राजने साताऱ्यातील कंपनीची ॲाफर ॲक्सेप्ट केली आणि फ्लॅटच्याच भाड्यात प्रशस्त बंगला भाड्याने मिळाल्याने तो आणि नेहा खुश झाले. गेंडामाळ परिसरातील मेन रोड पासून थोड्याशा आत पण अतिशय शांत आणि हिरव्यागार सोसायटीतील फक्त तीन बंगल्यांचे बांधकाम पूर्ण झाले होते, बाकी दहा-बारा बंगल्यांचे बांधकाम अर्धवट स्थितीत होते.
पहिला दिवस सामान लावण्यात गेला. संध्याकाळी भरपेट पोहे खाऊन आणि मसाला चहा पिऊन राज आणि नेहाच्या गप्पा रंगल्या. प्रत्येक विकेंडला जवळपासच्या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायचे दोघांनी एकमताने ठरविले.
भयाण शांतता, गार वारा, रात्रीचे बारा वाजले होते तरीही झोप लागत नव्हती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. इतक्या रात्री कोण असणार? राज, थांब मीही येते, नेहा म्हणाली. कोण आहे? राजने विचारले. मी रीना, समोरच्या बंगल्यात राहते. राजने दरवाजा उघडला. पांढरा शुभ्र स्लीवलेस टी शर्ट आणि त्याच कलरची हाफ पँट, खांद्यावर विसावणारे मोकळे केस, गोरा वर्ण आणि मध्यम ऊंची असलेली एक अतिशय आधुनिक तरुणी समोर उभी होती.
हं बोला, काय हवे आहे आपल्याला? माझी एक मैत्रीण ट्रेनने येणार आहे, ट्रेन नऊ वाजताच येणार होती पण लेट झाल्याने १२.३० वाजता सातारा रोड म्हणजे आपल्या साताऱ्याच्या स्टेशनला पोहोचेल. इतक्या रात्री रिक्षा मिळणार नाही म्हणून एक विनंती आहे, तुमची कार द्याल का मला? मी तासाभरात परत येईन आणि पेट्रोलचे पैसे देईन. मी कार देतो पण पैसे मात्र नाही घेणार, आहे का मान्य? मानेनेच होकार देत ती तरुणी गोड हसली. राजने तीला कारची किल्ली दिली तेव्हा नेहा म्हणाली, राज केवढी रात्र झालीय, आणि आज तर अमावस्या आहे, तीला एकटीला कसे जाऊ द्यायचे? तुही जा तीच्या सोबत. नेहाचा एवढा मोठेपणा आणि उदारपणा, हा राजसाठी सुखद धक्का होता.
रीना राजला रस्ता दाखवत होती, कुठे वळायचे ते सांगत होती नी त्याच वेळी तीची कॅीमेंटरीही चालू होती, हा राजवाडा, हा कमानी हौद, हा पोवई नाका, हे डी जी कॅालेज, हे एल आय सी ॲाफिस, हा इंडस्ट्रीयल एरिया वगैरे, वगैरे. नटराज मंदिर कुठे आहे? रीनाने ऊत्तर दिले नाही, बहुधा राजचा प्रश्न तीने ऐकला नसावा. रस्ता तसा मोकळाच होता पण राज गाडी हळू चालवत होता, बाजूला सुंदर तरुणी बसली होती म्हणून नव्हे तर रस्ता अपरिचित होता म्हणून.
साधारणतः १२.३० वाजता ते स्टेशनला पोहोचले. मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येते असे म्हणत रीना गाडीतून उतरली. दोनच मिनिटांत ती खूप मोठी बॅग असलेल्या एका पांढरी हाफ पॅंट, पांढरा स्लीवलेस टी शर्ट नी लांब मोकळे केस असलेल्या अतिशय सुंदर तरुणीला घेऊन आली. डिकी उघडून बॅग आत ठेवायला राज खाली उतरला पण त्याआधीच त्या नाजुक तरूणीने बॅग अगदी सहजपणे डिकीत ठेवली होती. ही माझी मैत्रीण ज्युली, रीनाने त्या तरूणीची ओळख करून दिली. तुम्हा दोघींचे अगदी सारखे कपडे हे ठरवून केलेला प्लॅन की योगायोग? राजने न राहवून विचारले. राज आमच्या आवडी निवडी सारख्याच आहेत, आणि आम्ही नेहेमी असे पांढरे शुभ्र कपडेच वापरतो रीना म्हणाली.
