Type Here to Get Search Results !

लेखक दिलीप कजगांवकर लिखित कथा "बॅंक अकाउंट"



सेव्हिंग अकाउंट उघडण्यासाठी रीना बॅंकेत आली. अकाउंट उघडण्याचा फॅार्म तीने भरला आणि महत्त्वाचं काम असल्याने ती घाई घाईत बॅंकेतून बाहेर पडली. रीनाचा फॅार्म चेक करताना मॅनेजर साहेबांचे लक्ष आकर्षून घेतले तीच्या जन्म तारखेने कारण रीनाची आणि त्यांची जन्मतारीख एकच होती. 

मॅनेजर साहेबांनी रीना मॅमला फोन करून सांगितले की मी बॅंकेतून बोलतोय. मॅम तुम्ही तुमच्या सोसायटीचे नांव दिले पण फ्लॅट नंबर दिला नाही. साहेब मी बॅंकेत येऊन फॅार्म अपडेट करून देऊ का? नको नको, मी अॅड करतो, तुम्ही फ्लॅट नंबर सांगा. फ्लॅट नंबर २१.

ॲानलाईन बॅंकिंगसाठी मला तुमच्या आईंचे नांव सांगा. 

सावित्री जोशी.

थॅंक्स, अकाउंट डिटेल्स तुम्हाला १-२ दिवसांत मिळतील.


साधारणतः दोन महिन्यांनी रीनाला बॅंक मॅनेजर साहेबांचा फोन आला. मॅम, पुढच्या रविवारी संध्याकाळी ७ वाजता आम्ही आमच्या निवडक कस्टमर्सना डिनर साठी हॅाटेल डायमंडला बोलावले आहे. तुम्ही याल का? संध्याकाळी ६.३० ला तुम्हाला घ्यायला तुमच्या घरी कार येईल आणि डिनर नंतर तुम्हाला घरी सोडले जाईल. 

मी अवश्य येईन, रीना म्हणाली.


निळ्या रंगाची सुंदर साडी नेसून रीना हॅाटेल डायमंडला बरोबर ७ वाजता पोहोचेली. रिसेप्शनिस्टने मोगऱ्याचा गजरा देत रीनाचे स्वागत केले आणि तीला एका प्रशस्त हॅालमध्ये नेले. तिथे मांडलेल्या खुर्च्यांवर वेगवेगळी नांवे लिहिली होती आणि मधल्या खुर्चीवर रीनाचे नांव होते. रीनाला खुर्च्यांवरील पुरुषांची तसेच स्त्रियांचीही नांवे ओळखीची वाटली, एम कॅाम च्या तीच्या नासिकच्या कॅालेज मधील मित्र मैत्रिणींच्या नांवांसारखीच. आपल्या कॅालेज मधील मैत्रिणींची आतापर्यंत नक्कीच लग्नं झाली असतील नी त्यांची नांवे ही बदलली असतील. सारखी नांवे हा योगायोग असावा. कदाचित यांतील काही आपले मित्र असु शकतील. बघुया, समजेलच थोड्या वेळात. 


ही मंडळी कुठे आहे? अजून आले नाहीत का? रीना मॅम, या लिहिलेल्या नांवांपैकी बहुतेक सर्व येतील. तोपर्यंत तुम्ही ॲारेंज ज्युस घ्या ना. 

पुढच्या पाच मिनिटांत चार पुरूष आलेत आणि काय तो योगायोग! सर्व रीनाचे वर्गमित्र. मस्त गप्पा रंगल्या. रीना, तू तर पूर्वाश्रमीची नेहा ना? लग्नानंतर नवऱ्याने नांव बदललेले दिसते. अगदी तेव्हा सारखीच सुंदर दिसतेस, काहीच बदल नाही. इतकी वर्षे कुठे गायब होतीस? नवरा काय करतो? नेहा काहीच बोलली नाही.


नंतर एकेक करत चार जणी आल्यात आणि त्याही रीनाच्या वर्ग मैत्रिणीच. ए तुम्ही अजून लग्न केले नाही? रीनाने आश्चर्याने विचारले. आमचे लग्न झाले आहे, सर्वजणी एकसुरात म्हणाल्यात. मग लग्नानंतर नांव बदलले नाही? हो बदलले की पण आम्ही मॅनेजर साहेबांना आमचे लग्नाआधीचे नांव लिहायला सांगितले. आम्ही तुलाही नेहाच म्हणू चालेल ना? चालेल नाही, पळेल, नेहा म्हणाली.


एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की आपल्या सगळ्यांचे अकाउंट एकाच बॅंकेत आणि साहेबांनी बरोबर आपल्यालाच आमंत्रित केले. आपले होस्ट कुठे आहेत? नेहाने विचारले. 

