एक्सक्युज मी मिस, तुम्ही तुमची पर्स सीटवरून उचलता का प्लीज? राजने बसमध्ये विंडोसीटपाशी बसलेल्या तरुणीला अर्जवाने विचारले. काय हो मिस्टर संपूर्ण बसमध्ये तुम्हाला फक्त ही एकच जागा दिसली का? की सुंदर मुलगी दिसली की तिच्या बाजूची जागा पटकवायची घाणेरडी पुरुषी प्रवृत्ती? नेहाचा राग तीच्या लालबुंद झालेल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
अहो मॅडम का ओरडतात तुम्ही? त्यांनी तिकीट काढलं आहे, पर्स मांडीवर घ्या आणि त्यांना बसू द्या, कंडक्टर साहेब समजावणीच्या सुरात म्हणालेत.
कंडक्टर साहेब, हे घ्या माझ्या पर्सच्या तिकिटाचे पैसे. मी कुणालाही माझ्या बाजूला बसू देणार नाही, निश्चयी सुरात नेहा म्हणाली.
कंडक्टर साहेब असू द्या, असू द्या, मी उभा राहतो समजुतीच्या सुरात राज म्हणाला.
खरंतर राज स्वतःच्या गाडीने ऑफिसला जायचा. परवाच त्याने गाडी रिपेअरींग आणि सर्व्हिसिंग साठी सर्व्हिस सेंटरला दिली. आज सकाळी त्याने सर्विस सेंटरला फोन केला त्यावेळी त्याला समजले की त्याची गाडी तयार आहे म्हणून त्याने त्याच्या मित्राकडून सर्विस सेंटरपर्यंत लिफ्ट घेतली. राजला सोडून मित्र अॅाफिसकडे रवाना झाला.
मी माझी गाडी एम एच १२ पी ५५२० घ्यायला आलोय, राजने रिसेप्शनिसिटला सांगितले.
सर, तुम्ही २ मिनिटे बसा. मी गाडी तयार आहे का ते चेक करते. ५ मिनीटे झाली, रिसेप्शनिसट फोनवर बोलत होती.
विचारले का तुम्ही? राजने अधीरतेने विचारले.
सर, तुमची गाडी अजून तयार नाही. आज संध्याकाळपर्यंत तयार होईल.
अहो, अर्ध्या तासापूर्वी मी फोन करून विचारले आणि तुम्हीच सांगितले ना मला, गाडी तयार आहे आणि म्हणूनच तर मी आलो गाडी घ्यायला.
सर, थोडा गोंधळ झाला, एम एच १२ बी ५५२० तयार आहे. माझी नंबर ऐकण्यात चूक झाली. एक्स्ट्रीमली सॅारी सर म्हणताना ती सुंदर तरुणी जास्तच लाघवी भासत होती. पुढे संभाषण वाढविण्यात अर्थ नव्हता. गाडी तयार झाली की प्लीज फोन करा सांगून राज निघाला. आज सकाळी सकाळीच डोक्याला मनस्ताप झाला.
आज रिक्षा आणि कॅब्जचा संप असल्याने बस हा एकमेव पर्याय होता. नशीब, बसस्टॉप सर्व्हिस सेंटर समोरच होता. मुळातच वैतागलेल्या राजला बससाठी तब्बल वीस मिनिटे थांबावे लागले आणि बसमध्ये चढताच त्या सुंदर तरुणीने अपमान केला. दिवसाची सुरुवात ठीक झाली नव्हती.
एम आय डी सी च्या स्टॉपवर राज बसमधून उतरला, त्याने रस्ता क्रॉस केला, तेवढ्यात मागून मधूर आवाज आला, प्लीज मला हा पत्ता सांगाल का? राजने मागे वळून बघितले. तीच ती सौंदर्यवती होती जिने राजला बसमध्ये तिच्या बाजूला बसू दिले नव्हते.
कोणता पत्ता हवा आहे आपल्याला? राजने शक्य तितक्या आदराने विचारले.