तू गाडी खूप हळू चालवतोस, आता मी गाडी चालवू का? रीनाने विचारले. रीना गाडी खूप फास्ट चालवत होती. तीने केलेले दोन ओव्हरटेक तर काळजात धडकी भरवणारे होते. ज्युली किती दिवस मुक्काम? राजने विचारले. तुम्हाला कंटाळा येईपर्यंत, ज्युली मंद स्मित करत म्हणाली. तुझा कंटाळा कधीच येणार नाही, म्हणणाऱ्या राजच्या खांद्यावर हात ठेवत रीनाने विचारले, ज्युलीवर फिदा का? राज गोड हसला. रीना, तुम्हा दोघींबरोबरचा हा प्रवास संपूच नये असे वाटते. राज, तु आत्ता जे बोलला ते नेहाला सांगू का? रीनाने लडिवाळपणे विचारले. अजिबात नाही, आणि कधी सांगशील तर बघ, रीनाच्या खांद्यावर हाताने दाबत राज म्हणाला. आपण कुठे तरी थांबून गप्पा मारूया का? असे राजने विचारले नी पुढच्याच क्षणी नेहाचा फोन आला.
राज किती वेळ लागेल? मला भिती वाटतेय. मला विचित्र आवाज ऐकू येताहेत. आलोच मी. नेहाच्या काळजीपोटी राजने थांबून गप्पा मारण्याचा प्लॅन बदलला. राज, नाराज होऊ नकोस, परत कधीतरी म्हणताना रीनाला ठसका लागला आणि राजने पुढे केलेल्या त्याच्या पांढऱ्या स्वच्छ रूमालावर लिपस्टिक लावलेल्या तीच्या नाजूक ओठांचे ठसे उमटले. नेहाने रूमाल पाहिला तर रीनाचे आपल्या घरी येणे कायमचे बंद होणार म्हणून राजने रूमाल गाडी बाहेर टाकला पण रूमाल अनपेक्षितपणे परत आत आला थेट रीनाच्या हातात. राजला चकित झालेला पाहून रीना म्हणाली, माझे ओठ माझ्याकडेच आलेत. अरे बाहेर खूप हवा आहे ना म्हणून. तुझी आठवण म्हणून रूमाल माझ्याकडेच ठेवते, चालेल ना? रीनाने विचारले. चालेल चालेल, पण तुझ्याकडेच ठेव, नेहाला दाखवू नकोस, राज म्हणाला.
घरी पोहोचल्यावर राजने मोजक्या गोष्टी सोडून सर्व काही नेहाला सांगितले. थकल्यामुळे नेहाला नी थकवा आणि गोड आठवणींमुळे राजला छान झोप लागली. सकाळी राजला गाडीत लेडीज पर्स दिसली. गाडीची चावी रात्री रीनाकडे राहिल्याने घरातील दुसऱ्या चावीने गाडीचा दरवाजा उघडून काढलेली पर्स देण्यासाठी राज नेहाला सांगून रीनाकडे गेला नी अर्ध्या मिनिटात दारावरची बेल वाजली. मी समोर राहते, पांढऱ्या शुभ्र साडीतील तेजस्वी आजीबाईंनी ओळख करून दिली. राज रीनाची पर्स द्यायला गेला, येईलच एवढ्यात, नेहाने सांगितले. आजी, या ना, चहा टाकते, नेहा म्हणाली. आता नको, राजला हेलो करून निघते मी, असे त्या म्हणत असताना राज आला.
रीना नसेल ना घरी? तू टाकली का पर्स दरवाजावर लावलेल्या चिठ्ठीत लिहिल्या प्रमाणे खिडकीतून आत? आजीबाई, तुम्ही तर सर्वज्ञ आहात. या ना, घरात. नंतर कधीतरी येईन. एक सांगायचे राहिले, आज रात्री रीना येईल तुमचे आभार मानायला. आजीबाई निष्णात ज्योतिषी असणार, राजची खात्री पटली.
