आप्पा वक्ता आणि मी श्रोता झालेलो. मी ऐकत होतो. गावातील गावगुंड लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि गरीबांचं जीवन सुखी होण्यासाठी आप्पांनी वैराचा विस्तव स्वत:च्या अंगावर ओढवून घेतला. त्यात आप्पांना अनेक वर्षे भूमिगत राहावं लागलंच, पण त्यांच्या बायकापोरांचेही खूप हाल झाले; पण गरीबांच्या मार्गातले सलणारे काटे दूर करण्यासाठी हा ‘बापू’ आप्पा मात्र आयुष्यभर रक्ताळलेली वाट चालत राहिला. मिळेल ते खावं लागलं, कोठेही शिवारात मुक्काम करावा लागला. एका बाजूला गावगुंड आणि दुसऱया बाजूला पोलीस यांना चुकवत आप्पा कधी डोंगराच्या कुशीत राहिले तर कधी जंगलात मुक्काम केला. या काळात त्यांना सामान्य गरीब लोकांनी सांभाळले. हा सगळा इतिहास आप्पांनी मला सांगितला. त्यांचा तो सगळा काळ आप्पांनी माझ्या डोळय़ासमोर उभा केला.
बापू बिरू वाटेगावकर यांच्या जीवनावर चित्रपट आलेला आहेच; पण त्याच्याही अगोदर सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी बापू यांच्या जीवनावर ’कळंबा जेलचा कैदी अर्थात बापू बिरू वाटेगावकर’ हे वगनाटय़ केले होते. प्रसिद्धीच्या माध्यमांना मर्यादा असण्याच्या काळातही त्यावेळी ते वगनाट्य बघायला चिक्कार गर्दी व्हायची. तेव्हा बापू आणि त्यांचा गावगुंडांच्या विरोधात असलेला लढा सर्वदूर पोहोचला होता. बापूंवर काही स्थानिक शाहीर मंडळींनी पोवडेही रचले होते. छगन चौगुले यांची ध्वनिफीतही खूप वर्षे गावोगावी वाजत होती. चित्रपट, तमाशा, शाहीर, आणि गायक या सगळय़ा माध्यमांनी ज्यांची दखल घेतली असा हा माणूस होता. कृष्णाकाठावरचं वाळवा तालुक्यातील बोरगाव हे बापू बिरू यांचं गाव. याच गावातल्या एका गरीब कुटुंबातला बापूंचा जन्म. लहानपणापासून त्यांना कुस्तीची आवड. गरीब माणसांविषयी त्यांना विलक्षण कळवळा होता. उसाच्या पट्टय़ात कृष्णा नदीच्या काठावर काही गावगुंडांची दहशत सुरू होती. एखाद्या गरीबाच्या घरात नांदणारी सुंदर सून टग्यांना सहन होत नव्हती. अशा सुनेवर आडवाटेत गाठून अत्याचार केला जात होता आणि ‘कुठे बोललीस तर तुझ्या नवऱयाला खलास करेन.’ अशी धमकी दिली जात होती. गरीबांच्या बायका दिवसाढवळय़ा नासवल्या जात होत्या, नागवल्या जात होत्या. टग्यांना कोणी जाब विचारला तर त्याची झोपडी पेटवली जात होती. त्याला वाळीत टाकले जात होते. सगळी गरीब माणसं जीव मुठीत धरून जगत होती.
एक दिवस बापूंच्या समोर गावातील एका टग्याने एका बाईची छेड काढली. बापूंनी त्याला समजावून सांगितले, पण त्याने बापूंनाच खुन्नस दिली. तरीही बापू त्याला समजावत राहिले. तरीही तो तसाच वागत राहिला. मग मात्र बापूनी ठरवलं, अशा माजलेल्या लोकांना खलास करून आता आपणच या जनतेला न्याय मिळवून द्यायचा. मग एक दिवस बापूने त्याला ठार केले. त्या दिवसापासून गोरगरीबांच्या हक्काचं रक्षण करायला बापूंनी घर सोडलं ते सोडलंच. गरीबांना न्याय मिळावा यासाठी बापूंच्या हातून तब्बल बारा खून झाले. बापू पंचवीस वर्षे फरार राहिले. पोलिसांनी बापूंच्या घरच्या लोकांना खूप त्रास दिला, छळ केला. बापूंनी पोलिसांच्या स्वाधीन व्हावे म्हणून खूप प्रयत्न झाले, पण बापू मात्र सह्याद्रीच्या डोंगररांगा, उसाची शेते, दुष्काळी भागातील आडवळणी गावात राहिले. ते ऐन तारुण्यात घराच्या बाहेर पडले. फरारी राहिले. मातलेल्या गावगुंडांना वठणीवर आणण्यासाठी बापू घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडले होते. या काळात बापूंनी जे काही केलं ते एखाद्या चित्रपटातल्यासारखं होतं. बापूंनी अगोदर केलं आणि नंतर ते चित्रपटात आलं. त्यानंतर बापू बिरू हे सांगली, सातारा जिल्ह्यातील गरीबांचा देव झाले.
