राज मला बरं वाटत नाहीये, एक काम करशील का? नेहाने विचारले. आता नाही म्हणून चालणार का होते?
नम्रतेचा आव आणत राज म्हणाला, हो चालेल राणी साहेब, काय आज्ञा?
चौकातल्या महादेवाच्या मंदिरात जा, दर्शन घेऊन पाच प्रदक्षिणा घाल. महादेवाला पुर्ण प्रदक्षिणा घालायची नसते, माहीत आहे ना?
राज मंदिरात आला. मंदिरात फारशी गर्दी नव्हती आणि वातावरण खुप प्रसन्न होते. मनसोक्त दर्शन घेऊन राजने प्रदक्षिणा घालणे सुरु केले. प्रदक्षिणेचा मार्ग जमिनीपासून साधारणतः एक फुट ऊंच आणि जरा अरूंदच होता.
१ ली प्रदक्षिणा - राजने शांतपणे प्रदक्षिणा घालणे सुरु केले आणि तेवढ्यात समोरून एक सुंदर तरुणी घाईघाईत आली. राजने अंग चोरण्याचा खुप प्रयत्न केला पण तरीही हलकासा धक्का त्या तरूणाीला लागलाच. काय रे, काही वाटते का? निदान मंदिरात तरी सभ्यतेने वाग. काहीच चूक नसताना राज २-३ वेळा सॅारी म्हणाला, म्हणून सुटला.
बिच्चारा राज!
२ री प्रदक्षिणा - समोरून एक तिशीतील, तरीही खुप आकर्षक पण जाडजूड तरूणी डोलत डोलत येत होती. तीला चुकुनही धक्का लागू नये म्हणून राज प्रदक्षिणेच्या मार्गावरून खाली उतरला त्यामुळेच तीला धक्का लागला नाही. काय हो काका, इतकी का मी जाड आहे, अगदी खाली उतरलात? तिच्यापेक्षा लहान असलेल्या राजचा तीने चक्क "काका" केला होता. बिच्चारा राज!
३ री प्रदक्षिणा - आज नेहेमीप्रमाणे, मंदिरात पुरूषांपेक्षा महिला भक्तांची संख्या जास्त होती. समोरून एक सुंदर कॅालेजकन्या तीच्याच तोऱ्यात आली, तेही प्रदक्षिणेच्या मार्गाच्या कडेने आणि अचानक ती तोल जाऊन पडत असताना राजने देवासारखा तीला मदतीचा हात दिला, पण काय ते राजचे दुर्दैव! ती ओरडली, काय रे, तरण्या ताठ्या मुलीच्या अंगाला हात लावतोस? लाज नाही वाटत?
देवाच्या दर्शनाचे फक्त नाव पण दुसरेच दर्शन घेण्यासाठी आलेले २-३ दणगट भाविक पुढे सरसावले, राजवर हात मोकळे करून कॅालेज कन्येची सहानुभूती मिळविण्याच्या उद्देशाने. तेवढ्यात एका आजीबाईंनी राजची बाजु घेत, कॅालेज कन्येला समजावले. त्याने हात दिला नसता तर पायाला दुखापत झाली असती, आभार मान त्याचे. राज वाचला, पुढे सरसावलेले भाविक मात्र हात मोकळे करायला न मिळाल्याने हिरमुसलेत.
बिच्चारा राज!
४ थी प्रदक्षिणा - आता समोरून एक गोड शाळकरी मुलगी पळत पळत आली आणि पाय घसरून पडली, राज तीला पकडु शकला असता पण त्याने बघ्याची भूमिका घेतली. काय रे, माणुसकीचा थोडा तरी अंश आहे का तुझ्यात? माझ्या चिमुकलीला धरले असते तर काय नरकात गेला असतास काय रे मेल्या? मागून आलेल्या तीच्या आईने आग ओकली.
बिच्चारा राज!
५ वी प्रदक्षिणा - समोरून एक तरुण आणि तरुणी येत होते. राज थांबला आणि त्याने त्यांना जायला जागा करून दिली. दादा काय हे? अरे, रस्ता आडविला असतास तर माझ्या मित्राच्या जरा जवळ आले असते ना मी! चांगली आलेली संधी तु हिरावून घेतलीस. किती रे दुष्ट तु?
बिच्चारा राज!
महिला वर्गाची बोचक बोलणी खाऊन घायाळ झालेला राज घरी परतला.
केवढा वेळ लागला राज! देवाचे दर्शन की अजून काही? कुणी देवी तर भेटली नव्हती ना? नेहाच्या प्रश्नांवर गप्प राहणेच पसंत केले राजने. घरीही बोचक बोलणे ऐकावे लागले.
बिच्चारा राज!
हे मात्र खरे, "बाई जात भारी देवा", कळायला "अवघड" आणि पेलायला "अवजड".
(संपूर्णतः काल्पनिक)
⁃ दिलीप कजगांवकर, पुणे
Post a Comment
0 Comments