रात्रीचे अकरा वाजले तरी रीना आली नाही. शेवटी कंटाळून राज आणि नेहा झोपले. त्यांचा नुकताच डोळा लागला नी बेल वाजली. थोडीशी वैतागून नेहा नी मोठ्या उत्साहात राज उठला. अपेक्षेप्रमाणे रीनाच होती. राज, तुझे मनापासून आभार. मी न विचारताच तुझी गाडी नेली ज्युलीला स्टेशनला सोडायला. रीना, अगं मला सांगितलं असतं तर मीही आलो असतो, नेहा ही आली असती, प्रसंगावधान राखत राजने बायकोचे नांवही जोडले. रीना येना, आत ये, म्हणणाऱ्या राजचा नेहाला राग आला. एकतर झोपमोड झाली होती नी आता रीना थांबली तर नंतर झोप येणार नाही. आता नको, हे रीनाकडून ऐकून, बाय रीना म्हणत नेहा बेडरूममध्ये गेली. पांढऱ्या शुभ्र हाफ पॅन्ट, टी शर्ट मधील रीना खूप छान दिसत होती. राजच्या खांद्यावर हात ठेवून रीना म्हणाली, बाय राज, नेहा वाट बघत असेल, जा आत. रीनाचा हात पकडण्याचा राजने प्रयत्न केला पण ती चपळाईने सटकली.
नेहा केव्हाच निद्राधीन झाली होती आणि बराच प्रयत्न केल्यावर राजला झोप लागली. कोणीतरी दोन तीनदा बेल वाजवली. राज बघना, कोण आहे ते, नेहाने राजला उठवले. राजने घाई घाईत दरवाजा उघडला, कदाचित रीना तर नसेल? या विचाराने.
पांढरा शुभ्र हाफ बाह्यांचा शर्ट नी पायजमा घातलेला दूधवाला बाहेर उभा होता. साहेब नवीन आलात वाटतं. तुम्ही किती दूध घेणार? आणि दूध किती वाजता द्यायचं? एक लिटर दूध देत जा आणि समोरच्या बंगल्यात देतात तेव्हाच देत जा. साहेब, समोर कोणीच राहत नाही. अहो, समोर आजीबाई राहतात आणि रीना त्यांच्या बाजूच्या बंगल्यात राहते. साहेब, मी द्यायचो दूध त्यांना, पाच वर्षांपूर्वी. गेली अनेक वर्षे ते दोन्ही बंगले रिकामे आहेत. अहो दादा, मी भेटलोय त्यांना, कदाचित ते इथे राहतात हे माहीत नसेल तुम्हाला. का उगाच घाबरवता मला? साहेब, मी फक्त मला जे माहीत आहे ते सांगितलं, आपलेपणाने. पटत नसेल तर सोडून द्या.
बरं साहेब मला ॲडव्हान्स द्याल का? हो देईन की, राज म्हणाला. राजने दरवाजा बंद केला आणि परत उघडत विचारले, किती ॲडव्हान्स द्यायचा? काहीही ऊत्तर मिळाले नाही. दूधवाले दादा कुठेही दिसत नव्हते. काही सेकंदांत ते दिसेनासे झाले होते, राजला आश्चर्य वाटले.
राजकडून हे ऐकून नेहा म्हणाली, राज हे खरं असलं तर? मला तर थरथरायला लागलं रे.आज विचारू या आपण रीनाला आणि आजीबाईंना.
दिवसभरात रीना आणि आजीबाई भेटल्या नाहीत. संध्याकाळी नेहा आणि राज रिक्षाने राजवाड्याला आलेत, नंतर एका पॅाश हॅाटेलमध्ये त्यांनी जेवण केले. घरी परतताना रिक्षा मिळाली पण मी मेन रोडवर सोडतो, तुमच्या सोसायटीत येणार नाही, रिक्षावाले काका म्हणालेत. ठीक आहे, थोडं चालणं होईल म्हणत ते दोघे रिक्षात बसले.
