Type Here to Get Search Results !

लेखक दिलीप कजगांवकर लिखित कथा "पाहुणचार"



अहो, रीना आणि तीचा नवरा आपल्याकडे आठ दिवस राहायला येणार आहे चालेल ना? होम मिनिस्टरने विचारले.


हो म्हणण्या खेरीज काही अॅाप्शन होता का? चालेल की, मी मोठ्या मनाने परवानगी दिली. 


पण ही रीना कोण? मी विचारले. 

अहो, माझ्या भोपाळच्या आत्याची पुतणी.


रीना आणि तिचा नवरा राज आमच्या घरी दाखल झालेत. राजचं ट्रेनिंग होतं त्यामुळे तो दिवसभर बाहेर असायचा. रीना पुण्याला प्रथमच आली असल्याने माझ्या बायकोने तिला पुण्यातील बहुतेक धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळे दाखविलीत. 


वीकेंडला खास टॅक्सी करून आम्ही त्यांना लोणावळा-खंडाळा, पाचगणी-महाबळेश्वर दर्शन घडविले. आमच्याकडील यथेच्छ पाहुणचार आणि मुलगी-जावई पहिल्यांदा आलेत म्हणून अगदी प्रेमाने दिलेले किमती गिफ्ट घेऊन रीना आणि राज परत बेंगलोरला गेलेत. काका बेंगलोरला नक्की या, आणि एक दोन दिवस नाही, चांगले आठ दहा दिवस या. अगदी आग्रहाचे निमंत्रण त्यांनी आम्हा दोघांना दिले.


त्यानंतर पाच सहा महिन्यांनी माझे बेंगलोरला दोन-तीन दिवसांचे काम निघाले. बायकोने रीनाला फोन केला. 

काकू तुमची खुप आठवण येते या ना तुम्ही बेंगलोरला. अगं त्यासाठीच तर फोन केलाय. पुढच्या आठवड्यात आम्हाला बेंगलोरला यायचे आहे. 

क..धी, कि..ती दिवस? विचारताना रीनाचा सुर बदललेला जाणवला. मी राजशी बोलून तुम्हाला उद्याला फोन करते, रीनाने सांगितले. 


तीन-चार दिवस झाले तरीही रीनाचा फोन आला नाही. शेवटी बायकोने रीनाला फोन लावला. काकू मी विसरलेच तुम्हाला फोन करायला. हो, पण तुम्ही आलात तर चालेल. गाडी "कधी येणार, नक्की या वरून" ‘चालेल‘ वर आल्याचे स्पष्टपणे जाणवले.


आम्ही पोहोचलो तेव्हा रीनाच्या टुमदार बंगल्याला भलं मोठं कुलूप होतं. अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. साधारणतः रात्री आठ सव्वा-आठला रीना आणि राज घरी परतले. 


स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता म्हणून मी आणि राज बाहेर जेवायला गेलो होतो, रीनाने सांगितले. 

चहा करू? की पोहे करू? की स्वयंपाक करू? असे प्रश्न विचारत रीनाने फ्रिजमधल्या थंड पाण्याने आमचे पोट शांत केले.


सकाळी उठल्यावर आम्ही आंघोळी आटोपल्या आणि तयार होऊन हॉलमध्ये आलो. रीना आणि राज घरात नव्हते. 

काकू, अहो मॉर्निंग वॉकला गेलो होतो म्हणत रीना आणि राज घरात शिरले. बाहेरून आणलेला चहा रीनाने आम्हा दोघांना दिला.


माझे काम उद्या संपेल, त्यानंतर वीकेंड तुमच्याबरोबर घालवू आणि सोमवारी आम्ही परत जाऊ, माझा प्लॅन मी राजला सांगितला. 


पण या वीकेंडला तर मी आणि रीना ट्रेकिंगला जाणार आहोत, तुम्ही याल का आमच्या बरोबर? माझे उत्तर न ऐकताच राज निघून गेला.


राज आणि रीनाचे वागणे मलाच नाही पण सौ. लाही खटकले. आम्ही ठरविले, झाला तितका पाहुणचार पुरे. शनिवारी परत जायचे.


संध्याकाळी काम संपवून मी राजच्या घरी यायला निघालो. अहो सर, अहो सर, आवाज देत अगदी धावतच संदीपने मला गाठले. संदीप हा माझा विद्यार्थी अगदी हुशार आणि गुणी. 


सर, इंजिनिअर झालो आणि त्यानंतर इथे बेंगलोरला सेटल झालो, संदीपने सांगितले. तुम्ही इथे कधी पर्यंत आहात? संदीपने विचारले. माझे सोमवारचे तिकीट आहे परंतु काही कामामुळे मला शनिवारीच पुण्याला जावे लागणार आहे. 


सर, हा छानच योगायोग. मी ही शनिवारी सकाळीच कारने पुण्याला जाणार आहे , तुम्ही माझ्याबरोबर चला, गप्पागोष्टी करत जाऊया. अरे, पण मी एकटा नाहीये, माझ्याबरोबर तुझ्या बाईही आहेत. सर, मी एकटाच जाणार आहे. तुम्ही दोघं माझ्याबरोबर अगदी आरामात या. मस्त गप्पा मारत जाऊ.


शनिवारी सकाळी संदीप मला घ्यायला आला. रीना अजूनही निद्राधीन, त्यामुळे नो चहा, नो नाश्ता. 


राज, बॅग गाडीत ठेवायला मला जरा मदत करतो का? 

राजने ऐकून न ऐकल्यासारखे केले. संदीप मदतीसाठी धावून आला.


बाय राज, निघतो आम्ही, मी जरा मोठ्यानेच म्हणालो. राज गाडीपाशी आला, रीनाही मागोमाग आली.


परत बेंगलोरला आलात की नक्की या, राज आणि रीनाने आग्रहाचे निमंत्रण दिले. 

४-५ दिवस नाही, चांगले ८ दिवस यायचे. घर तुमचेच आहे, नक्की, नक्की या. आम्ही वाट पहातो.


राज-रीनाला बाय करून आम्ही निघालो. 


सर हे दोघे तुमच्या अगदी जवळच्या नात्यातील वाटतात. केवढी आपुलकी नी माणूसकी.


मी संदीपला राज आणि रीना प्रकरण थोडक्यात सांगितले. 


आणि, अचानक गाडीचा वेग कमी झाला. 


संदीपने गाडी एका छानशा रेस्टॉरंटपाशी थांबविली. आपण चहा-नाश्ता घेऊ आणि नंतर पुढे जाऊ. 


कुठे आठ दिवस माझ्याकडे राहीलेला राज आणि कुठे माझे घरही न पाहीलेला संदीप! 


या, नक्की या, वाट पाहू म्हणत "वाट लावणारे" खुप.


"अतिथी देवो भव" म्हणणारे कमी आणि तसे वागणारे तर खुपच कमी. 


शेवटी काय तर, पाहुणचार जरूर करा, पण ........ परतीची अपेक्षा न करता.


-दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment

0 Comments