महेश स्टुडिओचा.
तुम्ही सरळ जा, पहिला चौक सोडा, नंतर दुसऱ्या चौकातून उजवीकडे वळा, त्यानंतर पहिल्या चौकातून डावीकडे वळा. प्रथम भाटिया इंटरनॅशनल कंपनी लागेल आणि त्यानंतर लगेचच महेश स्टुडिओ. साधारणत: १०-१२ मिनिटांचे चालत अंतर आहे.
गोरपान वर्ण, मध्यम उंची, सडपातळ बांधा, आकर्षक पंजाबी ड्रेस, लांब मोकळे केस, डोळ्यांवर छानसा गॅागल, हलकासा मेकअप आणि महेश स्टुडिओत जायचं म्हणजे नक्कीच कोणीतरी मॉडेल असणार राजने अंदाज बांधला. शूटिंग असेल, कपडे आणि मेकअप खराब होऊ नये म्हणूनच तिने तिच्या बाजूला कोणालाही बसू दिले नाही, या विचाराने राजचा त्या सौंदर्यवतीवरील राग क्षणात मावळला, तीला ग्रेट डे विश करून तो झपझप पावले टाकत मार्गस्थ झाला.
आज नेहाचा "भाटिया इंटरनॅशनल" या नामांकित कंपनीत प्लॅनिंग ऑफिसर च्या जागेसाठी इंटरव्यू होता. कॅब्जचा बंद असल्यामुळे तिला नाईलाजाने बसने यावे लागले. राजने नेहाला पत्ता इतका व्यवस्थित सांगितला की पुढे कोणालाही न विचारता नेहा भाटिया इंटरनॅशनल कंपनीमध्ये पोहोचली. राजशी जरा जास्तच रागात बोलल्याचा नेहाला मनोमनी पश्चाताप झाला. आपण निदान सॅारी तरी म्हणायला हवे होते, नेहा स्वतःवरच चिडली.
इंटरव्यूला ४ मुलं आणि ४ मुली असे एकूण ८ उमेदवार आले होते. एच आर ऑफिसर वरदने सर्वांचे स्वागत केले आणि कंपनीची थोडक्यात माहिती देवून सर्वांना पहिल्या इंटरव्ह्यू राऊंडसाठी पाठविले.
पहिल्या राऊंडचा निकाल जाहीर करताना वरदने घेतलेल्या पहिल्या चार नांवांत नेहाचे नाव नव्हते. पहिल्याच राऊंडला बाद झाल्याने नेहा नाराज झाली. तेवढ्यात वरदने सांगितले की मी नांवे घेतली ते चार उमेदवार पहिल्या राउंडमध्ये बाद झालेत. म्हणजे नेहाची विकेट शाबूत होती.
दुसऱ्या राऊंड अखेर वरदने घेतलेल्या दोन नावांमध्ये पहिले नांव नेहाचे होते. पर्स उचलून नेहा नाराजीने जायला निघाली. थांबा मॅम, ही दोन नांवे पुढच्या राउंडसाठी सिलेक्ट झालेल्या उमेदवारांची आहेत म्हणत वरदने नेहाला सुखद धक्का दिला.
पुढच्या राऊंड अखेर, नेहा तुम्ही फायनल इंटरव्ह्यूसाठी थांबा, वरदने सांगितले.
आता पर्यंतचा कामाचा अनुभव, सध्याचा पगार, पगाराची अपेक्षा या गोष्टींची वरदने नोंद घेतली आणि नेहाला फायनल इंटरव्यूसाठी जनरल मॅनेजर साहेबांकडे पाठविले. साहेबांच्या सेक्रेटरीने नेहाचे मोठ्या आपुलकीने स्वागत केले.
नेहा, साहेब एका मीटिंगमध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला थोडं थांबावे लागेल सेक्रेटरीने सांगितले. पाण्याचा ग्लास आणि कॅाफीचा मग ऑफिस बॉयने नेहासमोर ठेवला.