आप्पांशी प्रत्यक्ष घडलेल्या भेटीत अनेक थरारक गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यांची कथनशैली पण अशी की, सगळा प्रसंग जिवंत उभा करत. त्यांचे ते शब्द अजूनही कानात घुमतात, ‘घर तर कायमचं सुटलं होतं. लोकांच्या बळावर इथून पुढचं दिवस काढायचं होतं. पहिली गोष्ट म्हंजी, आम्ही चोरी, दरोडा या गोष्टींपासून खूप लांब होतो. या गोष्टी आयुष्यात कधीच जवळ येऊ द्यायच्या नाहीत असं पक्क केलं होतं. परस्त्री आम्हाला आई-बहिणीप्रमाणे होती. आमच्याकडे जी माणसं होती त्यात दारू पिणारं एकबी नव्हतं. दारू पेणार कोण असलं तर त्याला थापडी लावून बाहेर घालवत होतो. आमचं सगळं आयुष्य लोकांच्या मायेमुळं पार पडलं. लोकांनी लय लळा लावला, काही आया-बहिणी एकटय़ा भाकरी घेऊन यायच्या. गावोगावी अशा जीव लावणाऱ्या बहिणी मिळाल्या.’
आप्पा सांगेल तोच अनेक ठिकाणी न्याय झाला. त्या भागात आप्पा महाराज यांचाच कायदा चालू लागला. गावात नाडलेली, पिचलेली गरीब माणसं पोलिसांकडे जात नव्हती, तर आप्पांकडं जात होती. आप्पांनी शेकडो बायकांचे हुंडय़ासाठी विस्कटलेले संसार उभे केले. बायकांना छळणाऱ्या नवऱ्यांना वठणीवर आणले. गावगुंड, खासगी सावकार यांच्या दहशतीत वावरणारी अनेक कुटुंबे भयमुक्त केली. गरीब माणसांवर काहीही वेळ आली की लोक बापू बिरू म्हणजे आप्पांना शोधायची. आप्पांची गाठ पडली की त्यांना साक्षात परमेश्वर भेटल्याचा आनंद व्हायचा. सर्व प्रश्नांची उत्तरे आप्पांकडे असायची. एक दिवस आप्पांना अटक झाली. आप्पांच्या अटकेची बातमी आल्यावर कित्येक बायकांनी त्यांची लवकर सुटका व्हावी म्हणून उपवास धरले होते. देवाला नवस केले होते. एवढं प्रेम बापू बिरू यांना मिळालं होतं. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी वारणा खोऱयातील सत्तू भोसले यांच्यावर ‘वारणेचा वाघ’ ही कादंबरी लिहिली आहे. त्याच विचाराने वागणारा आणि जगणारा बापू वारणेच्या शेजारील कृष्णा नदीच्या काठावर होऊन गेला. वारणेच्या काठावर सत्तू भोसले यांच्यावर जशा ’सत्तू धर्माचा भाऊ माझा, सत्तू डोंगराचा राजा’ अशा ओव्या बायका जात्यावर म्हणायच्या तसंच बापूंच होतं.
पंचवीस वर्षे भूमिगत अवस्थेत राहिलेल्या आप्पांना पोलिसांनी एक दिवस पकडलं. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेनंतर ते बाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी ठरवलं, लोकांचं प्रबोधन करायचं. मग ते गावोगावी प्रवचनासाठी जाऊ लागले. त्यांचा आध्यात्मिक अभ्यास होता. भूमिगत असताना त्यांनी एक गुरू केला होता. तेव्हापासून ते आध्यात्मिक मार्गाला वळले होते. आप्पा प्रवचनकार म्हणून जायचे तेव्हा त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. प्रवचनात आप्पा ‘चांगलं वागा. कोणावर अन्याय करू नका. बायका-माणसांकडे आई-बहिणीच्या नात्याने वागा’ असं सांगायचे. बापू गेले. गेली साठ वर्षे कृष्णाकाठ असो की माणदेशातील एखादं आडवळणी खेडं असो, ज्या माणसाची लोक आतुरतेने वाट पाहत आणि दारात आप्पांना पाहिल्यावर ज्यांचं काळीज सुपाएवढं होई अशी हजारो माणसं बापूंच्या जाण्यानं दुःखी झाली. बापू गेले आहेत हे सत्य पचवणं ही त्यांच्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे .बापू अलीकडं सहसा बाहेर पडत नव्हते, पण ते जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा कोणत्याही गावात त्यांना पाहायला आणि त्यांचे दर्शन घ्यायला गर्दी व्हायची. हे चित्र आता दिसणार नाही.
-संपत मोरे
Sampat More
(बापू बिरू वाटेगावकर यांच्या निधनानंतर दैनिक सामना मध्ये लिहिलेला लेख )

Post a Comment
0 Comments