ते येतीलच थोड्या वेळात तोपर्यंत आपण एम कॅाम नंतर काय केले, कुठे सर्व्हिस केली, लग्न केले का? कधी केले? जोडीदार कोण? काय करतात वगैरे सांगू या. नेहा, सूरूवात तुझ्यापासून , वरद म्हणाला. 

कॅालेज नंतर आपण आठ वर्षांनी प्रथमच भेटतोय, मला तुम्हा सर्वांबद्दल जाणून घ्यायचे आहे. मी सगळ्यांत शेवटी बोलेन, नेहाने सांगितले.


सगळ्यांचे सांगून झाल्यावर त्यावेळची कॅालेजक्वीन नेहा बोलायला उठली. मित्रांनो आपल्या वर्गातील सर्वात हुशार मुलगा राज कुठे असतो, काय करतो तो? त्याने लग्न केले का? 

नेहा कॅालेज संपल्यावर राज एकदा भेटला होता आणि तुझ्याशी लग्न करणार असे म्हणाला होता. तुझ्या आई-बाबांनी लग्नाला परवानगी दिल्याचे त्याने मला सांगितले होते पण तू तर दुसऱ्याच मुलाशी लग्न केलेस. का? काय झाले? राजशी काही बिनसले का? की त्याने फसवले तुला?


राज कुणाला फसवू शकेल का रे? किती साधा, सरळ आणि प्रमाणिक मुलगा. त्याने नाही पण माझ्या आई-बाबांनी फसवले त्याला. राज, तू नोकरी मिळव, स्थिरस्थावर हो आणि दोन वर्षांनी तू आणि नेहा लग्न करा, आई-बाबांनी सांगितले होते पण त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, फारशी चौकशी न करता घाई घाईत माझे लग्न अमेरिकेतील एका मुलाशी लावून दिले. 


मी अमेरिकेत गेले आणि लवकरच मला माझ्या नवऱ्याच्या गैरवर्तणुकीची आणि व्यसनांची माहिती मिळाली नी आम्ही वेगळे राहू लागलो. त्यानंतर त्याने माझी कधीही चौकशी केली नाही. तीन महिन्यांपूर्वी मी अमेरिका सोडले नी मागच्याच आठवड्यात तो भारतात आला असताना आम्ही विभक्त झालो. अजून मी कागदोपत्री नांव बदललेले नाही पण आता मी रीना कुलकर्णी नाही तर मी आहे नेहा जोशी.


नेहा मी ऐकले आहे की राजने अजूनही लग्न केले नाही आणि तुझ्याशिवाय इतर कोणाचा तो विचारही करू शकत नाही, वरद म्हणाला. 

वरद, मला राजला भेटायची तीव्र इच्छा आहे, मला त्याची माफी मागायची आहे. तो जर खरंच अविवाहित असेल आणि माझा स्वीकार करायला तयार असेल तर मी आनंदाने त्याची होईन म्हणताना नेहाचे डोळे पाणावलेत. 


नेहा, तुझ्या नवऱ्याने काही आक्षेप घेतला तर? वरदने खात्री करून घेण्यासाठी विचारले. वरद, माझे नी त्याचे आता कसलेही नाते नाही, मी लग्न करायला पूर्णपणे मुक्त आहे. नेहा हे म्हणत असताना बॅंक मॅनेजर आत शिरले. गोरा वर्ण, ऊंच आणि सडपातळ शरीरयष्टी, वाढलेली दाढी, डार्क निळा टी शर्ट, फिक्या निळ्या रंगाची जीन्स, डोक्यावर निळी टोपी अगदी रूबाबदार व्यक्तीमत्व.


रीना मॅम, मी आत येताना ऐकलंय की तुम्ही लग्न करायला मुक्त आहात. मी अविवाहित आहे, कराल का माझ्याशी लग्न? मॅनेजर साहेब, माफ करा मला, मी माझ्या मित्राला म्हणजे राजला शोधतेय. साहेब, त्याचेही अकाउंट आहे का तुमच्या बॅंकेत? तुमच्या मित्राचं पूर्ण नांव काय? 

राज मराठे, नेहा ऊत्तरली. 

मी चेक करतो म्हणत मॅनेजर साहेब कुणाशी तरी बोलले आणि मोठ्या उत्साहात म्हणाले, हो आहे. पण एक सांगू का? त्यांनी बॅंकेला दिलेल्या माहितीनुसार त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. 

मॅनेजर साहेब, राज जसा असेल तसा चालेल मला. मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. तुम्ही त्यांचा नंबर द्या मला, मी लगेच फोन करते त्याला. 

मॅम, मी आधी त्यांना विचारतो की रीना मॅमला नंबर देऊ का? कारण कस्टमरला विचारल्याशिवाय आम्ही त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. 

ठीक आहे विचारा त्यांना पण विचारताना नेहा जोशीला नंबर देऊ का म्हणून विचारा. 

ही काय भानगड आहे? या नेहा जोशी कोण? पुढे येत वरदने रीना हीच नेहा कशी ते मॅनेजर साहेबांना समजावून सांगितले. 