नेहाने आई-बाबांना फोन करून सांगितले की थोड्याच वेळात माझा फायनल इंटरव्यू आहे. एकूण ८ उमेदवारांपैकी मी एकटेच फायनल इंटरव्ह्यू पर्यन्त पोहोचले आहे त्यामुळे हा जॉब मला नक्की मिळेल. आई-बाबांनी भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहाला दिल्यात.
नेहा आई-बाबांची एकूलती एक मुलगी. बाबा खाजगी कंपनीतून निवृत्त झालेत. घरची परिस्थिती बेताची होती. कर्ज काढून त्यांनी नेहाच्या शिक्षणाचा खर्च केला. एका नामांकित इंजीनियरिंग कॉलेजमधून ऊत्तम गुण मिळवून नेहा पास झाली. छान नोकरी मिळाली. आता लग्न उरकून टाकू म्हणून आई-बाबांनी स्थळं शोधणं चालू केलं परंतु नेहा इतक्या लवकर लग्न करायला तयार नव्हती, तिला करिअर करायचे होते.
गेल्या सहा महिन्यांपासून नेहाला जॉब नव्हता. नेहाची या आधीची कंपनी एक छोटी कंपनी होती परंतु नेहाचे रिपोर्टिंग डायरेक्ट सीईओंना होते त्यामुळे नेहाच्या हुशारीला भरपूर वाव मिळाला आणि नेहानेही त्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. स्टार ऑफ द मंथ, एम्प्लॉयी ऑफ द इयर अशी अनेक बक्षिसे पटकावित आणि चोख काम करून सर्वांकडून प्रशंसा मिळवत कंपनीत भक्कम स्थान निर्माण केले.
नेहाचे प्रमोशन झाले, पगार वाढला, केबिन मिळाली, गाडी मिळाली, सवलती वाढल्या, काम वाढले, कामाचा ताण वाढला, कामाच्या वेळा वाढल्या आणि त्याचबरोबर सीइओंकडून अपेक्षितपणे नको ती मागणी आली. नेहा कॉम्प्रमाईज करायला तयार नव्हती, तीने तडका फडकी नोकरी सोडली, हातात दुसरी कोणतीही नोकरी नसताना.
गेल्या सहा महिन्यांत नेहाने अनेक इंटरव्ह्यू दिलेत, बऱ्याच ठिकाणी ती फायनल राऊंडला देखील सिलेक्ट झाली परंतु प्रत्येक वेळी तिला नोकरी नसल्याचा गैरफायदा घेण्यात येऊन कमी पगार किंवा खालची पोस्ट ऑफर करण्यात आली. नेहाने तशी कोणतीही ऑफर स्वीकारली नाही.
मागच्या आठवड्यात तर एका जॉब कन्सल्टंटने नेहाला सांगितले, तुम्ही एक लाख रुपये द्या मी तुम्हाला लगेच नोकरी मिळवून देतो. नेहाचा आत्मविश्वास डळमळीत झाला आणि त्यामुळेच तीला आता नोकरीची अत्यंत आवश्यकता होती.
नेहाची कॉफी पिऊन झाली आणि तिने समोर बघितले तर काय आश्चर्य! निळा कोट आणि हातात पिवळे हेल्मेट घेऊन साहेबांच्या केबिनकडे जाणारा तो तरुण तोच होता ज्याचा नेहाने बसमध्ये बसायला जागा न देऊन अपमान केला होता आणि तरीही ज्याने नेहाला महेश स्टुडिओचा पत्ता अगदी व्यवस्थित सांगितला होता. त्याने जर मला इथे बघितले आणि माझ्या रागीट पणाबद्दल साहेबांना सांगितले तर हाता-तोंडाशी आलेली नोकरी जाईल, नेहा घाबरली. तो तरुण त्याच्याच तंद्रीत असल्याने त्याची नजर चुकविण्यात नेहाला यश मिळाले होते. नीळा कोट आणि हेल्मेट बघितल्यावर नेहाला वाटले तो तरुण नक्कीच सुपरवायझर असावा आणि मी जर ऑफिसर म्हणून या कंपनीत रुजू झाले तर कदाचित तो माझ्या हाताखाली असेल. मी खुर्चीवर बसेल आणि तो आज सारखा कायम उभा राहील, न रागावता मॅम, मॅम करेल. नेहा दिवा स्वप्नात रमली असतानाच साहेबांच्या सेक्रेटरीने नेहाला सांगितले, तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे.
