Type Here to Get Search Results !

लेखक दिलीप कजगांवकर लिखित कथा फिरकी



सुटीचा दिवस असल्यामुळे राज अगदी आरामात गरमागरम चहा बरोबर बिस्किटांचा आस्वाद घेत पेपर वाचत बसला होता. "एक दिवसाचा कार्यक्रम, खास पुणेकरांसाठी" या जाहिरातीने राजचे लक्ष वेधून घेतले. वातानुकूलित सभागृह, प्रख्यात प्रशिक्षक, चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, दुपारचा चहा. कार्यक्रमाचे हजेरी बक्षिस ११००/- रूपये.


राजने जाहिरातीत दिलेल्या नंबरवर संपर्क साधला आणि त्यांना सांगितले, तुमच्याकडून जाहिरात देताना मोठी चूक झाली आहे. कार्यक्रमाची हजेरी "फी" लिहिण्याऐवजी तुम्ही हजेरी "बक्षीस" लिहिले आहे. 


नाही सर ते बरोबर आहे, कार्यक्रम अटेंड करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही ११००/- रुपये बक्षीस देणार आहोत, पलीकडून अती मधुर आवाजात राजला सांगण्यात आले. ही फिरकी तर नाही ना? राजने मनातली शंका बोलून दाखविली. नाही हो सर, अजिबात फिरकी नाही आणि मी गिरकी, हवं तर माझं नांव आणि नंबर लिहून घ्या. 

ही तर सुवर्ण संधी आहे! आणि ती दवडता कामा नये, सुशिक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबातील राजने ठरविले.


नेहाला जाहिरात दाखवत राज म्हणाला, आपण हा कार्यक्रम अटेंड करूया. आपल्याला प्रत्येकी ११००/- म्हणजे एकूण २२००/- रूपयांची कमाई, त्या बरोबर तुला दिवसभर आराम आणि वातानुकूलित सभागृहात मनसोक्त खाणे पिणे, अगदी फुकटात, राजने सांगितले. कशी वाटली आयडिया?


राज, आयडिया छान आहे पण मला कसे येता येईल? अरे त्या दिवशी माझ्या दादाचा सत्कार होणार आहे ना, विसरलास वाटतं? मी त्यासाठी नाशिकला जाणार आहे, काल आपण शर्ट आणला ना त्याच्यासाठी. खरंच की, चांगला ३०००/- रुपयांचा शर्ट आणलाय, राज म्हणाला. नेहा, पाच हजार मीटरच्या शर्यतीत जेमतेम पन्नास मीटर धावला तुझा दादा. त्याला काही बक्षीस मिळालेले नाही, भाग घेतलेल्या प्रत्येकाचा गुलाबाचं फुल देऊन सत्कार होणार आहे, त्यात विशेष ते काय? 


राज तुला माझ्या दादाचे अजिबात कौतुक नाही, तू त्याच्या बाबतीत नेहेमीच तीरसटा सारखा वागतोस. दादा मुळेच तर आपलं लग्न झालं आठवतं ना? त्यादिवशी दादाने तुझ्या गाडीचा आरसा फोडला आणि त्यामुळेच आपली ओळख झाली. हो आठवतं ना, चांगला ५०००/- रुपयांचा भुर्दंड पडला मला तुझ्या दादामुळे.


राज पुढे मनातल्या मनात म्हणाला, दादाची कृपा, त्याच्यामुळेच स्वतःसाठी आणि माहेरच्या मंडळींसाठी भरमसाठ खर्च करणारी बायको मला मिळाली, पण हेही खरं, नेहा तू खूप सुंदर आहेस, आवडतेस मला.


कुठे हरवलास? राजला हलवून भानावर आणत नेहा म्हणाली. अरे, सत्कार खुद्द नगरसेवक साहेब करणार आहेत, त्याला महत्त्व आहे. नेहा, अगं तो नगरसेवक वरद माझ्या क्लासमध्ये होता, नेहेमी शेवटचा नंबर यायचा त्याचा. अगदी उनाड आणि गुंड प्रवृत्तीचा. तु त्याला साहेब म्हणतेस?


बरं तू जा नाशिकला, तुझ्या दादाच्या सत्काराला. मी आपल्याकडे काम करणाऱ्या तिन्ही बायकांना घेऊन जाईन कार्यक्रमाला.