साहेब, साताऱ्याला नवीन का? कधीपासून राहतात या सोसायटीत? काही विचित्र अनुभव आला का तिथे? जरा जपून हं. असं म्हणतात, ती सोसायटी झपाटलेली आहे. दोन सुंदर तरूण मुली, एक तेजस्वी आजीबाई आणि दूधवाले दादा तिथे दिसतात म्हणे. हे ऐकून राज आणि नेहाला धक्काच बसला.
मला आवडलेली इतकी गोड मुलगी खरंच भूत असेल का? राजला एकेक गोष्ट आठवू लागली. तो रीना बरोबर गेला ती अमावस्येची रात्र होती. नटराज मंदिर कुठे आहे? या प्रश्नाचे ऊत्तर रीनाने दिले नव्हते. स्टेशनवर रीना केवळ दोन मिनिटांत ज्युलीला घेऊन आली होती, खूप मोठी बॅग ज्युलीने अगदी सहज डिकीत ठेवली होती, रीना आणि ज्युली दोघींचे सारखेच कपडे, तेही पांढऱ्या रंगाचे, रीनाने खूप रिस्की ओव्हरटेक अजिबात न घाबरती केले होते, ओठांचे ठसे उमटलेला रूमाल राजने गाडी बाहेर टाकला पण तो अनपेक्षितपणे रीनाकडे आला, रीना आणि ज्युली रात्री इतक्या उशिरा येऊनही अगदी सकाळी रीनाच्या घराला कुलूप होते, आजी बाईंनी सांगितलं अगदी तसंच सगळं घडलं होतं, मोठी बॅग घेऊन आलेली ज्युली केवळ एका दिवसात परतली होती आणि दूधवाल्या दादांनी सांगितलं की गेली अनेक वर्षे दोन्ही बंगल्यात कोणीच राहत नाही, दूधवाले दादा क्षणात गायब झाले होते. सर्वच विचित्र होतं. एक विशेष म्हणजे चौघांचे कपडे पांढरे शुभ्र होते.
त्या मध्यरात्री बराच वेळ काही विचित्र आवाज त्यांनी ऐकले, रात्रभर झोपू शकले नाहीत ते, नी दुसऱ्याच दिवशी त्यांनी घर बदलले.
त्या दोघांना सातारा आवडले आणि मानवले ही. राजचे कामही छान चालू होते. पाच वर्षांत तीन प्रमोशन्स मिळालीत. गेले काही दिवस वर्तमानपत्रात रीज्यु डेवहलपरची "आभास रेसिडेन्सी" मधील कॅाम्पॅक्ट फ्लॅट्सची ॲडव्हरटाइज येत होती. राज, माझ्या वर्गात रीज्यु नांवाचा मुलगा होता आणि त्याचे वडील बिल्डर होते, कदाचित ही त्याचीच कंपनी असेल. आपल्याला कमी रेट लावेल तो. बघायचं का जाऊन आपल्या बजेटमध्ये बसतोय का तिथला फ्लॅट? व्हाय नॅाट? नाश्ता झाल्यावर जाऊ या.
साडे नऊ वाजताच ते रीज्यु डेव्हलपरच्या ॲाफिसमध्ये पोहोचले. रीज्यु सरांना भेटायचे आहे, नेहा म्हणाली. इथे कोणी सर नाही, दोन मॅम आहेत. त्या भेटत नाहीत, फक्त फोनवर अॅव्हलेबल असतात. रीज्यु हे कोणाचे नांव नाही, दोन नांवांचे कॅाम्बीनेशन आहे, या आहेत मिस रीना आणि या मिस ज्युली, एक फोटो दाखवत रिसेप्शनिस्ट म्हणाली.
तो फोटो पाहून राज आणि नेहाच्या मनात आले की
रीना आणि ज्युलीने भुताटकीचा आभास निर्माण करून अतिशय शांत नी हिरवाईने नटलेली जागा स्वस्तात हडप करून महागड्या घरांचा प्रकल्प सुरू केलेला दिसतो. रीनाने दाखविलेली जवळीक हे सत्य होते की आभास हे मात्र राजला समजत नव्हते नी या विषयावर नेहाशी बोलणेही शक्य नव्हते. ते काही क्षण सत्य नसले आणि आभास जरी असले तरी हवेहवेसे मात्र नक्कीच होते.
-दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment
0 Comments