केबिनचा दरवाजा हळुवारपणे वाजवून नेहाने विचारले, सर मी आत येऊ का?
साहेबांचा होकार मिळाल्यावर नेहा केबिनमध्ये शिरली आणि बघते तर काय! बसमधील तो तरुणच केबिनमध्ये साहेबांच्या चेअरवर बसला होता.
ज्याला तीने अतिशय तुच्छ लेखले होते, ज्याचा सर्वांसमोर अपमान केला होता तो तरुणच भाटिया इंटरनॅशनल या कंपनीचा जनरल मॅनेजर होता.
भीतीने थरथरत नेहा म्हणाली, सॉरी सर, मला माफ करा. मी चुकले. मला माहित नव्हतं तुम्ही कोण आहात ते.
ठीक आहे नेहा. तुम्ही बसा. हे पाणी घ्या आणि बी कम्फर्टेबल. अहो मला तरी कुठे माहीत होतं तुम्ही आमच्या कंपनीतच येणार आहात. मी मानलं तुम्हाला, अगदी पत्ता विचारताना देखील भाटिया इंटरनॅशनल मध्ये तुम्हाला जायचे हे समजू दिलं नाही. घाबरलेल्या नेहाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य निर्माण करण्यात राजला यश मिळाले होते. नेहा क्षणात तणावमुक्त झाली.
नेहाने प्रथमच राजकडे निरखून पाहिले. अगदी तरूण, रूबाबदार, प्रसन्न मुद्रा, हसरा चेहरा, कुणावरही छाप पडेल असे व्यक्तिमत्व. मी सकाळी राजकडे नीट बघितले असते तर कदाचित .... नेहा मनातल्या मनात लाजली.
आलीशान वातानुकूलित केबीन, गोल फिरणारी खुर्ची आणि आधुनिक सेक्रेटरी, छान रूबाब होता राजचा पण तरीही अगदी ग्राउंड टु अर्थ! अगदी कमी वयात प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर राज जनरल मॅनेजर झाला होता. सगळ्यांशी अतिशय प्रेमाने, आदराने आणि मिळून मिसळून वागत राजने कंपनीत एक आदराचे स्थान निर्माण केले होते.
राजने नेहाला प्रथम काही टेक्निकल प्रश्न विचारलेत. सर्व प्रश्नांना नेहाने आत्मविश्वासाने अगदी अचूक ऊत्तरे दिलीत. त्यानंतर राजने विचारलेल्या करिअर आणि गोल ओरिएंटेड प्रश्नांच्या ऊत्तरांतून नेहाची परिपक्वता जाणवत होती. शेवटचा आणि निर्वाणीचा प्रश्न तोच तो, जो अनेकांनी विचारला होता. तुमच्या हातात दुसरी नोकरी नसताना तुम्ही असलेली नोकरी का सोडली? की तुम्हाला नोकरीवरून काढण्यात आलं?
सांगावं की न सांगावं? नेहाच्या मनात द्वंद्व सुरू झालं. आजपावेतो नेहाने सत्य कुणालाही सांगितले नव्हते. नेहाच्या मनोदेवतेने नेहाला सांगितलं, पोरी सत्य काय ते सांगून टाक, कुठलाही आड पडदा न ठेवता.
पुढील पाच मिनिटे नेहा बोलत होती, राज शांतपणे ऐकत होता.
तुमच्या त्या कंपनीतील सीईओंचे नाव काय होते? राजने विचारले. नेहाचे उत्तर ऐकून राज म्हणाला, अरे मी तर याला ओळखतो. आय आय टी त, बी टेक आणि एम टेक ला आम्ही बरोबर होतो.
