाबा महाराजांच्या फोटोसमोर हात जोडून ऊभा राहीला आणि पुढच्याच क्षणी, एक महिन्याने मुदत वाढवून मिळाल्याची बातमी जेलर साहेबांनी दिली. राजची महाराजांवरील श्रध्दा वाढली. मठातील चकरा वाढल्या.
पुढच्या आठवड्यात राजला एक अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. खूश होऊन किलोभर पेढे आणि गुलाबाच्या फुलांचा हार घेऊन राज मठात आला, मनसोक्त दर्शन घेता यावे म्हणून ऐन दुपारीच आल्यामुळे मठात फारशी गर्दी नव्हती.
राजने फोटोवरील जुना हार काढला. आज प्रथमच महाराजांचे व्यवस्थित दर्शन झाले. अतिशय प्रसन्न मुद्रा, आडव्या लावलेल्या गंधाने झाकलेले भव्य कपाळ. बराच वेळ दर्शन घेऊनही मन भरत नव्हते. महाराज मला पळालेला कैदी वरद सापडू द्या, माझ्या मेहुण्यांचे सस्पेन्शन कृपा करून टळू द्या. राजने फोटोवर डोकं ठेवून मनापासून प्रार्थना केली. ताज्या गुलाबाच्या फुलांचा भरगच्च हार फोटोला घातला. महाराजांची शक्तीच अलौकिक! अत्यंत महत्वाची माहिती आणि वरदचा लेटेस्ट फोटो राजच्या फोनवर झळकला.
अचानक फुलांचा हार फोटोवरून निसटला. राजला ते खटकले, काही संकेत तर नसेल ना? राजने मोठ्या श्रद्धेने परत नमस्कार केला आणि त्याच क्षणी महाराजांच्या कपाळावरील भरगच्च गंधाखाली लपलेल्या खोलवर जखमेच्या खुणेने राजला स्तंभित केले. महाराज खरोखरच महान होते. मनोभावे फोटोला हार घालून नी पेढ्यांचा नैवेद्य दाखवून राज मुख्य पुजाऱ्याला भेटला आणि बाबा महाराजांना प्रत्यक्ष भेटून ११ लाख रुपयांची देणगी देण्याची ईच्छा त्याने व्यक्त केली. महाराज कोणालाही भेटत नाहीत पण देणगी मोठी आहे, मी विचारून पहातो, पुजारी म्हणालेत.
पुढच्या गुरुवारी दुपारी १२.३० वाजता या, महाराज फक्त २ मिनिटे भेटतील, देणगी रोकड हवी, चेक नको. राजने आनंदाने होकार दिला.
ठरल्यापेक्षा राज थोडासा आधीच आला. पंधरा मिनिटांनी महाराज आलेत. राजने महाराजांचे पाय धुतले. महाराज नको म्हणत असतानाही कपाळावरील गंध, ओल्या कापडाने हळुच पुसला. कपाळावरील जखमेची खुण स्पष्ट दिसत होती. राजने महाराजांचे मनसोक्त दर्शन घेतले.
पैशांची बॅग घेऊन या, फोनवर राजने आदेश दिला.
महाराजांच्या कपाळावर हळुवारपणे गंध लावले, वाकून नमस्कार केला आणि त्याने अत्यंत भक्तीभावाने महाराजांचे पाय धरुन ठेवलेत. वत्सा, तुझे कल्याण होईल आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील, महाराजांनी आशिर्वाद दिला.
तेवढ्यात बॅग घेऊन राजचे दोन मित्र आलेत आणि अनेकांच्या नवसाला पावणारे बाबा महाराज राजच्या भक्तीला पावलेत. राजला गुन्हेगार गवसला आणि महाराज हातोहात गिरफ्तार झालेत. गंधाखाली लपविलेल्या जखमेच्या खुणेने महाराजांच्या छबी मागचा गुंड वरद, हुशार पोलिस इन्स्पेक्टर राजच्या तीक्ष्ण नजरेतून सुटु शकला नव्हता.
राजने नेहाचे मनापासून आभार मानलेत कारण नेहाने सांगितले म्हणूनच राज मठात आला, बाबा महाराजांचा भक्त झाला आणि गुंड वरदला पकडुन मेहुण्यांचे सस्पेन्शन रद्द करू शकला.
-दिलीप कजगांवकर, पुणे
Post a Comment
0 Comments