राज ही हिम्मत! अरे सभ्य म्हणवतोस ना स्वतःला? 

नेहा, पुढच्या महिन्यात दिवाळी आहे आणि आपण या बायकांना १०००/- रूपये दिवाळी बोनस देतो ना, यावर्षी या कार्यक्रमाचे ११००/- रुपये त्यांना देवू, त्याही खुश होतील. 

राज तू खरंच हुशार आहेस! पैसे वाचवण्याची एकही संधी सोडत नाहीस. अगदी काल पण नाही का, ४०००/- रुपयांचा शर्ट मला पसंत पडला होता परंतु तु ३०००/- रुपयांचा शर्ट घ्यायला लावलास. 

ठीक आहे मी तिघींना सांगते कार्यक्रमाबद्दल आणि छान नटून थटून, परफ्यूम मारून यायला सांगते, राज साहेबांबरोबर जायचं आहे ना त्यांना आणि तेही मी बरोबर नसताना. साध्या भोळ्या राजची फिरकी घेण्याची एकही संधी नेहा दवडत नव्हती. 


कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी राजने फोन करून विचारले, कार्यक्रम आहे ना? आणि ११००/-रुपये नक्की मिळणार ना? सर कार्यक्रम आहे आणि तुमचे नांव अगदी पहिल्या नंबरवर आहे, मधुर आवाजाने कनफर्म केले.


राज कार्यक्रमाच्या ठिकाणी तिघी ताईंसह थोडा आधीच पोहोचला. गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. राज आणि त्या तिघींचा एकत्र फोटो घेऊन फोटोग्राफर म्हणाला, सर, तुमचा तीन बायकांबरोबरचा फोटो मस्त आला, तुम्हाला चार कॉपीज देतो. राजचा खिसा ४००/- रुपयांनी हलका झाला आणि दोघा-तिघांनी राजकडे कुतूहलाने पाहत म्हटले, तीन बायका! कमाल आहे बुवा, एकीला पेलता पेलता आमची तारांबळ उडते.


जोरदार स्वागता बरोबर गरम मसालेदार चहाचा सर्वांनी आस्वाद घेतला. कार्यक्रमाला अकराशे लोकांनी हजेरी लावली होती. बऱ्याचशा तरुण मंडळींनी लॅपटॉप देखील आणले होते कदाचित काम करता करता हा कार्यक्रम अटेंड करायचा असा त्यांचा प्लॅन असावा, म्हणजे "वर्क फ्रॉम कार्यक्रम" आणि वरून ११००/- रूपयांची कमाई शिवाय फुकटात चहा, नाश्ता नी जेवण. 


राजने दोन्ही बाजूला बघितले. ताई मंडळी कुठेतरी हरवली होती पण सुखद गोष्ट म्हणजे, राजच्या दोन्ही बाजूला आधुनिक, सुंदर तरुणी बसल्या होत्या, वाढत्या महागाईमुळे कमीत कमी कापडात शीवलेले फॅशनेबल तोकडे कपडे घालून. 


पुढच्या रांगेतील आयोजकांपैकी एक त्यांच्या कार्यकर्त्याला सांगत होते, ११०० लोक उपस्थित आहेत. फक्त ८०० लोकांचा नाश्ता, ५०० लोकांचे जेवण आणि २०० लोकांच्या दुपारच्या चहाची व्यवस्था करा. 

खर्चात कपात करण्यासाठी जेवण लिमिटेड देणार, राजने अंदाज बांधला. नाश्ता जरा जास्तच करून घ्या, राजने तिन्ही ताईंना मेसेज केला.


आयोजकांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

१ ले सेशन - जीवनातील विविध समस्या आणि कारणे

त्यानंतर चहा, नाश्ता

२ रे सेशन - मन करा रे प्रसन्न, आनंदी कसे रहावे?

त्यानंतर जेवण

३ रे सेशन - विविध व्यसने आणि त्यावरील उपाय

त्यानंतर दुपारचा चहा

४ थे सेशन - मेडीटेशन आणि समारोप

पहिल्या ३ सेशन्स मध्ये तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट द्यायचाी आहे, प्रत्येक सेशन तुम्ही व्यवस्थित अटेंड करा म्हणजे टेस्ट देणे सोपे जाईल.