नेहाला मनोमनी प्रकर्षाने जाणवले की तिने सत्य सांगून खूप मोठी चूक केली होती. स्वतःच्याच हाताने तिने तिच्या पायावर दगड मारुन घेतला होता. जवळपास निश्चित झालेली नोकरी नेहा घालवणार होती. नेहाला मनोमनी पश्चाताप झाला. इंटरव्ह्यूला आल्याबद्दल नेहाला थँक्स म्हणून, तुम्ही आता एच आर ऑफिसर वरदला भेटा, राजने सांगितले.
नेहाची नष्ट झालेली आशा पुन्हा पल्लवीत होऊन नेहा वरदच्या केबिनमध्ये दाखल झाली. थॅंक्स, राजने झालेल्या अपमानाचा राग धरला नाही, असे मनातल्या मनात म्हणताना नेहा शरमली. वरद सर, राज सरांनी मला तुम्हाला भेटायला सांगितले. नेहा, तुम्ही बसा, मी विचारतो म्हणत वरदने राज सरांना फोन लावला. फोन बराच वेळ चालू होता. नेहा मोठ्या अपेक्षेने वरदकडे पाहत होती. सरांशी बोलून वरदने फोन ठेवला नी नेहाला सांगितले, तुम्ही आता जाऊ शकता. आम्ही तुम्हाला नंतर कळवू. त्या "नंतर कळवू" चा अर्थ नेहाला माहीत होता. खिन्न मनाने नेहा घरी परतली.
आजच्या दिवसाची सुरुवातच वाईट झाली. तरीही योग्य अनुभव आणि हुशारीमुळे पारडे तिच्या बाजूने झुकले असताना तिने एक अक्षम्य चूक करून स्वतःचे नुकसान करून घेतले होते.
घरात शिरताच आईने विचारले, नेहा मिळाली ना अॅाफर?
नाही आई, नाही मिळाली ऑफर, म्हणताना नेहाचा आवाज रडवेला झाला होता.
नेहा, अगं तूच तर सांगितलंस ना की फायनल इंटरव्यूला फक्त तू एकटीच होतीस म्हणून.
आई सकाळी इंटरव्ह्यूला जाताना बसमध्ये मी ज्यांचा अपमान केला त्यांनीच माझा फायनल इंटरव्यू घेतला आणि इंटरव्यूमध्ये मी त्यांना माझ्या पूर्वीच्या सीईओं बद्दल सर्व काही सांगितले ते सीईओ त्यांचे वर्गमित्र निघालेत. कशी मिळणार ऑफर मला?
नेहा, मी तुला नेहेमी सांगते की इतका राग आणि पटकन चिडणे मुलीच्या जातीला योग्य नाही. आई, पुरे कर तुझे लेक्चर, नेहा वैतागुन म्हणाली.
नेहाने सांगितलेले ऐकून आई-बाबा देखील उदास झालेत परंतु त्यांनी नेहाला कसा बसा धीर दिला. आई-बाबांची नजर चुकविण्याची युक्ती नेहाला सापडली. मी आपल्यासाठी चहा करून आणते म्हणत नेहा किचन मध्ये गेली. नेहा ने तीन कप चहा केला आणि चहा कपात ओतणार तोच नेहाला दार वाजल्याचे जाणवले. नेहाने दरवाजा उघडला. बाहेर एक तेजस्वी साधू महाराज उभे होते. नेहा पटकन घरात आली, पर्समधून दहा रुपये काढून तीने साधू महाराजांना दिले. बेटी मला पैसे नकोत, मला चहा दे, साधू महाराजांनी सांगितले. पांढऱ्या शुभ्र थर्माकोलच्या कपात नेहाने साधू महाराजांना चहा दिला. नेहाच्या डोक्यावर हात ठेवत महाराज म्हणालेत, देव तुझे भले करेल.
