बस स्टॉपवर दोन तरुणी उभ्या होत्या.
एकीची घट्ट लांब वेणी तर दुसरीचे वाऱ्याची दिशा दर्शविणारे आखुड मोकळे केस.
एकीची पारंपरिक साडी तर दुसरीची जागोजागी फाटलेली जीन्स आणि जेमतेम वीतभर लांबीचा स्लीवलेस टॉप.
एकीचे घसघशीत लाल कुंकू, लांब मंगळसूत्र तर दुसरीचे रीते कपाळ आणि मोकळा गळा.
एकीचा दृष्टी सुधारण्यासाठी डोळ्यांवर चष्मा तर दुसरीचा केसांना सावरण्यासाठी कपाळावर ठेवलेला आकर्षक गॉगल.
एकीच्या साध्या सपाट चपला तर दुसरीचे फॅशनेबल हाय हिल्स.
थोडक्यात एक काकूबाई तर दुसरी आधुनिक.
बसस्टॉप वरील दोन तरूणी बघून म्हणा किंवा आधुनिक तरूणीने हात दिला म्हणून म्हणा, बस स्टॉपकडे येणाऱ्या स्कूटरचा वेग कमी झाला आणि स्कूटर दोन्ही तरूणींच्या मधोमध थांबली. केस नीट करत, गॅागल डोळ्यांवर सरकवत आणि हाय हिल्स सावरत आधुनिक तरूणी हळूच स्कूटरकडे सरकली, नी काय आश्चर्य! काकूबाईंना घेऊन जायला स्कूटरस्वार सज्ज!
नॅाट फेयर, मी लिफ्ट मागितली, आधुनिक तरूणी ओरडली. माय हसबंड, म्हणत काकूबाई हसल्या.
सॅारी, नाईलाज माझा, मिस यू मिस, मे बी नेक्स्ट टाईम, स्कूटरस्वार पुटपुटला, मनातल्या मनात.
-दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment
0 Comments