टेस्ट आहे म्हणजे आपल्याला या सुंदरींची कंपनी सोडून ताई मंडळीला जवळ करावे लागेल, त्यांना मदत करायला, या विचाराने राज नाराज झाला.


सर एक शंका आहे, राज उठून उभा राहिला. टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळाले तरी नाश्ता आणि जेवण मिळेल ना? सर्वत्र हशा पसरला. 

टेस्टच्या मार्क्सचा नाश्ता आणि जेवणावर काहीही परिणाम होणार नाही तुम्ही निश्चिंत रहा आणि यथेच्छ "जेवा", खरंतर त्यांना "हाणा" म्हणायचे होते परंतु त्यांनी जीभ सावरली.


बोलता बोलता आयोजकांनी एक धक्का दिला. कार्यक्रम संपल्यावर प्रत्येकाला एक पुस्तक दिले जाईल आणि त्या पुस्तकावर आधारित २५ ओळींचा निबंध तुम्हाला लिहायचा आहे. पुण्यातील महागड्या कारच्या अपघात प्रकरणाने, निबंध लेखनाला भलतेच महत्त्व प्राप्त करून दिले. 


राजने पटकन उठून विचारले, या पुस्तकासाठी आम्हाला किती पैसे मोजावे लागतील? चार लोकांनी मिळून एक पुस्तक घेतले तर चालेल का? निबंध इथेच लिहायचा का? 


पुस्तक मोफत आहे आणि हस्तलिखित निबंध तुम्ही उद्या सकाळी ११ वाजेच्या आत ऑफिसमध्ये आणून द्या किंवा त्याचा फोटो ई-मेल करा. ११ वाजेपर्यंत निबंध पाठविणाऱ्या सर्वांना दुपारी ४ वाजेपर्यंत ११००/- रुपये "गुगल पे" करण्यात येतील. 

तिन्ही ताईंची आठवण होऊन राजने विचारले एकाच ई-मेल अॅड्रेसवरून एकापेक्षा जास्त निबंध पाठविले आणि तीन-चार लोकांचा गुगल पे नंबर एकच असला तर चालेल का? 


हो चालेल, हे उत्तर ऐकून राजचे समाधान झाले, त्याचबरोबर त्याच्या वाढलेल्या जबाबदारीची देखील त्याला जाणीव झाली, सर्वांचे निबंध त्यालाच लिहायचे होते. या आधुनिक युगात हाताने लिहायचे? पण नाईलाज होता, प्रश्न ११००/- रूपयांचा होता.


एक महत्त्वाची सूचना, सर्वांना मोबाईल आणि लॅपटॉप लॉकरमध्ये जमा करावे लागतील. मोबाईलच्या एका लॅाकरमध्ये ४ मोबाईल ठेवता येतील, लॅपटॉपच्या लॅाकरमध्ये मात्र एकच लॅपटॉप ठेवता येईल. कोणी प्रश्न विचारण्या आधीच मी सांगतो की लॉकर सुविधा मोफत आहे. सर्वत्र एकच हशा पसरला.


एक महत्त्वाची अट म्हणजे हा कार्यक्रम मध्येच सोडून जायचे असेल तर तुम्हाला पेनल्टी द्यावी लागेल. उपस्थित मंडळी एकदम सिरीयस झाली. आपापसात कुजबुज सुरू झाली.


सर पेनल्टी किती द्यावी लागेल? सर्वांच्या मनातला प्रश्न राजने विचारला.


जर तुम्ही नाश्त्याच्या आधी कार्यक्रम सोडला तर २००/- रुपये

जेवणाआधी सोडला तर ५००/- रुपये

दुपारच्या चहाच्या आधी सोडला तर ७००/- रुपये आणि कार्यक्रम संपण्याच्या आधी सोडला तर ९००/- रुपये पेनल्टी द्यावी लागेल. 

आता थोड्याच वेळात तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांक मिळेल आणि तो मिळण्याच्या आधी जर तुम्ही कार्यक्रम सोडला तर तुम्हाला कोणतीही पेनल्टी द्यावी लागणार नाही. 