नेहा मॅम, तुमचा मित्र राज खूप भाग्यवान दिसतो. मॅनेजर साहेब, भाग्यवान तर मी आहे. मी त्याला फसवून लग्न केलं हे समजूनही त्याने लग्न केलं नाही, वेड्यासारखा वाट बघत राहिला माझी. नेहा मॅम, तुम्ही म्हणाल तर मी त्यांना इथे बोलावू शकतो, पण ते आलेत तर आपला हा कार्यक्रम डिस्टर्ब होईल. नेहाने तीच्या मित्र-मैत्रिणींना विचारले. मॅनेजर साहेब, योगायोगाने आम्ही सर्व क्लासमेट्स आहोत. वी वॅांट राज, सर्वजण एकसुरात म्हणाले. ठीक आहे, मी त्यांना बोलावतो पण मी मात्र निघून जाईन, तुम्हा मित्र-मैत्रिणींमध्ये मी कशाला हवा? मॅनेजर साहेब, परत असा कार्यक्रम मी आणि राज मिळून ॲर्रेंज करू, आय प्रॅामिस, नेहा म्हणाली. मी आजच्या कार्यक्रमाचे पैसे आधीच भरले आहेत. एन्जॉय आणि बाय म्हणत मॅनेजर साहेब निघून गेले. 


सर्वजण राजची मोठ्या आतुरतेने वाट पहात होते. छानसं ब्लेजर, मस्त परफ्यूम नी गुळगुळीत दाढी केलेला रूबाबदार राज हॅालमध्ये शिरताच नेहाने राजला कडकडीत मिठी मारली. राज, आय प्रपोज यू. राज एक शब्दही बोलला नाही हे पाहून नेहाचे डोळे पाणावलेत. तरीही राज मात्र अबोलच होता. नेहा हुंदक्यांना नी आश्रूंना आवरु शकली नाही.


नेहा, रडतेस काय? अगं वेडाबाई, राजने तुला आधीच प्रपोज केलंय, राजचे ब्लेजर दूर करत आणि ब्लेजरच्या पॅाकेटमधील नकली दाढी दाखवत वरद म्हणाला. अगं तो बॅक मॅनेजर हाच आपला राज. आपण इथे जे काही बोललो ते सर्व राजला ऐकू येत होते कारण मी त्याला कॅाल लावून माझा मोबाईल खिशात ठेवला होता. तू या कार्यक्रमास आलीस ते बॅंकेच्या गाडीने नव्हे तर बॅक मॅनेजर राजच्या गाडीने. येताना राज माझ्या बरोबर आला पण जाताना तो तुझ्या बरोबर असेल. आम्ही काही बॅंकेचे कस्टमर नाही, मी आणि राजने खास तुझ्यासाठी प्लॅन केलेले हे गेट टुगेदर असून आमचा हा प्लॅन तुझ्या खेरीज सर्वांना माहीत होता.


तुझा अकाउंट ओपनिंगचा फॅार्म चेक करताना राजने जन्मतारीख बघितली. त्याचा नी तुझा वाढदिवस एकाच तारखेला आपण साजरा करायचो, आठवतं ना? मग त्याने फोटो बघितला. ही तर नेहाच आहे पण फॅार्मवर नांव होते, रीना कुलकर्णी. राज गोंधळला. मग त्याने तुला फ्लॅट नंबर विचारला. त्याला आवाज ओळखीचा वाटला मग त्याने तुझ्या आईचे नांव विचारले. जोशी आडनांव ऐकून त्याला खात्री पटली की रीना कुलकर्णी हीच नेहा जोशी. पूर्ण खात्री करून घ्यावी म्हणून त्याने तुझा पत्ता मला दिला. मी मास्क लावून नेहा जोशी नांवाचा बॅाक्स आणला तो तू स्वीकारलास, आठवतं ना? आणि त्यानंतर आम्ही ही मिटींग अॅरेंज केली. तू नक्की यावेस म्हणून राजची गाडी तुला आणायला पाठवली. 


चला, आता मस्त जेवणावर ताव मारू या, राज आणि नेहा एकसुरात म्हणाले. सर्वांनी स्वादिष्ट जेवणाचा आनंद लुटला. इतर मित्र-मैत्रिणी बाय बाय म्हणत असताना वरद मिस्किलपणे विचारत होता, राज त्या दिवशी मी नेहाच्या पार्सल बॅाक्समध्ये ११,०००/- रुपयांची वस्तू टाकली होती, कधी देणार माझे ११,०००/- रूपये? 


राज आणि नेहाने वरदला मिठी मारली आणि ड्रायव्हरला वरद बरोबर पाठवून ते दोघे राजच्या गाडीने गेलेत, त्यांच्या नवीन आयुष्याचा प्रवास आता पुनश्च सुरू झाला होता.


-दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment

0 Comments