नेहा आश्चर्यचकित झाली, आई बाबांचे कप भरल्यानंतरही भांड्यात चहा शिल्लक होता आणि नेहाचा कप देखील पूर्णपणे भरला. चहा पिताना कोणीही काहीही बोलले नाही. नेहाने चहाचे रिकामे कप किचनमध्ये नेले, तेवढ्यात नेहाचा फोन वाजला.
फोन एच आर ऑफिसर वरदचा होता. सॉरी नेहा तुमचे प्लॅनिंग ऑफिसरच्या जागेसाठी सिलेक्शन झाले नाही.
सर, पण माझा इंटरव्यू तर खूप चांगला झाला होता, काहीतरी बोलायचे म्हणून नेहा म्हणाली.
अगदी खरं परंतु प्लॅनिंग ऑफिसरच्या जागेसाठी असलेल्या आमच्या पगाराच्या बजेट पेक्षा तुमची पगाराची अपेक्षा जास्त आहे त्यामुळे राज सर म्हणालेत की तुम्हाला या जागेसाठी घेता येणार नाही. वरद सर, तुम्ही राज सरांशी बोलून बघाल का प्लीज? मला नोकरीची खूप गरज आहे आणि तुम्ही जो पगार द्याल तो घ्यायला मी आनंदाने तयार आहे, नेहा म्हणाली.
नेहा मी त्यांच्याशी बोललो परंतु तसे करायला त्यांनी स्पष्ट नकार दिला.
आज जे काही झाले त्याला पूर्णपणे मीच जबाबदार आहे, मी एक नाही तर अनेक चुका केल्यात नेहा मनातल्या मनात म्हणाली.
नेहा तुम्हाला एक गोष्ट चालणार असेल तर ..... बोला सर, बोला, मला काय कॉम्प्रमाईज करायला लागेल? तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे परंतु मला कृपा करून ही नोकरी द्या, नेहा कळवळून म्हणाली.
नेहा कॉम्प्रमाईज तुम्हाला नाही तर आम्हाला करावे लागेल, वरद म्हणाला. तुमची पगाराची अपेक्षा मॅच करण्यासाठी आम्ही तुम्हाला "प्लॅनिंग ऑफिसर" म्हणून घेत नाही तर "प्लॅनिंग मॅनेजर" म्हणून घेत आहोत, वरदने गौप्यस्फोट केला.
नेहा पण एक गोष्ट मात्र तुम्हाला करावीच लागेल. साहेब प्लीज संकोच करू नका, काय हवे ते स्पष्टपणे सांगा. मला तुमच्या घराचे लोकेशन पाठवा वरद म्हणाला. वरद सर, मी आई-बाबांबरोबर राहते, तुम्ही घरी येण्यापेक्षा मलाच सांगा मी कुठे यायचे ते.
नेहा तुम्हाला उद्यापासूनच ऑफिस जॉईन करावे लागेल. उद्या सकाळी बरोबर आठ वाजता कंपनीची गाडी तुम्हाला घ्यायला येईल, ड्रायव्हरला देण्यासाठी मला लोकेशन हवे आहे. देणार ना?
का नाही देणार? लगेच पाठविते सर, नेहा आनंदाने म्हणाली.
वरदकडून जे ऐकलं त्यावर नेहाचा विश्वास बसत नव्हता. जे होत होतं ते स्वप्नवत होतं. वरद आणि राज सरांचे मनापासून आभार मानत नेहाने फोन ठेवला आणि ही आनंदाची बातमी आई-बाबांना सांगायला ती आत जाणार तोच दरवाजा वाजला. नेहाने दरवाजा उघडला. बाहेर कोणीही नव्हते परंतु तिला स्पष्ट ऐकू आले, "बेटी, देव तुझे भले करेल".
नेहाने त्या अदृश्य शक्तीला मनापासून नमस्कार केला आणि ही अनपेक्षित गोड बातमी आई-बाबांना सांगण्यासाठी नेहा घरात पळाली.
-दिलीप कजगांवकर, पुणे
Post a Comment
0 Comments