ऑफिसचे काम करता करता कार्यक्रम अटेंड करण्याच्या विचाराने लॅपटॉप घेऊन आलेल्या बहुतांश तरुण मंडळीने आणि इतका वेळ कसे बसणार, तेही मोबाईल शिवाय असा विचार करणाऱ्या सूज्ञ उपस्थितांनी कार्यक्रम सोडला. आज भारत-पाक क्रिकेटचा अंतिम सामना असल्याने काही देश प्रेमींनी देखील कार्यक्रम सोडला. 


नाश्ता, जेवण आणि दुपारच्या चहाच्या संख्येचा ढोबळ अंदाज आधीच लावणाऱ्या आयोजकांचे राजला मनापासून कौतुक वाटले. 


रजिस्ट्रेशन करताना ताई मंडळींनी राजकडे प्रत्येकी ७००/- रुपये मागितले. दुपारचे जेवण झाल्यानंतर निघून जाण्याचा त्यांचा बेत होता. राजने त्यांना कसेबसे समजावले आणि त्यांचे मोबाईल त्याच्याच लॉकरमध्ये ठेवले. तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही खुशाल झोपा. शेवटी तुमचा निबंध मीच लिहिणार आहे म्हणत राजने त्यांना धीर दिल्याने ताई मंडळी तणाव मुक्त झाली.


मोबाईल फोन "बंदी" आयोजकांना लागू नसावी. पहिले सेशन संपताना आयोजकांनी सांगितले की पाकिस्तान ४ बाद ५५ धावा. 

नाश्ता न घेता २००/- रुपयांची दक्षिणा देऊन बऱ्याचशा क्रिकेट प्रेमींनी कार्यक्रम सोडला.


दुसरे सेशन संपताना आयोजकांनी सांगितले की भारताची फलंदाजी नुकतीच सुरू झाली आहे. आता इतके थांबलो आहोत तर जेवण करूनच जाऊ, दोनशे रुपये जादा लागतील, मस्त जेवणावर ताव मारून पैसे वसूल करू आणि मग जाऊ, असा विचार करून काही पुणेकरांनी भरपेट जेवण करून, २-३ दा स्वीट डिश दडपून गच्च भरलेल्या ढेरीवरून प्रेमाने हात फिरवत, विड्याचे पान नाही याची खात्री झाल्यावर, कुरकुर करून पेनल्टी कमी करण्याचा असफल प्रयत्न करून टीव्हीच्या अधीन होण्यासाठी स्वगृही प्रस्थान केले.


व्यसनमुक्ती वरील सेशन खुप प्रभावी आणि उपयुक्त होते. विविध व्यसने आणि विशेषतः मोबाईलचा अती वापर कसा घातक आहे याचे सुंदर विवेचन करीत त्यावरील उपचार समजावण्यात आलेत. बरे झाले, आपण कार्यक्रम सोडला नाही असे बहुतांश उपस्थितांना वाटले. 


पुढचे आणि शेवटचे सेशन मेडीटेशनचे आहे. भारताला विजयासाठी ३१ चेंडूत ५१ धावा हव्यात आणि ४ गडी बाद व्हायचे आहेत. मैदान "फिरकी" गोलंदाजीला अनुकूल असून सामना खुप रंगतदार अवस्थेत असल्याने यानंतर कार्यक्रम सोडला तरी पेनल्टी आकारली जाणार नाही असे आयोजकांनी उदारपणे जाहीर केले, परंतु कोणीही कार्यक्रम सोडून गेले नाही.


उपस्थित मंडळी गरम समोसे आणि वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेत असताना आयोजकांनी थोडावेळ क्रिकेट सामन्याची कॅामेंटरी ऐकविली. नंतरचे मेडीटेशन वरील लहानसे लेक्चर सगळ्यांना खूप आवडले. त्यानंतरच्या १० मिनिटांच्या मेडीटेशने सगळ्यांना तरतरीत केले. कार्यक्रम संपला नी तेव्हढ्यात आयोजकांनी भारताने सामना जिंकल्याची बातमी दिली. आनंदाने जल्लोष करत साधारणतः २०० च्या जवळपास मंडळी व्यसनमुक्ती वरील नव्या कोऱ्या पुस्तकाची प्रत घेऊन, खूप काही शिकल्याच्या आनंदात घरी परतली.


रात्रभर जागून राजने पुस्तक वाचले, सकाळी चार निबंध सुवाच्य अक्षरात लिहून ११ च्या आतच ई-मेल पाठविला.

साडेअकरा वाजता आलेल्या तिघी ताईंचे आभार मानून राजने त्यांना प्रत्येकी ११००/- रुपये दिल्याने ताई मंडळी जाम खुश झाली.


ताईंचे एकमेकीत चाललेले बोलणे राजने ऐकले. एक ताई म्हणत होत्या, माझ्या एका मैत्रिणीने आपला फोटो बघितला आणि तिने मला विचारले हे तुमच्याबरोबर कोण सर आहेत? कसले स्मार्ट आहेत ना! कुठल्या नवीन सिरीयलचे हीरो आहेत का? तू त्यांच्याशी परिचय करून देशील का?


५ वाजले तरी ४४००/- रूपये आले नाहीत म्हणून राजने मेल चेक केला. अॅड्रेस टाईप करताना झालेल्या चुकीमुळे मेल डिलिव्हर झाला नव्हता. थोडक्यात राजच्या एका लहानशा चुकीमुळे हजेरी बक्षिस न मिळाल्याने कालचा प्रोग्रॅम, फोटोचे ४००/- रुपये आणि ताईंना दिलेले ३३००/- रुपये असा ३७००/- रूपयांना पडला. 


तीघी ताईंनी फक्त खाण्या पिण्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. राज मात्र कालच्या कार्यक्रमात खूप काही शिकला होता शिवाय कुणी तरी त्याला स्मार्ट आणि हीरो म्हटले होते ना! म्हणून पैसे गेल्याचे त्याला अजिबात दुःख नव्हते. 


तेवढ्यात नेहाचा फोन आला. राज घरीच आहेस ना? की ताई मंडळी सोबत कुठे तरी बागडतोस? नेहा अजून फिरकी घ्यायच्या आत राजने विचारले, नेहा कसा झाला सत्कार समारंभ? खूपच छान! सत्काराला आपण दिलेल्या शर्टवर दादा काय हॅंडसम दिसत होता! तो सगळ्यांना सांगत होता, माझ्या लाडक्या जिजुंनी हा शर्ट भेट दिला म्हणून. मला आवडलेला शर्ट फक्त १०००/- रूपये महाग होता. दादा अजून हॅंडसम दिसून राज तुझीच किंमत वाढली असती ना? नको तिथे काटकसर करतोस.


नगरसेवक साहेबांनी माझेही स्वागत केले गुलाबाचं फुल देऊन. मला सांगत होते, मी आणि राज एकाच वर्गात होतो. राज फक्त अभ्यास करून नेहेमी पहिला नंबर पटकवायचा. अभ्यास न करता माझाही पहिला नंबरच असायचा पण शेवटून. मी ऐकलंय की राज कसाबसा काटकसर करून संसार चालवतोय आणि दिसतोही अगदी वयस्कर. तुम्ही इतक्या सुंदर, सुडौल नी आकर्षक, मग कशा भाळल्या तुम्ही राजवर?


राजने कालचा फोटो नेहाला पाठविला. तीन्ही ताई काय सुंदर दिसताहेत! नेहा उद्गारली. हा इतका चिकना हिरो कोण? ओळखीचा वाटतो पण लक्षात येत नाही. पुण्याला आले की ताईंना विचारीन आणि ओळख करून घेईन त्यांच्याशी.


राजने नेहाचा फोन ठेवला नी तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. अतिशय गोड आवाजात एक मुलगी सांगत होती. सर, पुढच्या आठवड्यात एक कार्यक्रम आहे. वातानुकूलित सभागृह, चहा, नाश्ता, सुग्रास भोजन, दुपारी चहा, कांदा भजी आणि येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही २१००/- रुपये देणार आहोत. विश्वास ठेवा, यात अजिबात फिरकी नाही. 


सर, तुम्ही याल का? लिहू का तुमचे नांव? फोन स्पीकर मोडवर होता. राजने "नाही" म्हणण्याच्या आधीच, तीन्ही ताई स्वतः भोवती गिरकी नी राजची फिरकी घेत एकसुरात म्हणाल्यात, हो लिहा राज प्लस ३. 


-दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment

0 Comments